आरोग्यसेविका विनिता तांडेल

26 जानेवारी 2021 रोजी डॉ. रुपेश पाटकर आणि त्यांच्या सहकऱ्यांमुळे माझा कातकरी वस्तीत जाण्याचा योग आला होता. तेव्हा…

      “डॉक्टरीण बाई आल्या की, आम्हाला खूप आनंद वाटतो. त्या अगदी ममतेने, मायेने आमच्यासाठी खूप काही करतात. या डॉक्टरीणबाई आणि शाळेतल्या बार्इंनी मिळून आमच्या सुनांचे डोहाळे पुरविले. ओटी भरण्याचाही कार्यक्रम केला. शिवाय सरकारी दवाखान्यात आमच्या सुनांची विशेष काळजी घेतली.”

      या बोलक्या प्रतिक्रिया आहेत, वेंगुर्ला दीपगृहाजवळील कातकरी वस्तीतील महिलांच्या. या डॉक्टरीण बाई म्हणजेच वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्यसेविका ‘विनिता वासुदेव तांडेल उर्फ तांडेल सिस्टर’.

      कुठलेही आरोग्यविषयक शिबिर असो किवा अन्य काम असो वेंगुर्लावासीयांच्या मनात अन्य डॉक्टरांच्या आधी तांडेल सिस्टरांना विचारुन पाहू, त्यांना नक्की माहिती असेल. हा विश्‍वास तांडेल सिस्टर यांनी जनमानसात मिळविला आहे. बिबवणे येथील पूर्वाश्रमीच्या एकत्र कुटुंबात वावरलेल्या पुनम रमेश राऊळ यांची सुरुवातीपासून सेवाभावी वृत्ती. घरात कोणी आजारी पडले तर डॉक्टरांकडे सोबत म्हणून जात डॉक्टर इंजेक्शन कसे देतात, जखम स्वच्छ करत त्याला मलमपट्टी कशी करतात याचे निरिक्षण त्या नेहमी करीत आणि आपल्या घरातील, शेजारील आजारी व्यक्तींची काळजी घेण्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार असे. त्यांची ही सेवाभावी वृत्ती पाहून घरच्यांनीही त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आणि वेंगुर्ला येथील सेंटलुक्स हॉस्पिटलमध्ये नर्सिंगसाठी रितसर प्रवेश घेऊन त्यांनी त्याचे शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला आडेली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि आता वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयात आरोग्यसेविका म्हणून त्या कार्यरत आहेत.

      आरोग्यसेविका अंतर्गत येणाऱ्या सर्व सेवासुविधा जनमानसांपर्यंत पोहचवत असताना वेंगुर्ला तालुक्यात त्या महिन्यातून आठ शिबिरे वेगवेगळ्या ठिकाणी घेतात. कामाचा भाग म्हणून हे सर्व करत असताना विशेष करुन कातकरी वस्तीवरील त्यांचे कार्य उल्लेखनीय असेच आहे. असे मला जाणवले म्हणून हा लेखप्रपंच.

      तांडेल सिस्टर यांना आलेले अनुभव जाणून घेताना त्या म्हणाल्या, सुरुवातीला जेव्हा मी आणि काणेकर सिस्टर या वस्तीवर गेलो तेव्हा आम्हाला घाबरुन मुले पळून गेली तर मोठी माणसे अक्षरशः लपून राहिली. पण आम्ही आमचे तिथले जाणे थांबविले नाही. आम्ही त्यांच्यासाठी खाऊ म्हणून काही घेऊन जायचो. पण ती मुले खूप घाबरायची. नेलेला खाऊ खायला बघायची नाहीत. राहणीमान, स्वच्छता याबाबत वारंवार त्यांच्यात जनजागृती करुन त्यांना ते पटवून देत हळुहळु वस्तीवरील लोकांचा विश्‍वास संपादन केला. आमचे सांगणे त्यांना समजू लागले, मार्गदर्शन पटू लागले. त्यातील काही मुले दहावीपर्यंत शिकलेली असल्यामुळे त्यांचा फायदा आम्ही करून घेतला. हातावरचे पोट असल्याने ही माणसे सकाळी कामाला जाताना जे घरात असेल ते शिजवून खाऊन कामासाठी जायचे. दुपारी जेवण हा प्रकारच नाही. त्यामुळे या वस्तीत कुपोषितांचे प्रमाण जास्त. परिणामी, आरोग्याच्याही तक्रारी अधिक. कुटुंबनियोजनाचे महत्त्व नसल्याने खाणारी तोंड वाढली तरी घरातील दाणापाण्याची सोय यथातथाच. कारण, अठराविश्‍व दारिद्य्र हे पाचविलाच पुजलेलं. गरोदर स्त्रीयांना पौष्टिक, पोषक आहार, बाळबाळंतीणीला विशेष आहार या सर्वसामान्यांच्या कल्पना त्यांच्या गावीही नसतात. हे सर्व लक्षात आल्यावर वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयातील आमच्या सर्व स्टाफने या वस्तीसाठी ठरवून काही करावे या हेतूने कामाला लागलो. माझ्या या विचारांना आश्‍लेषा काणेकर, श्‍वेता मांजरेकर, आरोग्यसेवक राजेंद्र नाथगोसावी, सीताकांत झालबा, श्रीपाद ओगले, राहूल सोकटे, श्री. सौदागर, प्रणाली साळगांवकर, श्री.धामणकर, श्री.मोरजकर आणि कै.डॉ.अतुल मुळे तसेच अंगणवाडी सेविकांचीही साथ मिळाली. अर्थात माझ्या कुटुंबानेही यासाठी मला मोलाची साथ दिली आहे.कामाचे तास संपल्यानंतर आम्ही मुद्दामहून या वस्तीवर जाऊन आरोग्यविषयक मार्गदर्शन देत असतानाच त्यांचा आहार पौष्टिक कसा होईल याकडे लक्ष दिले. आम्ही धान्य घेऊन जात त्या वस्तीवरच ते शिजवून त्यांच्यासोबत सहभोजनाचा आस्वादही घेतला आहे. हे सर्व करीत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आम्हाला मानसिक समाधान देऊन जात असतो. सुरुवातीला आम्हाला पाहून बिथरुन, घाबरुन पळून जाणारी मुले आता आमच्या गाडीचा नुसता आवाज ऐकूनच आम्हाला बिलगण्यासाठी धावत येतात. कातकरी वस्तीतील मुलांमध्ये आरोग्यविषयक हळू हळू होत असलेली सुधारणा मनाला समाधान देते.  त्यांना शासनाकडून घर, पिण्याच्या पाण्याची सोय अशा मूलभूत सुविधा मिळाल्यास त्यांचे जीवनमान नक्कीच सुधारेल. पण आमची भूमिका दुसरं कोणीतरी करेल म्हणून वाट बघत राहण्यापेक्षा आपल्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं करत राहायचं ही आहे. त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळावे, चांगले जीवनमान व्हावे यासाठी त्यांच्याकडे पाहताना पूर्वग्रहदूषित न पाहता ती आपल्यासारखी माणसे आहेत, त्यांनाही भावभावना आहेत ही भावना मनात राहिली पाहिजे. त्यांच्या अशिक्षित पणाचा, अज्ञानाचा अनेकदा आपल्यासारख्या शिक्षित लोकांकडून गैर फायदा घेतला जातो. हेही आम्ही पाहिले आहे. त्यामुळे आमच्यावर त्यांचा विश्‍वास बसताना आम्हाला अनेक दिवस द्यावे लागले. पण आता ही मंडळी आम्ही लसीकरणासाठी येत आहोत कामावर थोडं उशिरा येतोय अस सांगून थांबा, असा निरोप दिल्यावर थांबत आहेत. त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन तर अनेकदा आम्हाला जाणवते. ती अनुभूती शब्दात मांडणी करणे कठीण आहे.

      अशी ही मानवी सेवा करणारी माणसे कायमच प्रसिद्धीपासून अलिप्त असतात. आपलं काम आणि आपण यात गुंतलेली असतात. आमचा हा कामाचाच भाग आहे, आम्ही काही वेगळं करतोय असं नाही वाटतं असंही नम्रपणे नमूद करतात. नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या तांडेल सिस्टरांसोबत त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना किरात परिवाराचा मानाचा सलाम..

– सीमा शशांक मराठे,  9689902367

Leave a Reply

Close Menu