मौसम परीक्षांचा

ऑनलाईन की, ऑफलाईन म्हणता म्हणता अखेर ऑफलाईन परीक्षा घेण्यावरच शिक्कामोर्तब झाले आणि बारावीची परीक्षा संपतही आली तर दहावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला. बोर्डाची परीक्षा म्हटली की, मुलांसोबत पालक, शिक्षक हेही प्रचंड तणावाखाली वावरत असत. मनासारखा निकाल लागेपर्यंत ही परिस्थिती कायमच असे. त्यामुळे ज्ञानार्थी व्हा, नुसते परीक्षार्थी नकोयासारख्या लेखमालांनी वृत्तपत्रांचे रकाने भरायचे किवा व्याख्यानांनी शाळांमधून एक परीक्षांचा माहोल तयार केला जायचा. जेणेकरून याचे गांभीर्य मुलांमध्ये निर्माण व्हावे आणि त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करत आपले ध्येय साधावे. बोर्डाच्या परीक्षेची बैठक व्यवस्था ही घरापासून इतर गावांमध्ये असल्यास दळणवळणाच्या सोयीअभावी असे परीक्षार्थी आपल्या नातेवाईक किवा तत्सम ओळखीत आधीपासूनच रहायला यायचे. जेणेकरुन अभ्यासाला पोषक वातावरण मिळावे. कालांतराने दळणवळणाची साधने झाली आणि असे परीक्षार्थी चारचाकी गाडीने परीक्षाकेंद्रामध्ये पोहचू लागली.  या सर्वांमुळे आता परीक्षा सुरु झाल्या याची जाणिव जनमानसात निर्माण व्हायची आणि आपल्या नातेवाईकांमधील कोण बोर्डाच्या परीक्षेला बसला आहे याची आठवण ठेवत आवर्जून पत्राद्वारे, फोनद्वारे शुभेच्छांचे वर्षाव, आपले स्वतःचे परीक्षेचे अनुभव सांगताना असंख्य सूचनांचा भडीमारासोबत, सावधगिरीचा इशाराही दिला जायचा. यावर्षी एसटी संपाचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जाणवला आणि जाणवतही आहे, पण अडचणीवर मात करत विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचत आहेत.

      एकिकडे परीक्षेचे स्वरुप तेच असले तरी त्याचे गांभीर्य मात्र, अलिकडे बरेच कमी झाले असल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊन कालावधीत ऑनलाईन घेतल्या जाणा-या परीक्षांमुळे पर्यायी क्रमांकावर बटण दाबून पेपर सबमिट केला की, परीक्षा झाली. अशा पर्यायी व्यवस्थेला सरावलेल्या मुलांना दहा ओळी लिहिणे हे संकट वाटू लागल्याचेही चित्र समोर आले आहे. निबंध, पत्र ही अशी कल्पनाविलासाने जास्त ओळीत लिहिणे म्हणजे मुलांना कठीण वाटू लागले. या बोर्डाच्या परीक्षेत पेपर लिहिण्यासाठी तीन तास कालावधी असूनही तो लिहून पूर्ण न झालेल्या मुलांची संख्या अधिक असल्याचे चर्चिले जात आहे. निश्चितच ही बाब अन्य मुलांसाठी धोक्याची सूचना आहे.

      खरेतर अलिकडे परीक्षांकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलला आहे. मिळालेल्या गुणांकडे तुलनात्मक दृष्ट्या पहात असल्याने परीक्षा म्हणजे पालक, मुले, शिक्षक यांची एक जीवघेणी स्पर्धा बनू लागली आहे. जीवनाभिमूख कौशल्य शिकविणारी शिक्षण प्रणाली हा बदलत्या शिक्षणप्रणालीचा प्रमुख पाया असल्याचे म्हटले जाते. शिक्षण या बिदूभोवती फिरणा-या आणि विद्यार्थी केंद्रीत शिक्षणाचे प्रवाह यापुढे वहातीलही परंतु, सध्यातरी विद्यार्थ्यांना, पालकांना आहे त्या शिक्षणप्रणालीला सामोरे जायचे आहे.

      सध्या सोशल मिडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. failure is an event, never a peson असा त्याचा सार आहे. त्यामुळे या परीक्षा म्हणजे आपल्या जीवनाचा शेवटनक्कीच नाही याचे भान ठेवत मुलांनी कुठलेही दडपण न घेता परीक्षांना सामोरे जावे. दुर्देवाने अपयश आलेच तर आपल्यातील कलागुणांचा शोध घेत, ध्येय ठरवित त्याचा पाठपुरावा करीत मार्ग शोधावा याच सदिच्छा!

Leave a Reply

Close Menu