महागाईचा आगडोंब

अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटका तेव्हा मिळते भाकर!हातालाच बसणारे चटके आता महागाईच्या रुपात माणसाच्या संपूर्ण आयुष्यालाच बसू लागले आहेत. स्वतःबरोबरच आपला संसार-प्रपंच सांभाळताना पार कोसळून जायची वेळ आली आहे. जीवन जगण्यासाठी लागणा-या दैनंदिन वस्तूंचेच दर गगनाला भिडत असल्याने या वाढत्या महागाईत जगायचे तरी कसे असा यक्षप्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

    अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या प्रमुख तीन गरजा आहेत. यातील वस्त्र हे काटकसरीने वापरता येण्याजोगे आहे. निवा-यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागत असले तरी एकदा निवारा अस्तित्वात आला की, वा-या पावसाची चिता नसते. किवा घर बांधण्याजोगे आर्थिक स्थिती नसल्यास भाड्यानेही लोक रहातात. आता विषय राहिला तो अन्नाचा. दैनंदिन जीवनात अन्न हेच प्रमुख मानले गेले आहे. सकस आहार असेल तर माणूस आपल्या बळाच्या जोरावर कामधंदा करून पैसे मिळवू शकतो. सध्या भाज्या आणि फळांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी, डाळी प्रतिकिलो सरासरी १० ते २० रुपये, गुळ ५ रुपयाने, खाद्यतेल ४० ते ५० रुपयांनी वाढ झाली आहे. एकूण घाऊक निर्देशांक १४.५५ टक्के दर्शवित आहे. त्यामुळे खर्चाच्या जुळवाजुळवीत सामान्य माणूस मेटाकुटीस आला आहे. सर्वसाधारण सामान्यांच्या घरात रोजचे जेवण चमचमीत आणि झणझणीत असतेच. त्यामुळे डाळ, तांदूळाबरोबरच खाद्यतेल, मसाला हे मुबलक प्रमाणात वापरले जातात. रेडिमेड मसाले खरेदी करण्याऐवजी अनेक घरांमधून मसाला घरी करण्याकडे कल असतो. परंतु, हळद १८०, धणे १६०, तेजपान १२०, शहाजिरा ६००, दालचिनी ४००, काळे मिरे ५५०, रामपत्री ९०० या मसाल्याला लागणा-या घटकांच्या वाढत्या दरामुळे किरकोळ मसाला करण्या-या घरांमधून चितेचे वातावरण झाले आहे. मसाल्याची काही पिके ही जंगलमय भागताच मिळतात आणि ती दुर्मिळही असतात. सध्या अशा पिकांचे भाव न वाढता रासायनिक पद्धतीने पिकविल्या जाणा-या पिकांच्या किमतीत वाढ झाली आहे. खते, बि-बियाणे यांचे वाढलेले दर हे कारणही मसाला साहित्याचे दर वाढण्यामागे असू शकते. मसाल्यासाठी लागणा-या साहित्याला बदलत्या हवामानाचा फटका बसल्याने त्याच्या दरामध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे मसाल्याचे दर वाढण्याची शक्यता निर्माण होत आहे. सध्या भाजलेला मसाला ६०० रुपये किलो तर हिरवा मसाला ३६० रुपये किलो दराने बाजारात उपलब्ध आहे. 

    ग्रामीण भागातील नोकरदार वर्गाला जिल्हा किवा तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी एसटीचाच आधार आहे. परंतु, एसटी संपामुळे त्यांचेही हाल झाले. ही गैरसोय टाळण्यासाठी काहींनी नविनकिवा सेकंड हॅण्डगाड्याही घेतल्या. पण दुसरीकडे या गाड्यांना लागणारे इंधन म्हणजेच पेट्रोलच्या महागाईचा भडकाच उडाला. रशिया, युक्रेन संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळीत व्यत्यय आल्याने खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे दर १०० डॉलरपर्यंत गेले आहेत. पाच राज्यांतील निवडणुकांमुळे इंधन वितरक कंपन्यांनी १३७ दिवस इंधन दरवाढ रोखून ठेवली होती. मात्र, पेट्रोल, डिझेल दरात २२ मार्चपासून आत्तापर्यंत प्रतिलिटर १० रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली. दोन अंकी लिटर असणारे पेट्रोल आता तीन अंकी लिटर झाले आहे. रोज चार-आठ दिवसांनी पेट्रोलच्या किमतीत चढता क्रम दिसून येत आहे. उतरले तर अगदी नगण्यच.

     कोरोनाचा काळ दोन वर्षे घरात बसून काढावा लागला. त्यात भविष्यासाठी ठेवलेली पुंजीही खर्च झाली. आता भविष्यासाठी सोडाच पण रोजचा खर्चच भागवताना नाकीनऊ येत आहे. वाणसामान, गॅस, वीज बिल, टीव्ही व मोबाईल रिचार्ज, मुलांचे शिक्षण, अधूनमधून उद्भवणा-या आजारांवरील औषधोपचार या सर्व चक्रव्युहात माणूस अडकला आहे. नोकरदार वर्गाची अवस्था पाहून सर्वसामान्यांचा तर विचारच करणे कठीण.

    एकीकडे हे सर्व घडत असताना निवडणुकीपुरतेच मतदारांना देव मानणारे राजकीय पक्ष, निवडून दिलेले लोकप्रतिनिधी मात्र, जनतेचे हित साधण्याचे सोडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यातच गुंतले आहेत. एकेकाळी मांडीला मांडी लावून बसलेले राजकीय पक्ष आज विभक्त झाले तर एकमेकांना पाण्यात पहाणारे एकत्र येऊन सत्तेची सुत्रे सांभाळत आहेत. समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये केल्यामुळे बोलणारा नामानिराळा राहातोय, पण कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री सुरु होतेय. अशी बेमालुमपणे मुलभूत प्रश्नांना बगल देत आपली खिचडी शिजवून खाण्यात राज्यकर्ते मश्गूल असल्याचे दिसते. त्यांची ही खेळीस्वहितासाठी की जनहितासाठी हे त्यांचे त्यांनाच माहित. जनता शांत आहे याचा अर्थ अडाणी नाही. 

    आज प्रमुख पक्ष देशाचे आणि राज्याचे प्रतिनिधीत्व करीत असल्याने ते सर्वच सत्ताधारी या कक्षेत मोडत आहेत. त्यामुळे एकमेकांची उणीदूणी किवा कोर्टात खेचण्यात वेळ न फुकट घालवता तोच वेळ एकत्र बसून जनतेच्या हितासाठी वापरता येऊ शकतो. जनतेला आता नुसती आश्वासने नको आहेत तर दिलासादायक कृती हवी आहे.

 

Leave a Reply

Close Menu