रात्रीचा गॅरेज

मध्यरात्रीचा वेळ, सर्वत्र निरव शांतता, आजूबाजूच्या घरांमधील दिवे कधीच बंद झालेले, संपूर्ण गाव साखरझोपेत असल्याचे चित्र. मठ गावातून वेंगुर्ला शहरात प्रवेश करताना शिवाजी चौकातील वळणावर गाडी वळताच डाव्या बाजूला ट्युबलाईटींचा पांढरा प्रकाश, या पांढऱ्या प्रकाशात वयाची पन्नाशी पार केलेली, हाफ पॅण्ट, उकाड्याचा त्रास होऊ नये म्हणून विनाशर्ट, गळ्यात यज्ञोपवित, डोळ्यावर चष्मा अशा स्वरुपात एक व्यक्ति अगदी मन लावून सायकलची सीट खाली आणि चाके वर अशा स्थितीत सायकल दुरुस्ती करण्यात मग्न असलेली. त्या व्यक्तीसोबत बोलण्यासाठीही कोणीच नाही. सोबत फक्त सायकल आणि तिचे काम. हे सारं पहाताना क्षणभर एखाद्या कथेमध्ये भास-आभासाचे वर्णन केल्याप्रमाणे दृश्‍य दिसते. पण हे तर भास किंवा आभास नसून पूर्णत: वास्तव आहे.

      ती व्यक्ती ‘आनंद सायकल स्टोअर्स’चे मालक विनोद रंगनाथ शेणई!, मु.पो. मठ-गावठणवाडी, ता. वेंगुर्ला येथे राहणाऱ्या शेणई काकांच्या घराच्या पडवीतच हे गॅरेज आहे. सायकल दुरुस्तीचा व्यवसाय हा त्यांच्या वडिलांपासून चालत आलेला. वडिलांच्या पश्‍चात भावाने काही दिवस या गॅरेजची धुरा सांभाळली आणि त्यांच्या पश्‍चात विनोद शेणई यांनी गॅरेजचा कार्यभार हाती घेतला. व्यक्ती तशी दिसायला साधीच, पण काम मात्र चोख. गावातील भर चौकातच गॅरेज असल्याने लोकांची ये-जा सुरुच. त्यातच गाड्यांचा आवाज, वळण असल्याने समोरच्याला सावध करण्यासाठी वाहनधारकांकडून हमखास हॉर्नचा वापर होत असल्याने कामातील लक्ष विचलित होण्याशिवाय पर्यायच नाही. काम व्यवस्थित होईना, संसारप्रपंच सांभाळताना बाजारहाट, बागायतीकडे लक्ष, नातेवाईकांसह गावातील लोकांच्या सुखदु:खात सहभागी होताना, कुटुंबप्रमुख म्हणून यासारख्या अन्य जबाबदाऱ्या पार पाडत असताना अधूनमधून व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ त्यांच्यावर येऊ लागली. परिणामी, दुरुस्तीसाठी आलेल्या सायकलींची संख्या वाढली. ग्राहकांना वेळेत सायकली मिळेनात, त्यांची गैरसोय व्हायला लागली. यातून मार्ग काढताना श्री. विनोद शेणई यांनी ‘रात्रीचा गॅरेज’ सुरु ठेवण्याची युक्ती काढली. ही त्यांची युक्ती त्यांच्या फायद्याचीच बनली. आपली दैनंदिन बाहेरील काम आटपून त्यांनी रात्रीचे गॅरेज सुरु केले. एक काम करताना त्यात दुसऱ्या कामाची लुडबूड नको हा त्यांचा शिरस्ता. काम करताना मग ते किती रुपयांचे काम असो, ते व्यवस्थितच झालेच पाहिजे. हाती घेतलेले काम पूर्ण केल्याशिवाय त्यांच्या हाताला स्वस्थता नाही. मग रात्रच काय मध्यरात्र उलटूनही गेली तरी चालेल. सायकलचा मालक सकाळी आला की, तो रिकामा परतून जाता कामा नये, त्यासाठी हा सर्व खटाटोप. मठ गावाबरोबरच अगदी कामळेवीर, आडेली पासून सायकलस्वार आपल्या सायकली शेणर्इंच्या गॅरेजमध्ये घेऊन येतात.

      त्यांच्या या ‘रात्रीच्या गॅरेज’चा उपयोग फक्त सायकलस्वारांनाच नाही तर रात्री अपरात्री अडकलेल्या व्यक्ती तसेच पर्यटकांनाही होतो. रात्रीच्या वेळी दुकाने बंद असल्याने लोकांना पाण्याची सोय उपलब्ध करून त्यांचे आदरातिथ्यही ते आनंदाने करतात. त्यांना योग्य ती माहिती देऊन मार्गदर्शनही करतात. पूर्वीच्या काळी गावात वाहतुकीची साधने कमीच होती. अशावेळी रात्री अपरात्री बाहेर गावाहून येणाऱ्या ग्रामस्थांना त्यांच्या घरापर्यंत पोहचवण्याचे कामही शेणई कुटुंब करीत असत. जनसेवा करण्याचे व्रत श्री. शेणई अजूनही आनंदाने जपत आहेत. विनोद शेणई यांची पत्नी आणि दोन मुली असे त्यांचे चौकोनी कुटुंब आहे. ‘इच्छा तेथे मार्ग’ हे तत्त्व त्यांनी कायम अंगिकारले आहे. त्यांच्या या प्रेरणादायी व्यक्तीमत्त्वाला किरात परिवाराचा सलाम!                                       -प्रथमेश गुरव, 9021070624

Leave a Reply

Close Menu