माझा सोनुला, माझा छकुला…

एकदा एक मनुष्य आपल्या जीवनातल्या सर्व समस्यांना कंटाळून आत्महत्या करण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर जात असतो. तो समुद्रात उडी घेणार तेवढ्यात एक कोळी तिथे येतो व त्याला अडवतो आणि म्हणतो, “जरा थांब. आधी माझ्याबरोबर चल आणि मी काय दाखवतो ते बघ.“ असे म्हणून तो त्याला एका घराच्या अंगणात घेऊन जातो. तिथे एक नुकतीच चालायला लागलेली मुलगी पडत-धडपडत पुन्हा पुन्हा चालण्याचा प्रयत्न करत असते. चार पावले जरी टाकता आली तरी ती आनंदाने टाळ्या वाजवत असते. तिची आई तिला सतत प्रोत्साहन देत असते. तो कोळी त्या मनुष्याला म्हणतो, “पाहिलेस ती मुलगी कितीदा पडली तरी पुन्हा नव्या उमेदीने चालण्याचा प्रयत्न करते आहे. जर तिने निराश होऊन प्रयत्नच सोडून दिला तर?“ त्या मनुष्याला आपली चूक कळली व त्याने आत्महत्येचा विचार सोडून दिला.

      या मुलीची गोष्ट हा सकारात्मक दृष्टिकोन आहेच पण हीच आपल्या शिशुशिक्षणाची गोष्ट आहे असे म्हणायला हरकत नाही. आपल्या आत असणाऱ्या उर्मीने ही मुलगी सतत काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत होती. अशावेळी त्याला पूरक वातावरण निर्माण करणे हा या शिक्षणाचा पाया आहे. म्हणूनच शिशुशिक्षणाचा विचार करताना आपण गर्भावस्थेपासून विचार करायला सुरुवात केली आहे.

         मुंबई – पुणे – मुंबई – 3 चित्रपट बहुतेक आपण सर्वांनीच बघितला आहे. त्यातील गौरी आणि गौतम यांचे आई-बाबा होताना किंवा तो निर्णय घेताना झालेले मानसिक द्वंद्व दाखवलेच आहे, पण त्यात आईच्या म्हणजे गौरीच्या पोटात असणाऱ्या जुळ्या बाळांचे काल्पनिक संवाद  दाखवले आहेत. आतापर्यंत या लेखमालेत आपण सातत्याने शिशुशिक्षणाच्या संदर्भात जी चर्चा करत आहोत त्याचेच हे प्रत्यक्ष चित्रीकरण आहे असे मला वाटले.

      वास्तविक गर्भावस्थेपासून 5 वर्षे वयापर्यंत संस्कार-ग्रहण-क्षमता सर्वात जास्त असते. त्यामुळे 5 वर्षापर्यंत विकासाचे माध्यम संस्कार हेच असते. चित्रपटात दाखवले आहे तसे प्रत्यक्ष बाळाचे  संवाद होत नसतील; पण आजूबाजूचे वातावरण, आईची मानसिक-शारीरिक स्थिती आणि त्याचा गर्भावर झालेला परिणाम या सर्वांची नोंद या बाळजीवांच्या मेंदूत साठवली जाते. जसे मोबाईल किंवा लॅपटॉपला स्टोअरेज असते तसे यांच्या मेंदूत काही गोष्टी कायमस्वरूपी ठसा उमटवतात. यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे बाळाचा प्रत्यक्ष जन्म!

      आज या लेखात 0 ते 6 महिने या वयोगटातील बालकांचा आपण विचार करणार आहोत. जेव्हा मूल प्रत्यक्ष जन्माला येते तेव्हा त्याची सर्व अंगप्रत्यंग दिसतात पण ती सक्रिय नसतात. त्याच्या आजूबाजूला दिसणारे दृश्‍य, रंग, ध्वनी, वास, स्पर्श याच्या अनुभवातून मूल शिकत जाते. म्हणूनच आहार-विहार आणि संस्कार ही या काळातील मुलाची शिक्षणाची साधने आहेत असे म्हणायला हवे.

      0 ते 6 महिन्याचे मूल केवळ आईच्या दुधावरच अवलंबून असते. त्यामुळे आईने या काळात पचण्यास हलका, हितकर, सकस व पथ्यकर असा आहार घेणे आवश्‍यक असते. या आहाराचेच पचन होऊन स्तन्याची निर्मिती होत असते. आईचे दूध हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे असते. ज्यावेळी मूल अंगावर दूध पिते त्यावेळी त्याची पंचज्ञानेंद्रिये आईकडे एकवटलेली असतात. कानामार्फत तो आईच्या हृदयाचे ठोके ऐकत असतो. त्वचेमार्फत आईचा प्रेमळ स्पर्श अनुभवत असतो. डोळ्यातून त्याला आईचे प्रेम दिसत असते. जीभेने दुधाची चव घेत असतो. नाकाने आईच्या अंगाचा गंध अनुभवत असतो- जो जन्मापूर्वीपासून त्याला परिचित असतो. अशाप्रकारे या आहारातूनच मुलाचा विकास होत असतो.

      विहाराचा म्हणजेच व्यायामाचा विचार करता या मुलांकडून प्रत्यक्ष व्यायाम करून घेणे असे अपेक्षित नाही. पण मूल सतत जी हातापायाची हालचाल करत असते त्यातून त्याचा कर्मेंद्रियांचा विकास होत असतो. त्या हालचालींवर बंधन येणार नाही असे कपडे त्याला घातले पाहिजेत. याशिवाय रोज अंघोळ घालण्यापूर्वी मुलाला तेलाने हळुवार मसाज करणे हेही त्याच्या स्नायूंना बळकटी देण्यासाठी उपयुक्त ठरते. या मुलांचे स्नायू अजून  बसण्यासाठी किंवा उभे राहण्यासाठी पूर्णपणे सक्षम नसतात. त्यामुळे मुलांना अधिक काळ बसवू किंवा उभे करू नये. मानेचे स्नायू सक्षम होईपर्यंत मानेला आधार देण्याचीही गरज असते.

      यानंतरचा या बालकांचा विकास हा संस्काराच्या माध्यमातून होत असतो. आणि संस्कार ही शिकवण्याची गोष्ट नसून अनुकरण करण्याची गोष्ट आहे. त्यामुळे यामध्ये घरातील वातावरण, बाळाचे कपडे, खेळणी या सर्व गोष्टींचा समावेश होतो. या वयोगटातील मुलांना बोलता येत नाही, पण त्यांची ऐकण्याची-पाहण्याची क्षमता उत्तम विकसित झालेली असते. अशावेळी घरातील वातावरण प्रसन्न असणे, त्याच्याशी बोलण्याची भाषा मृदू असणे, त्याला उत्तम संगीत ऐकवणे, त्याच्या वयाला योग्य अशी अंगाईगीते म्हणणे, बडबडगाणी ऐकवणे या माध्यमातून शिक्षण सुरू होते.

     या वयातील मुलांना घट्ट कपड्यांचे बंधन नको असते. कारण त्यामुळे त्यांच्या हालचालींवर मर्यादा येते. म्हणून सैलसर, सुती कपडे वापरणे योग्य ठरते. आवश्‍यक त्याच ठिकाणी डायपरचा वापर करावा. पाश्‍चात्य देशात थंड वातावरण असल्यामुळे डायपरचा मुलांना फारसा त्रास होत नाही. पण भारतासारख्या देशात सतत डायपर वापरल्याने घाम येऊन काही त्वचेचे आजार होऊ शकतात. त्याचप्रमाणे कपड्यांचे रंगही मुलांना आकर्षित करतील असे असावेत. ज्यामुळे त्यांचे मन प्रसन्न होईल.

      खेळण्याचे रंगही असेच गडद- आकर्षक असावेत. खेळणी टोकदार, मुलांना इजा होतील अशी नसावीत. त्याचे रंग प्राकृतिक असावेत. कारण या वयातील मुलांची खेळणी तोंडात घालायची स्वाभाविक प्रवृत्ती असते. खेळण्यांचा आवाज नाजूक असावा. मुलांना भीती वाटेल असा आवाज किंवा आकार नसावा.

       लहान मुले ही सतत सक्रिय आणि शिकण्यास उत्सुक असतात. एकच गोष्ट वारंवार करताना त्यांना कंटाळा येत नाही. उदा. एकदा पालथे पडायला यायला लागल्यावर तो वारंवार तीच कृती करून त्यातील आनंद शोधतो. ही त्याची अंत:प्रेरणा असते. म्हणूनच या वयातील मुले अंतःप्रेरणा, अनुकरण व अनुभवाच्या माध्यमातून शिकत असतात. हीच त्याच्या विकासाची प्रक्रिया आहे आणि त्यालाच आपण शिशुशिक्षण म्हटले आहे.                                                        – डॉ. मेधा फणसळकर, 9423019961

Leave a Reply

Close Menu