‘किरात’ शताब्दी स्नेहमेळाव्याचे आयोजन

                 किरात साप्ताहिकाने जानेवारी 2022 मध्ये शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे. कोकणातील विविध प्रश्‍नांवर किरातने जनप्रबोधन करण्याचे व्रत आजवर जोपासले आहे. किरातच्या शताब्दी वर्षानिमित्त शनिवार दि. 14 मे रोजी सायंकाळी 4 ते 8 या वेळेत मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह, वेंगुर्ला येथे शताब्दी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. वेंगुर्ल्याचे सुपुत्र सुप्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर या मेळाव्याचे उद्घाटन करणार आहेत. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपकभाई केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरीप, प्रा. सुनिल नांदोस्कर, दै. तरुण भारतचे समूह प्रमुख सल्लागार तथा संपादक श्री. किरण ठाकूर, दै. तरुण भारत अक्षरयात्रा- दिवाळी अंक संपादक बालमुकुंद पत्की यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

      सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कु. नीरजा भूषण माडकर, कु. केतकी प्रशांत आपटे यांचे नृत्याविष्कार, राष्ट्रपती पुरस्कार विजेते श्री. गणपत मसगे, श्री. कृष्णा मसगे आणि सहकारी यांचा कळसूत्री बाहुल्यांचा खेळ, पखवाज वादक भाविका खानोलकर आणि हार्मोनियम वादक मयूर गवळी  यांच्यासह बालदशावतार जुगलबंदीचा अनोखा खेळ रसिकांना अनुभवता येईल. सुप्रसिद्घ गीतकार वेंगुर्ल्याचे सुपुत्र श्री. गुरु ठाकूर यांच्याशी मुलाखतीद्वारे संवाद साधणार आहेत प्रसिद्ध वृत्त निवेदिका शिबानी जोशी. डॉ. प्रतीक गायकवाड आणि सहकारी आवाज चांदण्यांचे ही भावस्पर्शी संगीत मैफल सादर करणार आहेत.

      या शताब्दी स्नेहमेळाव्याला वाचक, हितचिंतक आणि रसिक प्रेक्षकांनी उपस्थित रहावे असे आवाहन किरात परिवारातर्फे करण्यात येत आहे.

गुरु ठाकूर- राजकीय व्यंगचित्रकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या गुरु ठाकूर यांची कामगिरी अभिनेता, कवी, नाटककार, चित्रपटांकरीता कथा-पटकथा, संवाद लेखन अशी चौफेर राहिली आहे. जवळपास 200 पेक्षा जास्त चित्रपटांकरिता त्यांनी गीतलेखन केले आहे. तसेच जाहिराती, म्युझिक अल्बम, मालिका शिर्षक गीते अशा विविध माध्यमातून त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. या क्षेत्रातल्या सर्वोच्च कामगिरीकरिता त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. बालभारतीच्या सातवी आणि दहावीच्या पुस्तकात त्यांच्या कवितांचा समावेश करण्यात आला आहे.

डॉ. प्रतीक गायकवाड- आजच्या युवा पिढीतील उल्लेखनिय गायक आणि संगितकार आहेत. देश-विदेशातल्या अनेक व्यासपीठांवर त्यांनी आपल्या संगीत साधनेचा अभूतपूर्व परिचय देऊन रसिकांना एका वेगळ्या संगीत जगताचा प्रवास घडवून आणला आहे. आतापर्यंत त्यांना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील 300 हून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी, तमिळ आणि बंगाली भाषेतही त्यांनी गायनाचे कार्यक्रम केले आहेत. डॉ. सलिल कुलकर्णी, विदुषी करुणा देशपांडे यांचे ते वरिष्ठ शिष्य असून संगीतशास्त्र विषयाचे भारतातील सर्वात कमी वयाचे पीएचडी गाईड आहेत. संगीत विषयामध्ये सलग तीन वेळा राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक मिळाले आहे. सर्जनशील प्रतिभेने स्वतःचा संगीत कलाविष्कार घडविणारे कलाकार म्हणून संगीत जगतात डॉ. प्रतीक गायकवाड यांना विशेष स्थान आहे.

Leave a Reply

Close Menu