धुराविना अश्रू

दिवसेंदिवस सर्व जीवनोपयोगी वस्तूंच्या किमतीत वाढ होत आहे आणि आता घरगुती सिलिडरचा दर वाढत वाढत जाऊन चक्क हजारच्या घरात जाऊन पोहचला. कोरोना, लॉकडाऊनच्या संकटकाळात अनेकांच्या रोजंदारीवर गदा आली. बहुतांश लोकांची आर्थिक बाजू कोलमडलेली असतानाच वाढत्या महागाईत किचन बजेटकसे स्थिर ठेवायचे याची विवंचना सर्वसामान्य जनतेला पडली आहे.

    पूर्वीच्या काळी जंगलातून लाकूडफाटा आणून त्यावर चुल पेटवून अन्न शिजविण्याची पद्धत होती. त्यानंतर ज्यांच्याकडे गुरेढोर आहेत त्यांना बायोगॅसचा पर्याय उपलब्ध झाला. सिधुदुर्गात भगिरथ प्रतिष्ठानने सिधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सहकार्याने गावोगावी बायोगॅस चळवळ उभी केली. सिधुदुर्गात सुमारे नऊ हजार घरांत बायोगॅस पोहचला. यामुळे स्वयंपाकघर धूरमुक्त झाले. वेळेची बचत झाली आणि उरलेल्या वेळेत स्त्री-पुरुषांना शेतीपुरक व्यवसाय उपलब्ध झाले. असे काही सकारात्मक बदल भगिरथसारख्या स्वयंसेवी संस्थांनी शासकीय योजनांची सांगड घालून बँकांच्या मदतीने ज्या गावात हे प्रकल्प राबविले तिथे सकारात्मक बदल दिसून आले आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे फ्लॅट संस्कृतीमध्ये गुरे पाळणे, बायोगॅस प्रकल्प राबविणे सहज शक्य नाही. तसेच लाकूडफाटा उपलब्ध होण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे गॅस सिलिडर घेण्यावाचून पर्याय राहत नाही.

    सुमारे दहा वर्षांपूर्वी ५०० रुपयांच्या आत मिळणारा हा गॅस सिलिडर आता एक हजार रुपये झाला आहे. गेल्या वर्षभरात घरगुती सिलिडरमध्ये तब्बल १९० रुपयांची दरवाढ झाली आहे. केंद्र शासनाने उज्ज्वला योजनेची प्रत्येक पेट्रोल पंपावर जाहिरात केली होती. आता हे फलक ब-याच ठिकाणांहून गायब झाले आहेत. घरगुती वापरकर्त्यांना मिळणारे अनुदान २०२० पासून बंदच झाले आहेत.

     सर्वप्रकारच्या दरवाढीमुळे जीवन जगणे सर्वसामान्यांना कठिण झालेले असताना प्रमुख राजकिय विरोधी पक्ष या धोरणा विरोधात आवाज उठविताना दिसत नाहीत. किरकोळ आंदोलनांचा अपवाद वगळता विरोधी पक्षांकडे ठोस कार्यक्रमाचा अभाव जाणवत आहे. महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय नेते तर भोंगे, हनुमान चालिसा असे भावनिक मुद्दे पेटविण्यात व्यस्त आहेत. बहुतांश कार्यकर्ते सोशल मिडियावर आपल्या नेत्याला प्रमोट करण्यात आणि विरोधकांना ट्रोल करण्यात दिवस घालवित आहेत. रोजंदारीवर जगणारा माणूस मात्र, धुराविना निघणारे अश्रू लपवून उद्या माझ्या ताटात अन्य पडेल की नाही या विवंचनेत आहे. याकडे मात्र, फारसे कोणाचे लक्ष जात नाही ही आजची शोकांतिका आहे.

 

Leave a Reply

Close Menu