मुंबई-गोवा महामार्गाला बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्या

कोकणची लाइफलाइन असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाला आद्य पत्रकार, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देण्यात यावे. आमची ही मागणी आपण राज्य व केंद्र शासन दरबारी आपण पोहचवावी यासाठी आज बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुण्यतिथी वेंगुर्ला तालुका पत्रकार संघातर्फे वेंगुर्ला तहसिलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले. हे निवेदन तहसिलदार यांच्या अनुपस्थितीत नायब तहसिलदार लक्ष्मण फोवकांडे यांनी स्विकारले.

       पत्रकारांनी सातत्याने सहा वर्षे रस्त्यावर उतरून लढा दिल्यानंतर आणि दिल्लीपर्यंत पाठपुरावा केल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले. काम रखडल्यानंतर देखील वेळोवेळी पत्रकारांनी पाठपुरावा केला होता. पत्रकार लढत होते तेव्हा सर्व राजकीय पक्ष मूग गिळून गप्प होते. मात्र आता रस्त्याचे काम पूर्णत्वास येत असताना अनेक नेते श्रेय लाटण्यासाठी समोर येत आहेत तसेच काहींनी महामार्गासाठी वेगवेगळी नावं सूचवून मोडता घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

      बाळशास्त्री जांभेकर हे कोकणचे सुपूत्र आहेत आणि पत्रकारांमुळे हा महामार्ग होत असल्याने बाळशास्त्रींचे महामार्गाला नाव देणे औचित्यपूर्ण ठणार असल्याने सरकारने तातडीने तसा निर्णय शासनाने घ्यावा अशी मागणी आम्ही करीत आहोत, असे या निवेदनात नमूद केले आहे.

      निवेदन सादर करतेवेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदिप सावत, उपाध्यक्ष के.जी.गावडे, दाजी नाईक, सहसचिव विनायक वारंग, खजिनदार एस.एस.धुरी, सदस्य भरत सातोसकर, मॅक्सी कार्डोज, दिपेश परब, सुरज परब, प्रथमेश गुरव, अजय गडेकर, योगेश तांडेल, साप्ताहिक किरातचे व्यवस्थापक सुनिल मराठे आदी उपस्थित होते.

      तत्पूर्वी पत्रकार संघाच्या कार्यालयात बाळशास्त्री जांभेकर पुण्यतिथी साजरी करण्यात आली. अध्यक्ष प्रदिप सावंत यांनी जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या कार्याची माहिती दिली.

Leave a Reply

Close Menu