सेवा शतकोत्तर विश्वासाची

१४ मे २०२२ रोजी किरातच्या वर्धापनावर्षानिमित्त मधुसूदन कालेलकर सभागृहात स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. १०० वर्षांचा हा प्रवास अनुभवणा-या बुजूर्ग व्यक्तींनीही या स्नेहमेळाव्याला आवर्जून उपस्थिती लावली. किरातच्या प्रवासात हितचितकाच्या भूमिकेतून असंख्य वाचकांनी दिलासा दिला. या सर्वांच्या साक्षीने किरात स्नेहमेळावासंस्मरणीय ठरला. कार्यक्रमाचे स्वरूप व भव्यता संभाळताना उपस्थित किरात परिवारांशी आम्ही केवळ शब्दसुमनाने स्वागत करू शकलो. वैयक्तिक भेटीगाठी किवा समक्ष भेटून दखल घेता आली नाही. तरी किरातपरिवाराने आपुलकीने लांबलेल्या या कार्यक्रमांचा आस्वाद घेतला.

       कै.अनंत वासुदेव मराठे यांनी स्थापन केलेल्या, कै.केशव मराठे व कै.श्रीधर मराठे यांनी संवर्धन व विस्तार केलेल्या या वटवृक्षाच्या छायेत ती माया या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला अनुभवता आली. गुरु ठाकूर यांची मुलाखत आणि प्रतिक गायकवाड यांचे आवाज चांदण्यांचेही संगित मैफिल या कार्यक्रमाची सुरुवात नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुरु झाली. परंतु, यालाही रसिक श्रोत्यांनी दाद दिली. युट्युब चॅनेलवर लाईव्ह कार्यक्रम पाहता आल्याने अनेक स्नेहींनी समाधानही व्यक्त केले.

      वृत्तनिवेदक शिबानी जोशी यांनी आपल्या ओघवत्या शैलीने कार्यक्रमात आपुलकीचे नाते निर्माण केले. निरजा माडकर, केतकी आपटे या उदयोन्मुख नृत्यांगनांनी आपल्या नृत्याविष्काराने कार्यक्रमाचा एक माहोल तयार केला. गणपत म्हसगे व त्यांच्या सहका-यांनी कळसुत्री बाहुल्यांच्या माध्यमातून तर भाव अंतरीचे हळवेफेम मयुर गवळी आणि दशावतारातील पहिली महिला पखवाज वादक भाविका खानोलकर यांच्या साथीने रामेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा चितामणीहा नाट्यप्रयोग उत्तरोत्तर रंगत गेला.

     आज इंटरनेट, मोबाईलच्या जमान्यात एका क्लिकवर सर्व सोयीसुविधांबरोबरच मनोरंजनाची साधनेही उपलब्ध आहेत. दिवसेंदिवस नियतकालिके, साप्ताहिके याचे प्रकाशन नियमित काढणे हे कठिण होत आहे. तरीही केवळ बातम्या आणि माहिती देणारे असे स्वरुप किरातचे न राहता आपल्या घरातील सदस्याची भूमिका किरातसांभाळत असल्याचा अभिमान आम्हाला वाटतो आणि म्हणूनच शंभराव्या वर्षातील ही जबाबदारी शतपटीने वाढली आहे. अर्थातच याचे श्रेय वाचक, हितचितक आणि जाहिरातदार यांच्यासह किरात विश्वस्तांनाही जाते. ही सर्व मंडळी किरातला विस्तारीत कुटुंबाचा एक भाग समजतात, याचा अनुभव किरात वास्तू नुतनीकरण, शताब्दी विशेष अंक आणि या स्नेहमेळाव्यातही आला आणि यापुढेही येत राहील, हा विश्वास आम्हाला कायमच आश्वस्त करील. किरातची शतकोत्तर वाटचाल आपणा सर्वांच्या साथीने, सहकार्यानेच सुकर होईल याची आम्हाला खात्री आहे.

 

Leave a Reply

Close Menu