वेंगुर्ल्याचे आध्यात्मिक महाभूषण सद्गुरु पूर्णदासबाबा यांची १५२वी पुण्यतिथी

 ‘शकुन रत्नमाला‘ प्रकाशित

‘‘या कोंकणीच्या पुंडलिका ।

तुम्ही कदापि विसरु नका ।

ज्याने आपुला केला सखा । 

दीनोद्धारक जगद्गुरु ।।‘‘

      संतकवी ह.भ.प.दासगणू महाराजांनी यथार्थ शब्दांत गौरविलेले आपले सद्गुरु पूर्णदास बाबा उसपकर खरोखरच वेंगुर्ल्याचे आध्यात्मिक महाभूषणच आहेत यात मुळीच शंका नाही. कारण, स्वतःच्या भक्तिसामर्थ्याने त्यांनी साक्षात विठ्ठल रखुमाईला आपलेसे केले. इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष पांडुरंग रुक्मिणीसह त्याकाळी उभादांडा येथील पूर्णदासांच्या घरी अवतीर्ण होऊन वृद्धापकाळात या दांपत्याने पूर्णदासबाबांची सेवा शुश्रुषा केली. न भूतो न भविष्यतीअशी ही घटना आपल्या वेंगुर्ल्यात दीड-दोनशे वर्षांपूर्वी घडली. हा एक चमत्कारच म्हणावा लागेल.

        अशा या थोर साक्षात्कारी संताची १५२वी पुण्यतिथी ज्येष्ठ शु.द्वितीया म्हणजे बुधवार दि. १ जून २०२२ रोजी उभादांड्याच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात साजरी झाली. त्यानिमित्ताने त्यांचे अप्रकाशित राहिलेले शकुन रत्नमालाहे ज्योतिषविषयक लोककल्याणकारी छटेखानी पुस्तक प्रकाशित होत आहे. ही प्रकाशनाची कामगिरी श्री.वासुदेव मंगेश राजाध्यक्ष आणि त्यांचे धाकटे बंधू उभादांडास्थित गजानन मंगेश राजाध्यक्ष या वयोवृद्ध बंधूंनी पार पाडली, ही खास गौरवाची व अभिनंदनाची बाब ठरेल.

      हे पुस्तक लोकोपयोगी आहे. ह्यात तिथीवारानुसार आणि मराठी मासानुसार शकुनांचे सहा भागात विवरण केले आहे. ह्याची मांडणी पद्यमय असून विविध मुहूर्त / लाभ, हानी, होराशास्त्र आदी बाबींचे मार्मिक विवेचन पूर्णदासबाबांनी केले आहे. ते खरोखरच आजही ज्योतिषशास्त्र अभ्यासकांना व जिज्ञासूंना उपयोगी ठरेल असेच आहे. तसेच या पुस्तकात आजमिती पावेतो अंधारात राहिलेले पूर्णदासबाबांचे चमत्कार व आठवणी कै.विश्वंभर जयवंत उसगांवकर ह्यांनी गुण गाईन आवडीहा लेख लिहून प्रकाशात आणले आहेत. शिवाय ह्या पुस्तकात संतकवी दासगणू विरचित श्री भक्तिसारामृतातील पूर्णदासांचे चरित्र वर्णिलेला अध्याय समाविष्ट आहे. अखेरच्या भागात भक्त भाविकांसाठी पूर्णदास विरचित नित्यपाठ दिला आहे. एकंदरित सदर पुस्तक उत्कृष्ट मुखपृष्ठ व आतील ईश्वरी रंगीत छायाचित्रांसह लक्षवेधी व वाचनीय झाले आहे यात शंका नाही. ह्या पुस्तकासाठी मालाड, मुंबई स्थित वासुदेव मंगेश राजाध्यक्ष यांना त्यांच्या २८८९६४२० / ९९६९३४४२०० अथवा गजानन मंगेश राजाध्यक्ष (उभादांडा) यांना त्यांच्या ८३७८९७१९५५ या भ्रमणध्वनीवर हाकदिल्यास ते देतील यात संदेह नाही.

      प्रस्तुत लेखकांस प्रामुख्याने सदर पुस्तकांत नमूद केलेले पूर्णदासबाबांचे दोन चत्मकार येथे उद्धृत केल्यावाचून रहावत नाही, इतके ते मर्मभेदी आणि विलक्षण आहेत. वाचक भक्तीभावाने बाबांच्या चरणी नतमस्तक होतील.

      १) ह.भ.प.पूर्णदासबाबा हे पंढरीचे वारकरी होते. सहज मिळतील त्या वारकरी शिष्यांसह ते दरवर्षी पंढरीला जायचे. दीडशे वर्षा मागचा तो काळ. देशात रेल्वेही सुरू झालेली नव्हती. मजल दरमजल करीत पदयात्रेने पंढरी गाठावी लागे. मोठे रस्ते अगदीच कमी असून अपवाद वगळता पायवाटाच वारक-यांच्या वाट्याला यायच्या. रानावनातूनही जावे लागे.

      अशाच एका पदयात्रेत बाबांना दुपारचा मुक्काम सोडायला उशिर झाला. त्यामुळे पुढील मुक्काम यायच्या आधीच सूर्यास्त झाला. तरीसुद्धा पुढील मुक्काम गाठण्याच्या निर्धाराने ही सतमंडळी चालतच राहिली. पायवाट रानातून जात होती. आकाश ढगाळलेले. अंधार गडद होत चालला. पुढे तर वाट दुभंगलेली दिसली. यातील कोणता फाटा नियोजित मुक्कामाला नेईल ते कळेनासे झाले.

      इतक्यात थोड्याशा अंतरावर एक घर दिसू लागले. अंधारातही घराच्या रुपाने वारक-यांना आशेचा किरणच दिसला होता. त्यांची पावले त्या घराच्या दिशेने वळली. तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे घराला वर छप्पर असलेली उघडी ओसरी होती. अतिथींना परवानगीविना प्राथमिक आसरा मिळावा यासाठी ही पद्धती रुढ होती. सर्वांनी आपले सामान त्या पडवीत ठेऊन सुटकेचा निःश्वास टाकला!!

      वारकरी पडवीत बसतात न् बसतात तोच आतून एक महिला पेटती समई घेऊ आली आणि ती वारक-यांसमोर ठेऊन आत निघून गेली. घरच्या मंडळींनी वारक-यांची दखल घेतली होती. रात्रीच्या आहाराची वर्दीही लागल्यासारखी होती. कारण, त्या जमान्यात अतिथींना बाहेर उपाशी ठेऊन आत कुणीही जेवत नसत. अतिथींना आवर्जून सत्कार करण्याचा प्रघात होता.

      हातपाय धुवायला पाण्याची वाट न पहाता पूर्णदासांनी शिष्यांसह भजनाला सुरुवात केली. टाळ, वीणा वगैरे वाद्ये त्यांच्याकडे होतीच. बराच वेळ भजन चालले होते. शारिरीक श्रमांवर मानसिक समाधानाने मात केली होती. वारकरी तहानभूक विसरले होते. 

      अतिथींची विचारपूस करायला कुणीही येत नाही हे पाहून एका उतावळ्या शिष्याने ओसरीवरुन घरात प्रवेश करायच्या दारातून आत डोकावून पाहिले आणि त्याला घाम फुटला. तो भितीने थरथरु लागला. आतील भागात भयानक रुपाच्या स्त्रिया आपापसात बोलता बोलता विकट हास्य करीत होत्या. तो शिष्य लगबगीने बाबांजवळ आला आणि भजनात व्यत्यय येऊ न देता आत चाललेला प्रकार त्याने बाबांच्या कानावर घातला. तो ऐकून पूर्णदासांच्या मनाची किचितही चलबिचल झाली नाही. मात्र, आपले एक पाऊल त्यांनी समईच्या तळावर ठेवले.

      भजन रामप्रहारापर्यंत चालले होते. इतक्यात अवचितपणे ते घर त्यातील रहिवाशांसह अदृश्य झाले होते. घराच्या जागी एक मोटा रानटी वृक्ष दिसू लागला. मात्र, समई अजूनही तेवत होती. ती गायब होऊ शकली नाही. तिच्या तळावर या क्षणीही बाबांचे समर्थ पाऊल होते ना! वारकरी मंडळींनी रात्रभर एका झाडाचाच आश्रय घेतला होता तर! भक्तवत्सल विठोबाने आपल्या भक्तांना भुताटकीच्या संकटातून वाचविले होते.

         अरुणोदय होताच बाबांनी पुढची वाटचाल सुरू केली. उर्वरित प्रवास निर्विघ्नपणे पार पडला. पूर्णदासांच्या शिष्यवर्गाने ती भुताटकीतून बचावलेली समई बरोबर घेतली होतीच. बाबांनी ती श्री पांडुरंगाला अर्पण केली. आज दीड/दोनशे वर्षानंतरही ती समई ‘‘बाबा उसपकरांची समई‘‘ या नावाने ओळखली जाते असे ऐकतो. या लेखाच्या वाचकांपैकी ज्या व्यक्ती पंढरपूरला जातील, त्यांनी वयोवृद्ध जाणकार बडव्यांना भेटून समई पाहिल्यावरच घरी परतावे.

      २) पूर्णदास महाराजांचा मुक्काम गोव्यातील हरमलया गावी होता; त्यावेळची ही एक सत्यकथा. बाबांच्या निवासस्थाना शेजारी केणी यांचे घर होते. त्या कुटुंबात मिळवता असा एकच तरुण होता. तो आजारी पडला आणि त्या आजारातच त्याचा अंत झाला. केणी कुटुंबियांवर आभाळ कोसळले होते. त्यांचा आक्रोश आणि विलाप ऐकून त्या परिसरातील बहुतेक सर्व माणसे केणींकडे जमा झाली. आपापल्या परीने शोकग्रस्त कुटुंबियांचे सांत्वन करू लागली. परंतु, त्याचा त्या कुटुंबियांवर काही परिणाम होत नव्हता. ती दुःखी मंडळी अधिकच शोक करू लागली. जमलेल्या जनसमुदायात बाबा उसपकरही होते. बाबांच्या सामर्थ्याची पारख असलेले एक गृहस्थही त्या जमावात होते. त्यांनी मृत व्यक्तीच्या आईला सांगितले, ‘हे एक साक्षात्कारी संत अनायासे तुमच्या घरी आलेले आहेत. त्यांचे पाय धर. तेच तुला या संकटातून सोडवू शकतील.हे ऐकताच बाबा नाराज झाले. या गृहस्थांचा माझ्याविषयी झालेला गैरसमज ते बोलून गेले. त्यात काही तथ्य नाही.असे बाबांनी त्या दुःखी मातेला सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘श्री पांडुरंगच तुला या संकटातून सोडविण्यास समर्थ आहे. त्याचा धावा करून बघ.त्यावर ती माता काहीच बोलली नाही. तिने बाबांचे पाय घट्ट धरून ठेवले आणि माझ्या लक्ष्मणाला तुम्हीच जीवंत केले पाहिजे.असा एक सारखा टाहो फोडू लागली. पूर्णदासांचा निरुपाय झाला. त्यांनी मनोमन विठोबाला साकडे घातले आणि ते त्या प्रेताच्या जवळ जाऊन बसले. सर्व जमावाची दृष्टी बाबांकडे लागलेली होती. बाबांनी मृत्याच्या कानाजवळ तोंड नेऊन, झोपलेल्याला जागे करावे त्या पद्धतीने लक्ष्मणा, राम खयं रे?‘ हे वाक्य तिनदा उच्चारले. इतक्यात मृत देहात प्राण आला. लक्ष्मण जीवंत झाला. विठूराया पूर्णदासांना पावला होता.

      केणी कुटुंबियांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. लक्ष्मणाच्या आईला तर आकाश ठेंगणे वाटू लागले. जमावातील प्रत्येकजण पूर्णदासांच्या चरणांवर मस्तक ठेऊन दर्शन घेऊ लागला. त्यातले काहीजण जागा अपुरी पडते याचे भान न राहिल्यामुळे शाष्टांग नमस्कार घालू लागले. हा दर्शनाचा सोहळा कित्येक तास चालला होता, असे सांगतात. हरमलगावात ही शुभवार्ता सोसाट्याच्या वा-याप्रमाणे पसरली. पुढे दुस-यादिवसापासून बाबांच्या निवासस्थानी दर्शनार्थींची रीघ लागू लाली. यांत शेजारच्या गावातील लोक असत. प्रसिद्धीला कंटाळून बाबांनी तातडीने हरमलगाव सोडले. त्यांच्या वाढत्या प्रसिद्धीनेच यांना तसे करायला लावले होते. हरमलसोडल्यानंतर ते मजल दरमजल करीत वेंगुर्ल्यास आले आणि उभादांडा येथे स्थायिक झाले.

      सद्गुरु पूर्णदासबाबांचे वेंगुर्ल्यावर निरतिशय प्रेम जडले! ते येथून पुढे कुठेही गेले नाहीत…!!

      – प्रा.सीताराम उर्फ काका गिरप, विरार

      मोबा. ९२२१४८७२३९

 

Leave a Reply

Close Menu