शिस्तबद्द जलपर्यटन – कोकण विकासाची गरज

कोकणातील साहसी पर्यटन – दुसरी बाजू …..

प्रत्येक विषयाची एक चांगली बाजू असते आणि एक वाईट बाजू असते. वाईट अनुभव आला म्हणून सगळं वाईट किंवा चांगला अनुभव आला म्हणून सर्व चांगले असे होत नाही. कोकणातील वॉटर स्पोर्ट्स आणि स्कुबा डायविंग यात आलेला वाईट अनुभव हा विषय सध्या चर्चेत आहे. सर्वप्रथम या वाईट अनुभवांबद्दल दिलगिरी व्यक्त करतो व या निमित्ताने व्यक्त झालेल्या भावनांचा आदर करुन मी याच विषयाची दुसरी बाजू मांडत आहे.

      कोकणातील नितांत सुंदर समुद्र किनाऱ्यांवर आणि सह्याद्रीतील समृद्ध निसर्गात पर्यटन विकसित होण्यासाठी विविध ऍक्टिव्हिटीची आवश्‍यकता आहे. केवळ सुंदर निसर्ग आहे म्हणून काही प्रमाणात पर्यटक येतील. पण या पर्यटकांना आपण विविध उपक्रम देऊ शकलो तर हे पर्यटन खूप पटीने वाढेल आणि त्यामुळे अधिक खर्च पर्यटक कोकणात करतील आणि यातून खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊ शकेल. गेल्या दहा-पंधरा  वर्षात जलपर्यटन, वॉटर स्पोर्ट्स आणि साहसी पर्यटनामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि कोकणात प्रचंड मोठ्या प्रमाणात पर्यटन उद्योग विकसित झाला.

      साधारण 17-18 वर्षांपूर्वी कोकणामध्ये खऱ्या अर्थाने साहसी आणि जलपर्यटन विकासाला वेग आला. गोव्याप्रमाणे कोकणात साहसी पर्यटन आणि वॉटरस्पोर्टस्‌च्या परवानग्या मिळाव्यात याकरिता कोकणभूमी प्रतिष्ठान म्हणून आम्ही आग्रही होतो. त्यावेळेचे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे श्रीवास्तव साहेब, माजी मुख्य सचिव द. म. सुकथनकर आणि कॅप्टन करकरे अशी चर्चा होऊन या परवानग्या कोकणात दिल्या जाव्यात याकरता धोरण बनवण्यासाठी कॅप्टन करकरे यांनी मदत केली. आणि कोकणात वॉटर स्पोर्ट्स या विषयाला परवानग्या मिळणे सुरु झाले. याच दरम्यान डॉक्टर सारंग कुलकर्णी यांनी अंदमान प्रमाणे कोकणात समुद्राच्या तळाशी समृद्ध जैवविविधता आहे म्हणून पर्यटन विभागाच्या मदतीने स्कुबा डायविंग हा उपक्रम सुरू केला. सुरुवातीला स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देऊन स्कुबा डायविंग हा अतिशय देखणा उपक्रम तारकर्ली-देवबाग सिंधुदुर्ग परिसरात सुरू झाला. याच वेळी अलिबाग, नागाव, काशीद, दापोली, मुरुड   याठिकाणी वॉटर स्पोर्ट्स व्यवसाय स्थानिक तरुणांनी सुरू केला. याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आज कोकणात दरवर्षी पंधरा वीस लाखांहून अधिक पर्यटक जलक्रीडा, वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेतात. आत्ता गुहागर, गणपतीपुळे, वसई, लाडघर, श्रीवर्धन, हरिहरेश्‍वर, दिवेआगर जवळपास कोकणातील प्रत्येक प्रमुख समुद्रकिनाऱ्यावर वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येतो. काही तरुणांनी 70-80 लाख रुपयांची गुंतवणूक करून समुद्रातल्या पॅरासेलिंगच्या अद्ययावत बोटी आणल्या आणि त्यामुळे जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांवर झाल्या. आज किमान एक हजारहून अधिक उद्योजक कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांवर वॉटर स्पोर्ट्स उद्योग करतात. पॅरासेलिंग, वॉटर स्कूटर, वेगवेगळ्या वॉटर राइड्स हा सर्व अनुभव घेता येतो आणि किमान दहा हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह या पर्यटनामुळे चालतो. हे पर्यटन कोकणात विकसित झाल्यामुळे कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या दहा पटीने वाढली आणि त्यामुळे हॉटेल, लॉज प्रवास करण्यासाठी गाड्या, खानपान व्यवस्था असा सर्व बाजूने काही हजार कोटींचा पर्यटन व्यवसाय कोकणात विकसित होत आहे. हे सर्व करण्यासाठी परवानगी देणाऱ्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि पर्यटन विभागाचे आपण आभार व्यक्त केले पाहिजेत. अर्थात या व्यवसायात अधिक सुसूत्रता आणि नियमांचा काटेकोरपणे वापर या करता व्यवस्था निर्माण केल्या पाहिजेत ही शासनाकडून अपेक्षा आहे.

      कोकणात अनेक तरुण अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा व्यवसाय करत आहेत. उदाहरण तारकर्लीचे राजन कुमठेकर, कोलाडच्या नदीवर साहसी पर्यटन विकसित करणारा महेश सानप, हा व्यवसाय कोकणामध्ये वाढावा यासाठी व्यावसायिक पद्धतीने काम करणारा प्रफुल्ल पेंडुरकर, काशीदचे रमेश कासार आणि सर्वात महत्त्वाचे डॉक्टर सारंग कुलकर्णी यासारखे अनेक तरुण उद्योजक या क्षेत्रात प्रचंड काम करत आहेत. जागतिक दर्जाचा पर्यटनाचा अनुभव कोकणात पर्यटकांना मिळेल अशी व्यवस्था करत आहेत. संस्था म्हणून जिल्हा स्तरावर बाबा मोंडकर, राजू भाटलेकर, संजय नाईक, महादेव निजाई, आशिष पाटील असे अनेक कार्यकर्ते या विषयात काम करत आहेत.

      संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटन हे वॉटर स्पोर्ट्स आणि स्कुबा डायविंग या उपक्रमांमुळे पूर्णतः बदलले. लाखो पर्यटक देशभरातून केवळ वॉटर स्पोर्टस ॲक्टिविटी करता कोकणात येऊ लागले आहेत आणि यात देवबाग, तारकर्ली, मालवण हे सर्वात आघाडीवर आहे. यातून एक मोठी अर्थव्यवस्था या परिसरात उभी राहिली आणि या व्यवसायामध्ये अनेक स्थानिक तरुण अतिशय चांगले काम करत आहेत.

      शुन्य पर्यटनाचा व्यवसाय असलेली कोलाडची कुंडलिका नदी. या नदीवर दर वर्षी दोन-तीन लाख पर्यटक वॉटर राफ्टिंग आणि नदीतील स्कुबा डायविंग अशा अनेक साहसी पर्यटनाच्या ॲक्टिविटीचा आनंद घेतात. महेश सानप या तरुणाने सुरू केलेली जल पर्यटनाची व्यवसायिक चळवळीमुळे फक्त कुंडलिका नदीवर 70 अत्याधुनिक रिसॉर्ट विकसित झाले आहेत आणि जागतिक दर्जाचे पर्यटन या नदीवर विकसित झाले. सांगायला अभिमान वाटतो महाराष्ट्रातली बंजी जम्पिंगची पहिली व्यवस्था कुंडलिका नदीवर एका युरोपियन कंपनीच्या मदतीने महेश सानपने सुरू केली आहे. शून्य अर्थव्यवस्था असलेल्या सह्याद्रीतल्या एका नदीवर 200 कोटी पेक्षा जास्त अर्थव्यवस्था केवळ या पर्यटनामुळे विकसित झाली आहे.

      यापूर्वीच्या काळामध्ये काशिद, गणपतीपुळे, गुहागर, अलिबाग, वसई, तारकर्ली येथे दरवर्षी पर्यटक बुडून अपघात होत होते. पण या सर्व किनाऱ्यांवर जल पर्यटनाच्या सुविधा निर्माण झाल्यामुळे या किनाऱ्यावर वॉटर स्कूटर आणि सर्व सुविधा निर्माण झाल्या आहेत. यामुळेच या समुद्र किनाऱ्यावर अनेक बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्याचे काम वॉटर स्पोर्ट्स चालवणारे तरुण करतात. शेकडो पर्यटकांना बुडण्यापासून वाचवण्याचे काम याच साहसी पर्यटनाच्या विकासामुळे व अशा स्वरूपाचे व्यवसाय समुद्रकिनाऱ्यावर करत असलेल्या तरुणांमुळे होत आहे. आज पर्यंत कोकणाच्या समुद्रकिनाऱ्यांवर बुडणाऱ्या शेकडो पर्यटकांना वाचवण्याचे काम कोकणातील वॉटर स्पोर्ट्स चालवणाऱ्या तरुणांनी केले आहे. नकारात्मक विषयांची जशी भरपूर चर्चा होते तसेच या विषयात अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या आहे आणि घडत आहेत या लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत.

      अर्थात या विषयात काम करणाऱ्या व्यावसायिकांच्या आणि निसर्ग सानिध्यात उत्तेजित झालेल्या पर्यटकांच्या बेफिकिरीमुळे आणि निष्काळजीपणामुळे यात होणाऱ्या अपघातांची पाठराखण करणे हा या लेखाचा बिलकुल उद्देश नाही.

      किंबहुना कोकणातील वॉटर स्पोर्ट्स आणि जलपर्यटन शून्य किंवा कमीत कमी अपघाताचे व्हावेत याकरिता सर्वांनी एकत्र प्रयत्न करायला हवा. या व्यवसायातील मुख्य घटक एक पर्यटन व्यवसायिक, साहसी  पर्यटन आणि वॉटर स्पोर्ट्स चा अनुभव हवा असलेले पर्यटक आणि या संपूर्ण व्यवसायावर नियंत्रण असलेले शासनाचे विभाग सर्वांनी परस्पर समन्वयातून अधिक चांगला कोकण पर्यटनाचा अनुभव पर्यटकांना कसा मिळेल यावर काम करणे आवश्‍यक आहे. याकरता व्यावसायिकांचे सातत्याने प्रशिक्षण आवश्‍यक आहे.

पर्यटकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य हवे

      पर्यटक पैसे द्यायला तयार आहेत. मात्र त्यांना सर्वोत्तम सुरक्षितता आणि सुविधा द्यायला हव्यात. त्यामुळे एकमेकांशी स्पर्धा करून बार्गेनिंग करणे आणि कमीत कमी किंमतीमध्ये वॉटर स्पोर्ट्स सुविधा देणे हे बंद केले पाहिजे. खूप पर्यटकांना सेवा द्यायची असा आग्रह पर्यटन व्यवसायिकांनी बंद करून कमी पर्यटकांना दर्जेदार आणि सुरक्षित सेवा द्या, चांगले पैसे घ्या आणि सर्वोत्तम सुरक्षित सुविधा निर्माण करा. कमीत कमी किंमतीमध्ये आम्हाला स्कुबा डायविंग आणि वॉटर स्पोर्ट्स हवे असा आग्रह पर्यटकांनी धरणे सुद्धा बंद केले पाहिजे. जगभर आणि देशभर वॉटर स्पोर्टसाठी जे शुल्क घेतले जाते तेच शुल्क कोकणात घेतले पाहिजे. पैसे कमी करणे हा उद्देश न ठेवता चांगल्या व सुरक्षित व्यवस्था देणे हा उद्देश ठेवला पाहिजे.

      कोकणात कमी पैशात स्कुबा डायविंग, वॉटर स्पोर्ट्स आणि पर्यटन करता येते असे आपले ब्रँडिंग होता कामा नये. तर कोकणात जागतिक दर्जाचे वॉटर स्पोर्ट्स होते अशा स्वरूपाचा ब्रँड विकसित झाला पाहिजे. याकरता सप्ततारांकित निसर्ग देवाने आपल्याला दिला आहे. फक्त त्या दर्जाच्या व्यवस्था आणि सुरक्षितता आपल्याला निर्माण करावी लागेल.

नियम मोडणारे व्यावसायीक आणि पर्यटक नकोच

      बोटींची जितकी क्षमता आहे त्यापेक्षा अधिक एकही पर्यटक बोटीत चढता कामा नये. पर्यटक ग्रुपने कितीही आग्रह केला तरी अधिक उत्पन्नासाठी अशा स्वरूपाची चूक करता कामा नये. प्रत्येक पर्यटकाला लाईफ जॅकेट दिलेच पाहिजे. काही होणार नाही आम्ही लाईफ जॅकेट घालत नाही असा आग्रह धरणाऱ्या पर्यटकांना बोटीवर चढू देता कामा नये. बोटीत बेजबाबदार पणे चालणाऱ्या, नाचणाऱ्या पर्यटकांना नियमांचे नीट पालन करण्याचा आग्रह धरला पाहिजे अन्यथा बोटीच्या खाली उतरवले पाहिजे.

      जितकी शिस्त नियम बोट चालकाने पाळले पाहिजे तितकीच शिस्त जल पर्यटनाचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांनी सुद्धा पाळली पाहिजे आणि याचा आग्रह सर्वांनी धरला पाहिजे.

      या पर्यटन व्यवसायाशी संबंधित असलेल्या त्या त्या ठिकाणच्या व्यवसायिकांनी आणि तरुणांनी व त्यांच्या स्थानिक संघटनांनी स्वयंशिस्त आणि स्वतःचे सुटसुटीत नियम बनवले पाहिजेत आणि ते नियम सर्वत्र पाळले जातील असा आग्रह धरला पाहिजे.

      साहसी पर्यटनासाठी समुद्रात किंवा खाडीमध्ये फिरताना एकदम छोट्या मुलांना सोबत नेणे हे पर्यटकांनी टाळले पाहिजे.

      या  व्यवसायाशी संबंधित असलेल्या शासनाच्या विभागांनी विशेषता महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने चांगली व्यवस्था उभारणे आवश्‍यक आहे. व्यवसायिकांना किंवा पर्यटकांना त्रास न देता हा व्यवसाय वाढेल असे पूरक धोरण स्वीकारून मात्र कडक नियमांची अंमलबजावणी केली जाईल याकरता दक्ष व्यवस्था उभारायला हव्यात.

      कोकण पर्यटन विषयात काम करणाऱ्या त्या त्या ठिकाणच्या जिल्हास्तरावरच्या व तालुका स्तरावरच्या संघटना आणि संपूर्ण कोकणाच्या संघटना या सर्वांनी परस्पर समन्वयातून या विषयात काम करण्याचा आपण संकल्प करूया.

-संजय यादवराव,

संस्थापक- समृद्ध कोकण पर्यटन संघटना, 9833267817

Leave a Reply

Close Menu