मुंबई दूरदर्शनचा शिलेदार निवृत्त होतोय!

आज जगात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडी क्षणाक्षणाला आपल्यापर्यंत पोहचत असतात. परंतु पुर्वी या घडामोडी दूरदर्शनच्या माध्यमातून कळत असायच्या. या बातम्यांमुळे जगात काय चालले आहे ते कळायचे. त्यामुळे या बातम्या लोक आवर्जून बघायचे. अशा या ‘मुंबई दुरदर्शन’ वाहिनीवर पाल गावातील एक व्यक्ती काम करत होती. या वाहिनीवर अनेक जबाबदाऱ्या सांभाळून 31 मे 2022 रोजी सन्मानाने निवृत्त होत आहे ते म्हणजे आपले श्री. लिलाधर गावडे.

      श्री. लिलाधर गावडे यांची ओळख पाल गावाला करून द्यायची गरज नाही. ती ओळख त्यांनी आपल्या सामाजिक कामातून निर्माण केली आहे. प्रत्येक माणसाला आयुष्यात कौटुंबिक तसेच सामाजिक अडचणी असतात. तशा या ही माणसाला आल्या. परंतु अशा अडचणीचे डोंगर पार करून आपले ध्येय गाठणे कठीण असते. लिलाधर गावडे यांनी ते सहकाऱ्यांच्या मदतीने शक्य केले.  मुंबई दूरदर्शनसोबत काम करताना पाल ग्रामोन्नती मंडळाचे ते अनेक वर्षे महत्वाचे सचिव पद संभाळत आहेत. त्यांच्या सचिव पदाच्या कार्यकाळात सहकाऱ्यांच्या मदतीने सुंदर अशी श्री खाजणादेवी आणि श्री भूमिकादेवी यांच्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात आला.  त्यामुळे श्री. लिलाधर गावडे हे गावात सर्व  परिचित आहेत. आज ते अणसूर-पाल विकास मंडळाच्या सचिव पदीही काम करत आहेत.

      एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या एका व्यक्तीने मुंबईत येऊन मुंबई दूरदर्शनसोबत काम करणे ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. पाल गावात त्यावेळी चौथी ते पाचवी पर्यंत शाळा होती. पुढील दहावी पर्यंतचे शिक्षण मातोंड हायस्कूल येथे झाले. त्यानंतर बारावी पर्यंतचे शिक्षण मुंबईत छोटी मोठी नोकरी करूनच घ्यावे लागले. बारावी नंतर आय.टी.आय. करून मुंबई दूरदर्शनला वयाच्या 19व्या वर्षी रुजू झाले. त्या दिवसापासून आजपर्यंत जवळजवळ गेली 40 वर्षे नवनवीन गोष्टी शिकत त्यांनी मुंबई दूरदर्शनसोबत अनेक पदांवर काम करून सन्मानाने निवृत्त होत आहेत. दूरदर्शनच्या कृष्णधवल ते रंगीत आणि Analog ते HD पर्यंतचा प्रवास अनुभवणाऱ्यांपैकी ते एक आहेत. ओबी सेक्शनमध्ये काम करताना त्यांनी अनेक महत्वाच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व्यक्ती तसेच संस्थांसोबत काम केले.

      येथे नमूद करण्याजोग्या दोन आठवणी अश्‍या की जेव्हा अमेरिकेचे पूर्व पंतप्रधान श्री. बराक ओबामा सपत्नीक भारत दौऱ्यावर असताना मुंबईत झालेल्या कार्यक्रमात उत्तम कामगिरी बद्दल त्यांना पुरस्कृत करण्यात आले आणि दुसरे म्हणजे जपानी शिष्टमंडळ मुंबईभेटीवर असताना त्यांना विशेष कामगिरी बद्दल जपानी शिष्टमंडळाने भेटवस्तू दिली होती. 2019 साली भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी जेव्हा केदारनाथ धाम येथे गेले होते तेव्हा अत्यंत आव्हानात्मक स्थितीत त्यांनी आणि सहकाऱ्यांनी उत्तमरित्या काम सांभाळले होते. सगळ्यात मोठे आव्हान असे की, उणे तापमानात आणि भाविकांची गर्दी सांभाळत पूर्ण सेटअप तयार करणे, हे काम त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने लीलया पार पाडले.

      सामाजिक बांधीलकीवर प्रचंड श्रद्धा असणाऱ्या या माणसाने नोकरी आणि घर या दोन्ही आघाड्या उत्तमरीत्या पार पाडत आहेत. यात त्यांना त्यांच्या सौ. विनया गावडे यांची मोलाची साथ लाभली आहे. आई-वडीलांचे (कै.विठ्ठल रामचंद्र गावडे, कै.रुक्मिणी विठ्ठल गावडे) आशीर्वाद, मोठे बंधु आणि वहिनी (कै.डॉ. रामचंद्र विठ्ठल गावडे, कै.सिताबाई रामचंद्र गावडे) आणि कुटुंबातील थोरामोठ्यांचे आशीर्वादानेच ते इथपर्यंत पोचू शकले. सगळ्या आघाड्या सांभाळताना त्यांनी जीव लावणारी खूप मित्र मंडळी जोडली आहेत आणि हि त्यांची सगळ्यात मौल्यवान पुंजी आहे. आता निवृत्ती नंतर एका नवीन वाटचाली साठी खूप शुभेच्छा आणि ‘A hero never retires’.  सदर लेख श्री लीलाधर गावडे यांना मिळालेल्या शुभेच्छांचे संकलन आहे.

-वैभवी लिलाधर गावडे, 8454020863

Leave a Reply

Close Menu