क्षण महत्त्वाचा

कोरोनाच्या सावटाखाली पार पडलेल्या बारावी परीक्षांचा निकाल ८ जून रोजी लागला. आयुष्याला दिशा देण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या जीवनातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा. त्यामुळेच परीक्षेपेक्षाही जास्त काळजी या निकालाचीच असते. अलिकडे तर आदल्या दिवशी निकालाची तारीख जाहीर होत असल्याने बरीच मुले आणि मुलांपेक्षा पालक चिताग्रस्त दिसतात. कधी निकालाच्या तारखांचे गोंधळ, सोशल मिडियावरच्या अफवा, अगदीच काही नाहीतर बोर्डाने केलेल्या गफलतीचे ऐकलले किस्से. त्यामुळे निकाल हातात मिळेपर्यंत जीव कासाविस झालेला असतो.

      एकदाचा निकाल हातात पडला की, पास झालेल्याचे समाधान व्यक्त होते. पण ब-याच ठिकाणी केवळ गैरसमजामुळे किवा पालक आणि मुलांच्या संवादातील अभावामुळे कित्येकदा मुल टोकाचे निर्णय घेताना दिसते. परीक्षेत मिळालेल्या गुणाच्या आकडेवारी पेक्षाही आपल्या मुलाचा जीव व त्याचे मानसिक संतुलन कधीही महत्त्वाचेच आहे. कारण, आयुष्याच्या टप्प्यातील हा महत्त्वाचा क्षण जरी असला तरी तो शेवटचा नाही. समजा मनासारखा निकाल लागलाही नसेल तरी योग्य मार्गदर्शन घेऊन अनेक वाटा आपल्यासाठी उपलब्ध असतात. एका अपेक्षाभंगाने किवा अपयशाने त्यावेळेला मानसिक त्रास होईल. पण अशावेळी आपल्या मनातील या विचारांना योग्य दिशा देण्यासाठी योग्य व्यक्तिशी संवाद साधणे गरजेचे आहे. सतत निकाला विषयीची चर्चा किवा तुलना न करता लोक काय म्हणतील? हा चितेचा किडा मनातून काढून टाकला पाहिजे. निकाल म्हणजे आपल्या प्रतिष्ठेची बाब नाही हे पक्के ध्यानात ठेवायला हवे. कारण, यश-अपयश, सुखदुःखाच्या कल्पना या व्यक्तिसापेक्ष असतात. आपण त्याचा बाऊ किती करतो यावर त्या अवलबून राहतात. म्हणूनच तर आत्तापर्यंतच्या शिक्षणात अनेक मान्यवर व्यक्तिच्या यशामध्ये त्यांना आलेल्या अपयशांमधून त्यांनी केलेली मात आपण अभ्यासत आलो आहोत. त्यामुळे अपयशाची कितवी पायरी यापेक्षा आपल्या ध्येयाप्रती पोहचण्यासाठी स्वतःचे सातत्याने प्रयत्न यशाची पायरी नक्की देत असते.

      कौशल्याभिमुख शिक्षण ही आता काळाची गरज आहे. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात काम करताना ते कमी पणाचे नाही हे ध्यानात घेऊन त्या त्या क्षेत्रातील कुशलता आपल्याला आपल्या ध्येयाच्या समिप नेईल याची खात्री बाळगली पाहिजे.  स्किल इंडियासारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पात रोजगाराभिमुख शिक्षणावरच भर दिला आहे. मिळालेले गुण म्हणजेच शेवटची संधी असा विचार करायला नको. बारावीनंतर आपली आवड, सांपत्तिक स्थिती, निवडलेल्या क्षेत्रात रोजगाराच्या संधीची उपलब्धता या सर्वांचा विचार करुन क्षेत्र निवडता येईल. करिअर विषयक योग्य सल्ला, प्रयत्नातील सातत्य आपल्या यश आणि समाधान मिळवून देईल. त्यामुळे ताण न घेता या क्षणाला आपण आणि आपले कुटुंब सक्षमपणे सामना करु हा विश्वास मनात ठेऊन मार्गक्रमण करूया.

Leave a Reply

Close Menu