‘पांडुरंगाची वस्त्रे ओली चिंब व्हायची…!’ प.पू. पूर्णदासबाबांचा अनोखा चमत्कार

 ‘शकुनरत्नमाला’ प्रकाशित

      पू.पू. पूर्णदासबाबा उसपकर यांची 152 वी पुण्यतिथी ज्येष्ठ शु. द्वितीया म्हणजे बुधवार दि. 1 जून 2022 रोजी उभादांडा येथील विठ्ठल मंदिरात साध्या व घरगुती पद्धतीने साजरी झाली. त्यानिमित्ताने बाबांचे ‘शकुन रत्नमाला’ हे पुस्तक विठ्ठल चरणी अर्पण करुन प्रकाशित करण्यात आले. याप्रसंगी मोजकीच पण जाणकार मंडळी उपस्थित होती.

      सदर पुस्तकात बाबांचा एक अनोखा चमत्कार वाचावयास मिळाला. तो असा, पांडुरंगाची वस्त्रे ओली चिंब व्हायची-

      उभादांडा येथील विठ्ठल मंदिरात त्यांच्या शिष्यवर्गाचा भजनाचा कार्यक्रम होत असे. त्यात बाबाही भाग घ्यायचे. अनेकदा बाबा तासन्‌ तास भजनात रंगून जात. श्रमामुळे आपल्या अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत याची त्यांना जाणीवही होत नसे. ‘ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाते सांभाळी?’ असा हा प्रकार होता. मात्र अशा प्रत्येक वेळी मंदिरातील विठ्ठलाच्या मूर्तीलाही तसाच घाम यायचा. पांडुरंगाची वस्त्रे ओलीचिंब व्हायची. तथापी बाबांना हे माहित नसायचे. असे होता होता काही वर्षांच्या अनुभवानंतर बाबांच्या एका ज्येष्ठ शिष्याने नियमितपणे होणारा हा चमत्कार मोठ्या अभिमानाने आणि आनंदाने बाबांना सांगितला. झाले! त्या दिवसापासून बाबांनी आपले भजन कधीही लांबविले नाही. कटाक्षाने थोड्या वेळातच ते भजन आटोपते घेऊ लागले. पांडुरंगाला श्रम होणे त्यांना आवडण्यासारखे नव्हते! तो चमत्कारही कायमचा बंद झाला हे निराळे सांगण्याची आवश्‍यकता नाही.

      प.पू. बाबांची विठ्ठलाविषयीची भक्ती इतकी पराकोटीची होती की त्यांच्याशी विठ्ठलाचे तादात्म्य व्हायचे. एकमेकांशी तादात्म्यता झाली की असे चमत्कार होतात. गोंदवले येथील प.पू. गोंदवलेकर महाराज भजन करता करता किंवा नामजप करता करता इतके तल्लीन व्हायचे की त्यांच्या डोळ्यातून अश्रूधारा ओघळायच्या आणि त्याचवेळी गोंदवल्याच्या विठ्ठल रखुमार्इंच्या डोळ्यांतूनही अश्रू टपकायचे!! संतसद्गुरु अत्यंत प्रसिद्धी पराङ्मुख असतात. त्यामुळे त्यांना कुठेही व कोणीही प्रसिद्धी केलेली आवडत नाही. परंतु लोकसंग्रहासाठी आणि लोकांनी परमार्थाकडे वळावे या उद्देश्‍याने माझ्यासारख्या अभ्यासकाला असे चमत्कार व त्यांचे चरित्र प्रकाशात आणावेसे वाटते.

प्रा. सिताराम उर्फ काका गिरप

विरार – 9221487239

Leave a Reply

Close Menu