तुज पंख दिले देवाने…

हल्लीच मुंबईला एका लग्नाला गेले होते. त्यावेळी नीताला अचानक समोर बघून मला आश्चर्य वाटले. नीता म्हणजे माझी लहानपणीची शेजारची सखी! माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी असून नापास होत होत माझ्या वर्गात आली होती. १० वीत दोनदा नापास झाल्यावर मात्र घरच्यांनी तिचे लग्न लावून दिले होते. तिच्या माहेरी गरिबी होतीच. पण सासरची परिस्थिती पण यथातथाच होती. लग्नानंतर माझा आणि तिचा काही संबंध राहिला नव्हता आणि आज अचानक या लग्नात ती मला लग्नाची केटरर म्हणून भेटली. तिच्याशी बोलताना कळले की, लग्ना-नंतर मुंबईत आल्यावर आपल्या पुरणपोळ्या करण्याच्या कौशल्यावर तिने एक मोठा उद्योग सुरू केला. त्यात घरच्या सगळ्या लोकांना तिने सामावून घेतले आणि आज मोठी उद्योजिका म्हणून तिने मुंबईत नाव कमावले आहे. मला तिचे खूप कौतुक आणि अभिमान वाटला आणि त्याचवेळी दहावी / बारावीचे निकाल जाहीर झाल्यावर आत्महत्या करणा-या अनेक मुलांचे चेहरे डोळ्यासमोर तरळून गेले. नीताने त्यावेळी निराश होऊन असा काही निर्णय घेतला असता तर? पण तिचा जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक होता आणि म्हणूनच आज ती ताठ मानेने उभी आहे.

           १७ जूनला दहावीचा निकाल लागला. काही दिवसांपूर्वी बारावीचा निकाल लागला. ब-याच जणांनी उत्तम यश संपादन केले आहे. आपापल्या आवडीच्या क्षेत्रात ते आपले करियरही करतील. पण आत्ताच्या ट्रेंडनुसार केवळ मेडिकल, इंजिनिअरिग, सी.ए. किंवा एम्.पी.एस.सी / यु.पी.एस.सी.पास होऊन त्यात यश संपादन करणे म्हणजेच करियर का? ज्यांची ते करण्याएवढी बौद्धिक क्षमता नाही त्या मुलांचे काय? ब-याचदा परीक्षेतील गुणांना महत्त्व देऊन या मुलांच्या क्षमता तपासल्या जातात. पण एखाद्याकडे बौद्धिक क्षमता कमी असेल तर कदाचित दुस-या प्रकारची क्षमता अधिक चांगली असेल. उदा. चित्रकला, सुतारकाम, नृत्य, गायन, शिलाईकाम, पाककला अशा इतर गोष्टीत ते अधिक पारंगत असतील आणि त्यांच्या या क्षमतेचा वापर करून त्यांना करियरमध्ये नवीन संधी निर्माण करता येऊ शकतात.

          आपण लहानपणी खेळताना पत्त्यांचा बंगला करायचो. त्यातला सर्वात खालचा पत्ता काढला तर काय व्हायचे? सर्व बंगला कोसळून जायचा. वैद्यकीय, इंजिनिअरिग, सी.ए. या सर्व क्षेत्रातही असेच आहे. या क्षेत्रातील फक्त वरची पदे आपण पाहतो. पण त्यांना मदत म्हणून लागणा-या इतर गोष्टींचा आणि त्यात कौशल्य प्राप्त करून करियरच्या नवीन वाटा चोखाळण्याचा आपण कधी प्रयत्न करतो का? उदा. मेडिकलचेच उदाहरण घ्यायचे झाले तर रक्त-लघवी तपासणी, एक्स-रे, एम.आर.आय., डोळ्याचा नंबर तपासणे व चष्मा तयार करणे, दातांची कवळी तयार करणे इ. कामे प्रत्यक्षात डॉक्टर करत नाहीत. तर ती कामे करण्यासाठी वेगळे प्रशिक्षण घेऊन अनेक सहाय्यक त्यांना मदत करत असतात. इंजिनिअरिग क्षेत्रातही प्रत्यक्ष इंजिनियर होता आले नाही तरी इंजिनियरना सहाय्यक म्हणून कामे करण्यासाठी पण छोटे-मोठे कोर्स आहेत. अकौटिंग क्षेत्रातही अनेक असेच कोर्स सध्या उपलब्ध आहेत. कॉम्पुटर क्षेत्रात तर लाखो संधी आहेत.

        याशिवाय अनेकदा घरातील प्लबिंग, इलेक्ट्रिक कामे किवा गॅस शेगडी दुरुस्त करणे यासारख्या छोट्या- मोठ्या कामांसाठी कोणी व्यक्ती उपलब्ध होत नाहीत. कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल दुरुस्ती ह्या सर्व आजच्या काळातील आवश्यक असणा-या गोष्ट आहेत. त्यातही कौशल्य असणारे लोक कमी आहेत. करियर म्हणून अशाही काही क्षेत्रांमध्ये कौशल्य प्राप्त करून एखादा विद्यार्थी आपली एक नवी वाट निर्माण करू शकतो. याशिवाय संगीत-नृत्य क्षेत्रात वापरली जाणारी वाद्ये तयार करणे-त्याची दुरुस्ती करणे, स्वयंपाकघरात वापरल्या जाणा-या इलेक्ट्राॅनिक उपकरणांची दुरुस्ती, वॉशिंग मशीन दुरुस्ती अशाही कामांमध्ये कौशल्य असणा-या व्यक्ती हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्याच आहेत. त्यामुळे या क्षेत्रातही करियरच्या अगणित संधी उपलब्ध होऊ शकतात. अशी कामे करणा-या व्यक्तींना एकत्र करून एखादी एजन्सी तयार करणे व लोकांना घरपोच सेवा उपलब्ध करून देणे हाही एक व्यवसाय होऊ शकतो. दर महिन्याला  मेंटेनन्स या स्वरूपात या सेवा उपलब्ध करून दिल्या तर लोक आनंदाने या सेवेचा लाभ घेतील.

       योजकः तत्र दुर्लभः। असे संस्कृतमध्ये एक वचन आहे. म्हणजे जगातील कोणतीही गोष्ट निरुपयोगी नसते. फक्त त्याचा योग्य वापर करणारा दुर्लभ असतो. आपले आयुष्यही इतके कवडीमोल नाही की ते सहज संपवून टाकावे. म्हणूनच ते सुंदर कसे करता येईल याचा विचार करण्याची गरज आहे. म्हणूनच दहावी/ बारावी हे केवळ आपल्या आयुष्यातील केवळ मैलाचा दगड आहेत एवढाच विचार विद्यार्थ्यांनी केला तर गुणांच्या चढाओढीत त्यांना नैराश्य येणार नाही.

           आता लवकरच नवीन शैक्षणिक धोरण अंमलात येणार आहे. कदाचित यावर्षीच्या बोर्डाची परीक्षा ही शेवटची बोर्डाची परीक्षा असेल. हे नवीन शैक्षणिक धोरण हे पूर्णपणे विद्यार्थीकेंद्रित आणि कौशल्याधारित आहे. नवीन क्षितिजांचा, नवीन काळाला अनुसरून अनेक कौशल्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. शिवाय विविध विद्याशाखेमधील वेगवेगळे अडसर दूर करून एक पारदर्शक प्रणाली निर्माण करण्याचा यात प्रयत्न केला गेला आहे आणि मुळात पुस्तकी अभ्यासावर गुण न देता विद्यार्थ्यांच्या मूलभूत कौशल्यांचा अभ्यास करून गुण दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या मानसिक, भावनिक, सांस्कृतिक, सामाजिक, शारीरिक वाढीच्या दृष्टीने आवश्यक असणारे घटक या धोरणात समाविष्ट करण्यात आले आहेत. मुलांनी अधिकाधिक संशोधन, प्रयोगशीलता यावर भर देऊन परिस्थितीनुसार नवीन काहीतरी निर्मिती करावी. त्यासाठी सर्व शाळांमधून अशाप्रकारची वातावरणनिर्मिती व्हावी अशी कल्पना या धोरणामध्ये आहे. त्यामुळे मुलांना येणारे नैराश्य व त्यातून नकळत केल्या जाणा-या आत्महत्या यावर आपोआप नियंत्रण येईल अशी आपण आशा करू या.

        परमेश्वराने सर्वच पक्ष्यांना उडण्यासाठी पंख दिले आहेत. पण कोणी किती भरारी मारावी हे त्या पंखांच्या क्षमतेवर अवलंबून असते. त्यामुळे घार जेवढ्या उंचावरून उडू शकेल तितक्या उंचावरून चिमणी उडू शकणार नाही. पण आपल्या मर्यादेत आपल्याला आवश्यक तेवढी भरारी ती निश्चितच मारू शकेल. म्हणूनच आज निकाल जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना असे म्हणावेसे वाटते की-

      ‘‘तुज पंख दिले देवाने

      कर विहार सामर्थ्याने‘‘

तुमच्यातील क्षमता ओळखून, त्याचा पुरेपूर वापर करून भरारी मारायची ठरवली तर जीवन का नाही सुंदर बनणार?

डॉ. मेधा फणसळकर. माणगाव, ९४२३०१९९६१

Leave a Reply

Close Menu