वेंगुर्ल्यातील आंबा थेट व्हाईट हाऊसच्या दारात

वेंगुर्ला येथील भूषण नाबर यांच्या बागेतील गोवा माणकूर आंब्याची पेटी तर महेश परब, सागर गडेकर व संतोष गाडेकर यांचा हापूस जातीचा आंबा अमेरिकेच्या व्हाईट हाऊसकडे सुपूर्द करण्यात आला. भारतीय आंबा प्रचार कार्यक्रमतर्गत हा आंबा पाठविण्यात आला आहे. 

      कोरोनामुळे गेली दोन वर्षे आंब्याची निर्यातच झाली नव्हती. यंदा आंबा उत्पादनात घट झाली असती तरी अंतिम टप्प्याची निर्यातीला सुरुवात झाली, त्याचा फायदा आंबा उत्पादकांना झाला आहे. राज्यातील प्रत्येक आंबा उत्पादकाला अभिमान वाटेल अशी घटना यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये घडली आहे. वेंगुर्ल्यातील आंबा थेट व्हाईट हाऊसमध्ये पोहोचला आहे. त्यामुळे भारतीय आंब्याची भुरळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना देखील असल्याचे समोर आले. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने उभारलेल्या निर्यात सुविधा केंद्रातून रेनबो इंटरनॅशनलच्या माध्यमातून तसेच महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत स्थापन झालेल्या वेंगुर्ला प्रोड्युसर कंपनीच्या सहयोगाने वेंगुर्ला तालुक्यातील मठ गावातील यशस्वी आंबा उत्पादक भूषण पद्माकर नाबर यांचा गोवा माणकूर जातीचा आंबा थेट अमेरिकेला पोहोचला. अमेरिकेत वॉशिग्टन येथे भारतीय आंबा प्रचार कार्यक्रमतर्गत भूषण नाबर यांच्या बागेतील गोवा माणकूर आंब्याची पेटी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच महेश परब, सागर गडेकर व संतोष गाडेकर यांचा हापूस जातीचा आंबा देखील अमेरिकेला निर्यात झाला आहे.

      वाशी येथील भाभा अनुसंशोधन केंद्राने उभारलेल्या महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रातून अंबिका ग्लोबल फुड्स अॅण्ड बेव्हरेजिस प्रा.लि. निर्यातदार कंपनीच्या माध्यमातून वेंगुर्ला प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या हापूस आंब्याची ऑस्ट्रेलियातही निर्यात झाली आहे. वेंगुर्ला प्रोड्युसर कंपनीच्या या वाटचालीमध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्माचे म्हेत्रे, प्रकल्प उपसंचालक आत्माचे दिवेकर, उपविभागीय कृषी अधिकारी अडसुळे, वेंगुर्ला तालुका कृषी अधिकारी गुंड, आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक गोळम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

 

Leave a Reply

Close Menu