‘इको जीवनपध्दती’ अंगीकारण्याची गरज

भाग 2

कोकणच्या पर्यावरणाला धक्का लावणाऱ्या प्रत्येक मुद्याबाबत सामुहिक भूमिका ठरविताना पर्यावरणीय समस्या समजून घेऊन त्यावरील उपाययोजना सांगणारी लेखमाला….

पुन्हा खारफुटी जंगल वाढवण्याची गरज

      भारताच्या पश्‍चिम किनाऱ्यावर कोकणासह सगळीकडे ‘कोस्टल रेग्युलेटरी झोन’चे नियम डावलून सुरु असलेला विकास पुढच्या दहा-वीस वर्षांत जमीनदोस्त होण्याचा धोका तज्ज्ञ वर्तवत आहेत. जिथे नद्या, ओढे समुद्राला मिळतात तिथल्या चिखलाट जमिनीत फोफावणारी खारफुटीची जंगलं समुद्राच्या लाटांचा हल्ला पेलतात. ती टिकवायला हवीत. कोकणात काही समुद्रकिनारे खडकाळ आहेत, काही रेतीच्या पुळणीचे आहेत. ‘खारफुटी नसलेल्या काही किनाऱ्यांवर ब्रिटिशपूर्व काळात स्थानिकांनी उंडीच्या झाडांची एक तटबंदी उभारलेली होती. हा साठ फुटांपर्यंत उंच होणारा वृक्ष डोलकाठीसाठी खास उपयोगात यायचा. पुढे इंग्रजांनी कब्जा केल्यावर किनाऱ्याजवळची ही तटबंदी आरमारासाठी त्यांनी तोडून टाकली.’ अशी नोंद आपल्या एका लेखात डॉ. माधव गाडगीळ सरांनी केलेली आहे. म्हणून आपण पुन्हा खारफुटी वाढवली पाहिजे. उंडीच्या झाडांची तटबंदी उभारली पाहिजे. त्सुनामी, वादळ, महापूर काळात पाण्याचा लोंढा रोखून आजूबाजूच्या परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी खारफुटीची मदत होते. लाटा आणि वाऱ्यांची तीव्रता खारफुटीची भिंत कमी करते. किनाऱ्यांची धूप कमी होते. निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळांत कोकण किनारपट्टीवरील अनेक नागरिकांनी खारफुटीमुळे तडाखा कमी बसल्याचे स्पष्ट केले आहे. खारफुटीची जंगले देखणी वाटत नसली तरी परिसंस्थेमध्ये त्यांचे महत्त्व मोठे आहे. कोकणातील समुद्रकिनारे आम्हाला वाऱ्यापासून संरक्षित करावे लागणार आहेत. यासाठी जास्तीत जास्त किनाऱ्यांवर सुरू, केतकी/केवडा यांची लागवड करावी लागेल. दापोली तालुक्यातील आडे-आंजर्ले-पाडले आदी भागात केवड्यांचे बन आम्ही नष्ट करत चाललो आहोत. कोकणात आपत्ती रोखण्यासाठी सर्वच ठिकाणी निसर्गाच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरु व्हायला हवी आहे.

स्थलानुरूप उपाययोजना करण्याची नितांत आवश्‍यकता

      कोकणच्या निसर्ग संपदेला, पर्यावरणाला बाधक ठरणारे प्रकल्प येऊ नयेत अशी मागणी पर्यावरण तज्ज्ञ सातत्याने करत आहेत. विकास म्हणून दळणवळणाची साधने, चौपदरी रस्ते, खेड्यापाड्यांपर्यंत जोडणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरण हे सारे आवश्‍यक आहे. पण तरीही आधुनिक शिक्षण आणि अत्याधुनिक वैद्यकीय सोयी वगळता कोकणात गाव आणि शहरे यातील फरक शिल्लक असायला हवा. प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. उमेश मुन्डल्ये यांच्या मतानुसार, ‘आपल्याला कोकणासह देशभरात स्थलानुरूप उपाययोजना करण्याची नितांत आवश्‍यकता आहे. जलसंधारणाची कामं स्थलानुरूप (Site Specific) असणं आवश्‍यक आहे. शेजारच्या दोन गावांमध्ये कदाचित वेगळे उपाय करणं योग्य असू शकेल. त्यामुळे सरसकट सर्वत्र एकाच प्रकारचं काम न करता, लोकसंख्या, पाणी साठवण्याची क्षमता, नदीच्या पात्राची रुंदी, खोली, आजूबाजूच्या परिसरातील शेतजमिनी आणि वस्त्यांचं प्रमाण इत्यादी बाबींचा अभ्यास करून मग कामं केली, तर कोणाचंच नुकसान न होता सर्वांचा फायदा होऊ शकतो.’ ब्रिटिशांनी कब्जा करताच भारताचं वर्णन ‘वृक्षांचा महासागर’ असं केलं होतं. ही वृक्षराजी ग्रामसमाजांनी, आदिवासी समाजांनी सांभाळली होती. जिंकलेला देश लुटण्यासाठी ब्रिटिशांनी या समाजसंघटना मोडून, वनसंपत्ती सरकारच्या ताब्यात घेऊन आदिवासी आणि स्थानिकांना दुर्दशेच्या खाईत लोटलं. ‘स्वतंत्र भारत स्वावलंबी गावांचं गणराज्य बनेल,’ असं स्वप्न महात्मा गांधीजींनी पाहिलं होतं. देशाला स्वातंत्र्य मिळताच हे व्हायला हवं होतं. परंतु आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देशाचं काय चित्र दिसतं? आपण सर्वांनी मिळून भारतातील ‘वृक्षांचा महासागर’ संपवला आहे. आपत्ती त्याचा परिणाम आहे. पाऊस कोकणात घाटमाथ्यावर अति प्रचंड पडतो. तरीही कोकणात अनेक भागात जानेवारीत पाण्याची टंचाई भासते. आम्ही पावसाचे पाणी जमिनीत जिरवायला कमी पडतो आहोत.

हे थांबवण्यासाठीच पर्यावरणाकडे पाहण्याची गरज

      ‘इंडियन ब्युरो ऑफ माईन्स’चे महासंचालक राहिलेल्या देवकीनंदन भार्गव यांनी आपल्या एका लेखात ‘यापुढे खनिजोत्पादन स्थानिक समाजांच्या सहकारी संस्थांकडे सोपवणे उचित आहे, त्या संस्था परिसराला सांभाळत, आज जशी चाललेली आहे तशी ओढ्या-नद्यांची नासाडी न करत, अवाजवी यांत्रिकीकरणाच्या फंदात न पडता, स्थानिक लोकांसाठी रोजगार निर्माण करत खनिज व्यवसाय सांभाळतील,’ असे म्हटले होते. या पार्श्‍वभूमीवर विचार करता, रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये भूस्खलन किंवा दरडी कोसळण्याच्या घटना खूप होऊ लागल्याचे दिसते. रायगड जिल्ह्यातील तळीये गाव मलब्याखाली गाडले गेले. तळीयेसह रत्नागिरी जिल्ह्यातील पोसरे ही याची अलिकडची उदाहरणे आहेत. जुलै 2021 च्या शेवटच्या आठवड्यात सिंधुदुर्गातल्या दोडामार्ग येथे कळणे गावात लोहखनिजासाठी खाणकाम सुरू असलेल्या भागात अतिवृष्टीमुळे खाणीच्या वरच्या बाजूला असलेला उभा कडा ढासळला आणि त्यात साचलेल्या पाण्यासकट हा सगळा मलबा खाणीच्या खालच्या बाजूला असलेल्या गावात घुसला. खरंतर 1967 च्या भूकंपापासून सह्याद्रीचा कोकणातील पट्टा भूस्स्खलनाला पूरक ठरू लागला असावा. एका आकडेवारीनुसार 1983 साली रत्नागिरी जिल्ह्यात 56 ठिकाणी लहानमोठ्या दरडी कोसळून 23 व्यक्ती मरण पावल्या होत्या. 2005 साली महाड तालुक्यात 17 ठिकाणी दरडी कोसळून कोडविते, दासगाव, रोहन, जुई येथील 197 व्यक्ती मरण पावल्या होत्या. चिपळूण नजीकच्या परशुराम घाटाखालील पेढे गावातील कुंभारवाडीवर घसरून चार लोकांच्या मृत्यूस कारणीभूत असलेली दरड सक्षम मनुष्यबळाच्या अभावाचे कारण ठरावी. हे थांबवण्यासाठी आपण कोकणच्या पर्यावरणाकडे आत्मियतेने पाहायला हवे आहे.

सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कार्यरत व्हायला हवे

      सन 1950 नंतर, कोयना धरणाच्या निर्मितीपासून चिपळूणात औद्योगीकरणाचे वारे वाहू लागले. सध्याच्या परिस्थितीला आम्ही सारे कोकणी दोषी आहोत. पूर्वी कोकणात कोणत्याही घाटातून उतरलं की अल्याड आणि पल्याड हिरवेगार डोंगर दिसायचे. आज ते उघडे बोडके होऊन त्यांचे कडे कोसळू लागलेत. हल्ली कोकणात 15 ते 20 दिवसात कोसळणारा पाऊस हा ढगफुटी सदृश होऊन एकाच दिवसात कोसळण्यामागे आणि चक्रीवादळाचं प्रमाण वाढण्यामागे वातावरणातील बदल हे महत्त्वाचे कारण जवळपास पर्यावरण तज्ज्ञ व्यक्त करताहेत. देशात घरोघरी सोलर प्रकल्प उभारायला हवेत. आपल्याकडे उन्हाळा सर्वाधिक असल्याने ते अवघड नाही. कोकणाबाबत, ‘मी एकट्याने करून काय होणार आहे?’ असा नकारार्थी विचार न करता, ‘मी केले तर निश्‍चित होणार आहे,’ हा सकारात्मक द़ृष्टिकोन ठेवून आपल्याला कार्यरत व्हावे लागेल. कोकणच्या पश्‍चिमेकडील रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या आंबा घाटातून संगमेश्‍वर तालुक्यातील साखरपा येथे वाहणारी ‘काजळी’ नदी पावसाळ्यात महापूर घेऊन येत असते. 2021 मध्ये हे घडले नाही. ‘कोकणातील साखरपा गाव पुरापासून वाचले’ अशा बातम्या माध्यमात झळकल्या. याला कारण नॅचरल सोल्युशन्स आणि नाम फाऊंडेशन या संस्थांच्या सहकार्याने गावकऱ्यांनी केलेली नदीतील गाळमुक्ती. ‘काजळी’नदीची खोली वाढवून गावात घुसणाऱ्या पुराला नियंत्रित करण्यात गावकऱ्यांना यश आलं. स्थलानुरूप उपाययोजना कोकणात प्रभावी ठरत असल्याने साखरप्यातील उपचार सर्वत्र लागू होईल असे नाही. मात्र आपत्तींवर उपचार होऊ शकत नाही असे अजिबात नाही. म्हणून ‘मी केले तर निश्‍चित होणार आहे,’ हा विचार कोकणात अंगिकारला जायला हवा आहे.                      (क्रमशः)

-धीरज वाटेकर, चिपळूण. मो. 9860360948

Leave a Reply

Close Menu