जिदा कौम…

आजच्या राजकीय घडामोडीतून काही लोकप्रतिनिधी मंत्री होतील, सत्ता-पदे येतील-जातील. पण या सर्वामध्ये मतदारांना अगदीच गृहीत धरल्याचे चित्र आहे. निवडणूकीपुरता मतदार राजा‘; मतदान कक्षात जाऊन त्यांनी मतदान केले की, त्याच्या हातात राजकीय खेळबघण्यापलिकडे काहीच नाही ही स्थिती विदारक आहे. हे चित्र बदलण्यासाठी समाजातील सुजाण नागरिक, युवा मतदार यांचा दबावगट असणे गरजेचे आहे. आपल्यालाही जनतेत जाब विचारला जाईल, ही जाणिव विद्यमान राजकीय परिस्थितीत फारशी दिसत नाही. आपण काहीही करावे आणि कार्यकर्त्यांनी, पदाधिका-यांनी फरफट मागे यावे. एक तर समर्थक आणि विरोधक हेच दोन गट पाडावेत आणि या कोलाहलात सामान्य माणसांचा, मतदार राजाचा आवाज नाहीसाच करावा, याचे तंत्र राजकीय मंडळींना साधले आहे. त्यासाठी मिडिया, हेडलिगचे कौशल्य प्रभावीपणे वापरात येत असेल तर ते घातक आहे.

    आत्तापर्यंत एकही पक्ष बदलला नाही; आपल्या विचारधारेवर तत्त्वांवर ठाम राहून तत्त्वनिष्ठेने सतत एकाच पक्षात राहून काम करणारे लोकप्रतिनिधी अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याएवढे आहेत. जे आपल्या संघटनेचे, पक्षाचे होऊ शकले नाहीत, ते लोकांचे लोकनेते काय होणार? आणि या सगळ्याचा जाब मतदार म्हणून आपण विचारणार आहोत की नाही? सोशल मिडियाच्या माध्यमातून आजकाल काही लक व्यक्त होतात. तसेच सामान्य जनतेच्या प्रश्नावर आपल्या गावात, वाडीवस्तीवर मतदाराने आपल्या स्थानिक लोकप्रतिनिधींपासून जाब विचारला तरच ही परिस्थिती थोडीफार बदलायला मदत होईल. जिदा कौम पाच साल राह नही देखतीहे राममनोहर लोहियांचे विधान त्यादृष्टीने दिशादर्शी आहे.

    राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर सध्या आषाढी एकादशीला जाणा-या वारक-यांच्या दिड्या, त्यांचा भक्तिभाव, श्रद्धा, सर्मपण यांच्या बातम्यांचे प्रसारण फक्त नावालाच आहे. संपूर्ण कव्हरेज राजकीय घडामोंडींना आहे. तशा नाट्यमय घडामोडी घडतही आहेत. चौका-चौकात, नाक्यानाक्यावर राजकीय चर्चांबरोबर कोट्याच्या कोटीची उड्डाणे, विमानाने सुरत, गुवाहटी येथे होणारे दौरे आणि यातील अर्थकारणाची खुलेआम चर्चा आहे. फार तर हे गेले तेआले, या पलिकडे यातून सामान्य माणसाच्या पदरात काय पडणार?

    राजकीय धोरणात्मक निर्णय निश्चितपणे दैनंदिन जीवनावर परिणाम करीत असतात. परंतु, सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडवेल; त्यांचे जीवनमान बदलून टाकेल असे धोरण घेऊन त्या मुद्यांवर लढणारे लोकप्रतिनिधी आज किती आहेत? ही अशी राजकीय परिस्थिती का आली, याचाही गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. कारण, लोकशाहीत असे लोक आहेत तसे लोकप्रतिनिधी मिळतात; असे म्हटले जाते. त्यामुळे मतदार म्हणून आपणच कुठेतरी कमी पडतो आहोत, याचाही विचार करायला लावणारी ही आजची राजकीय परिस्थिती आहे.

    निवडणुकीत करोडो रुपये खर्च करुन साम, दाम या नितीचा वापर करुन लोकप्रतिनिधी सर्रास निवडून येतात आणि त्याची चर्चा नाक्यानाक्यावर कार्यकर्ते मोठ्या फुशारक्या मारत कुणी किती खर्च केले, कसे वाटप झाले, यात कसे परफेक्ट प्लानिग आहे हे सांगण्यात धन्यता मानतात. मतदार ही यांच्याकडून काही होणार नाही, पुढे दिसतील की नाही, माहित नाही, त्यापेक्षा आता निवडणुकीत काय मिळतेय ते घेऊन ठेवा या पद्धतीने विचार करत असतील तर लोकप्रतिनिधींकडून उत्तम आचार, विचारांची तरी अपेक्षा कशी होणार?

Leave a Reply

Close Menu