पराकोटीचे विठ्ठल भक्त ह.भ.प.हुले बुवा- एक लोकविलक्षण व्यक्तिमत्व!!

आषाढी एकादशी आली म्हणजे हटकून वेंगुर्लादाभोसवाडा स्थित कै.तुकाराम कृष्णाजी उर्फ हुले बुवांची आठवण येते. हे माझ्याच बाबतीत घडते असे नाही तर वेंगुर्ला, कुडाळ, मालवण आदी तालुक्यांतील अनेक विठ्ठल भक्तांना त्यांची तीव्रतेने आठवण आल्यावाचून राहत नाही…!!!

    ह.भ.प.हुले बुवा पराकोटीचे विठ्ठल भक्त होते. आपले उच्च शिक्षण, मानपानाची सचिवालयातील उच्चपदस्थ नोकरी, त्यातील बढत्या, आपला व्यासंग, आपली लोकप्रियता, प्रतिष्ठा इत्यादी सर्व झुली ते आपल्या खांद्यावरुन झटकून टाकत असत आणि अगदी सर्वसामान्यहोऊन वारक-यांचे सामान, ट्रंका आपल्या खांद्यावर वाहून पंढरीची वाट आनंदाने व भक्तिभावाने चालू लागत. पाऊले चालती पंढरीची वाट…सोडोनीय गाठ..अशी त्यांची मनोमन वृत्ती होती. विठ्ठल भक्तीच्या आड येणा-या कुणाचीही अथवा कुठल्याही गोष्टीची त्यांनी कधी पर्वा केली नाही. ते अत्यंत निग्रहाने आणि शिस्तीने विठ्ठल प्रेमाचा आपला वारसा चालवत राहिले. वसा वसत राहिले.

     इ.स.१९५० नंतरच्या जवळ जवळ चार दशकांत आपल्या विद्वत्तापूर्ण आध्यात्मिक विचारांचा ठसा त्यांनी मुंबई, पुणे, आळंदी, वेंगुर्ला, कुडाळ, मालवण आदी परिसरातील जनमाणसावर अक्षयपणे उमटविला. भजन, किर्तन, प्रवचन व लेखन या माध्यमातून त्यांनी अत्यंत परिश्रम घेऊन भाविक जनांना आणि नास्तिकांनाही आपलेसे करुन घेतले. म्हणूनच आज ते हयात नसले तरीही लोकांना त्यांची व त्यांनी पाजलेल्या बोधामृताची आठवण येत राहते. त्यांचे एकंदरच व्यक्तिमत्व लोक विलक्षण होते.

     त्यांचे धाकटे चिरंजीव व मालवण नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष कै.अरविद तुकाराम हुले यांनी काही वर्षांपूर्वी प्रस्तुत लेखकास सविस्तर पत्र पाठवून आपल्या वडिलांविषयी ब-याचशा आठवणी कळविल्या होत्या. विस्तार भयास्तव त्यातील महत्त्वाच्या व मोजक्याच आठवणी लोकसंग्रहार्थ येथे उद्धृत करीत आहे.

      आमचे बाबाअसे होते ः आमच्या वडिलांना प्रथमपासूनच भजन-किर्तनांची आवड होती. मुळात वेंगुर्ला परिसर व दाभोसवाड्यामध्ये भजन-किर्तन मोठ्या प्रमाणावर होत असत. दाभोसवाड्यातील कै. शांताराम गुरुजी कांबळी हे बाबांच्या गुरुस्थानी होते. आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेचे त्यावेळी ते प्रमुख हते आणि बाबा त्यांचे विचार ऐकण्यासाठी नियमितपणे आळंदीला जात असत. तसेच रुईया (माटुंगा,मुंबई) कॉलेजचे प्राचार्य कै.सोनोपंत दांडेकर हे सुद्धा गुरुस्थानी होते. पंढरपुरचे कै.धुंडा महाराज देगलूरकर हे सुद्धा गुरुस्थानीच होते. त्यांची किर्तने, प्रवचने ते नियमितपणे ऐकत असत व त्यांची टिपणे काढीत असत. भेंडीबाजारा लगतच्या माधव बागेत ते नियमितपणे किर्तन-प्रवचनांसाठी जात असत. त्यावेळी आमच्या परेल (मुंबई)च्या लहानशा जागेत धार्मिक ग्रंथ व किर्तन-प्रवचनांची टिपणे व्यवस्थित कपाटात ठेवलेली असत. ती मग त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर दाभोसवाड्यातील घरी नेण्यात आली.

     किर्तन-प्रवचने अत्यंत श्रवणीय ः बाबांचे अक्षर सुवाच्च होते. लिखाणासाठीची काळी शाई ते स्वतः घरीच तयार करीत. टिपणांच्या आधारे किर्तन-प्रवचने निरनिराळ्या वह्यांमध्ये व्यवस्थित लिहून काढीत. त्यासाठीच्या वह्यापण ते स्वतःच तयार करीत व त्यांचे बायडिगही स्वतः करीत. गृहस्थाश्रमाची कर्तव्ये पार पाडून त्यांचे पठण व मनन, चितन सतत सुरु असायचे. त्यांच्या खिशात एक लहान डायरी सतत असायची. त्याचा उपयोग ऑफीसला जाताना रेल्वेच्या प्रवासात पाठांतर करण्यासाठी व्हायचा. त्यांची स्मरणशक्ती दांडगी असल्यामुळे ज्ञानेश्वरी व तुकारामांचे अभंग तोंडपाठ असायचे. त्याचा उपयोग त्यांना किर्तन-प्रवचन करण्यासाठी व्हायचा. त्यांची विनोदबुद्धी जागृत असल्यामुळे व जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असल्यामुळे त्यांची किर्तन-प्रवचने श्रवणीय होत असत.

     त्याकाळी दूरदर्शन माध्यम एवढे प्रभावी नव्हते. त्यामुळे बाबा महाराज सातारकरांसारखे त्यांचे किर्तन-प्रवचन सर्वसामान्यांपर्यंत पोहचू शकले नाही. परंतु, ज्यांनी बाबांची व बाबामहाराज सातारकरांची प्रवचने ऐकली आहेत, ते आमच्या बाबांची प्रवचने जास्त श्रवणीय होती असे सांगतात. आमच्या बाबांच्या कोपिष्ठ (रागीट) वृत्तीमुळे इच्छा असूनही आम्ही त्यांची किर्तन-प्रवचने ध्वनी व चित्रफितीत मुद्रित करु शकलो नाही. त्याप्रमाणे जर त्यांचे मुद्रण झाले असते तर त्यांचा अभ्यासकांना उपयोग होऊ शकला असता.

     सर्वकला पारंगत ­ः बाबांची शिकण्याची व शिकवण्याची वृत्ती होती. हे सर्वत-हेचा स्वयंपाक उत्कृष्ट करीत. ते स्वतः मासे खात नसत; परंतु, पाहुण्यांना मात्र माशांचे जेवण करुन घालीत. सर्व प्रकारची लोणची तयार करीत. त्यांच्याकडे  मिळालेल्या नोंदवहीच्या आधारे अजूनही आमच्या घरी लोणची तयार केली जातात. ते स्वतः शिवणकाम करीत. त्यांना सुतारकामही येत असे. आमच्या घरातील सर्व फर्निचर त्यांनी स्वतः तयार केले आहे. मोची काम सुद्धा बाबा करीत. त्यासाठीचे सर्व साहित्य आमच्या घरी होते. फर्निचरसाठीचे पॉलिश ते स्वतः तयार करीत.

     संगीत साधना ःपरेल नाक्यावर रेवंडीच्या आचरेकरांचे साईनाथ संगीत विद्यालयदळवी बिल्डिगमध्ये आहे. ते आचरेकर आमच्या बाबांचे संगीत गुरु. त्यांच्याकडे ते तबला आणि मृदुंग वादन शिकले व त्यांचे वडिल बंधू जयवंत उर्फ काका हुले यांना पारंगत केले. आमचे वडील बंधू श्री.अतुल हुले यांना त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षांपासून तबलावादनाचे धडे दिले. त्यामुळे ते सध्या उत्कृष्ट तबलावादक मानले जातात. मला वयाच्या आठव्या वर्षी पेटी वादनाचे धडे दिले होते. परंतु, भजनांऐवजी सिनेसंगीत वाजवतो हे लक्षात आल्यावर त्यांनी माझे पेटीवादन बंद केले. शिवाय परेल नाक्यावरील सिमेंटचाळीमध्ये आरत्या, टाळझांजा वादनाचेही प्रशिक्षण बाबा देत असत व संबंधितांकडून करुन घेत असत.

     वेंगुर्ल्याला आगमन ः सेवानिवृत्तीनंतर बाबा वेंगुर्ल्यास दाभोसवाड्यातील घरी आले. इथे आल्यानंतर बाबांनी आरत्यांवरील संशोधन केले. चुकीचे शब्द बदलले व दाभोसातील मुलांना तयार करुन आरत्या व भजने बसविली. सर्वजणांकडे स्वतः लिहून काढलेली आरतीची पुस्तके तयार करुन दिली. वारकरी संप्रदायाची भजने लिहून दिली. शिवरात्रीच्यावेळी कुठली भजने केव्हा म्हणायची, काकड आरती केव्हा म्हणायची याचीही नोंदवही तयार केली. दाभोसातील भजन मंडळी अजूनही नियमितपणे भजने करतात व गणपतीला संगीत आरत्या म्हणतात.

     आषाढवारी करुन श्रावण महिन्यात घरी आल्यावर बाबा एक महिन्याची सुट्टी काढून मालवणात यायचे. त्यावेळी त्यांची सर्जेकोटला नियमितपणे किर्तन-प्रवचने होत असत. बाबांना अनेक कलांची चांगली जाण होती. परंतु, त्यांच्या कोपिष्ठ स्वभावामुळे सर्वजण त्यांच्यापासून लांब राहत असत.

     सुसंस्कार व स्वावलंबन ः आमच्या समाजामध्ये एवढ्या विद्वत्तेची असामी झाली नाही. सर्व प्रकारच्या कलागुणांचा समावेश असलेली दुर्मिळ व्यक्ति म्हणजे आमचे वडील होते. मंत्रालयामध्ये एवढ्या मोठ्या पदावर असूनही त्याची घमेंड त्यांनी कधी मिरवली नाही. पंढरपूरच्या वारीसाठी सुट्टी मिळावी म्हणून कायम प्रमोशन नाकारत राहिले. आज आम्ही बंधूंनी जो काही नावलौकिक मिळविला त्यामागे त्यांचे संस्कार व शिस्त होती. वाणी व आचार-विचार स्वच्छ रहावेत म्हणून त्यांचा कटाक्ष होता. परेलला आमच्या दारी शेणाचे अंगण होते. बाबा त्यावेळी रविवारी सकाळी सायकलने जोगेश्वरीला (तबेले असलेल्या ठिकाणी) जाऊन शेण घेऊन यायचे व आम्ही शेणाने अंगण सारवायचो. त्यामुळे कुठलेही काम करताना लाज वाटली नाही. त्यांच्या संस्कारांमुळे आम्ही स्वावलंबी झालो आणि शिस्तीमुळे नियमितपणा आला. आताच्या पिढीला हे पटणारे नाही. त्यामुळे बेबंद आयुष्य जगणा-यांची संख्या वाढत चालली आहे. कालाय तस्मै नमः! दुसरे काय?

     प.पू.ह.भ.प.हुले बुवांच्या मुलाने पत्रांतून कळविलेल्या या आठवणी बोलक्या आहेत. त्यावर अधिक भाष्य करण्याची गरज उरत नाही.

     मात्र आजच्या या आषाढी एकादशीच्या दिवशी वेंगुर्ल्यात निदान दाभोसवाड्याच्या नाक्यावर वा विठ्ठलवाडीच्या नाक्यावर तरी कै. शांताराम कांबळी गुरुजी आणि पराकोटीच्या विठ्ठल भक्ताची म्हणजे प.पू.हुले बुवा या दोघांची स्मारके उभी राहण्याच्या दृष्टीने समाजाने आणि वेंगुर्ला नगरपरिषदेने हालचाल करावी असे अत्यंत कळकळीने सांगावेसे वाटते. तोपर्यंत तरी कविवर्य बा.भ.बोरकर यांच्या कवितेतील ओळी माझ्यासारख्याच्या ओठांवर उतरतातः

     ‘‘नाही चिरा, नाही पणती । तेथे कर माझे जुळती।।‘‘

    प्रा. सीताराम उर्फ काका गिरप

     विरार (पूर्व). ९२२१४८७२३९, ९७६४९०३३३६

Leave a Reply

Close Menu