‘इको जीवनपध्दती’ अंगीकारण्याची गरज

कोकणच्या पर्यावरणाला धक्का लावणाऱ्या प्रत्येक मुद्याबाबत सामुहिक भूमिका ठरविताना पर्यावरणीय समस्या समजून घेऊन त्यावरील उपाययोजना सांगणारी लेखमाला….

भाग 3

विदेशी वृक्ष प्रजाती लागवडीतून वगळण्याची गरज

      महाराष्ट्र शासन, वनविभाग आणि सामाजिक वनीकरण यांनी आपल्या वृक्ष लागवड आणि रोपे निर्मिती कार्यक्रमातून विदेशी वृक्ष प्रजातींना वगळावे. वृक्षारोपणामध्ये केवळ स्थानिक वृक्ष प्रजातींना प्राधान्य द्यावे याबाबतचा धोरणात्मक निर्णय व्हावा यासाठी कोकणातील चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी महसूल व वन, पर्यावरण, सामाजिक वनीकरण, रोजगार हमी योजना आदी  मंत्रालयांकडे पत्रव्यवहार केला आहे. सर्वसामान्यपणे रस्त्यांच्या सुशोभिकरणासाठी विदेशी वृक्ष प्रजातींपैकी गुलमोहर, निलमोहर, प्लटोफोरम, कॅशिया, रेन्ट्री, काशीद, ग्लिरिसिडीया, सुबाभूळ, मॅन्जीयम आदी झाडांची मुळे खोलवर जात नाहीत. या झाडांच्या फांद्या, खोडाचे लाकूड ठिसूळ असते. अशी झाडे वादळात तग धरू शकत नाहीत. स्थानिक वृक्ष प्रजातींची वाढ मर्यादशीर असूनही मुळे खोलवर जातात. त्यांचे लाकूड चिवट आणि कठीण असते. ही झाडे वादळात सहसा पडत नाहीत. 2021 मध्ये आलेल्या तौक्ते चक्रीवादळात मुबंई शहरात जे मोठे वृक्ष आणि त्यांच्या फांद्या कोसळून अपिरमित हानी झाली त्यात 70 टक्के विदेशी प्रजातीचे वृक्ष (ऑस्ट्रेलियन ऑकेशिया) होते असे मुबंई महानगरपालिकेचे निरीक्षण आहे. पालिकेनेही यापुढे मुबंई शहरात आणि परिसरात विदेशी वृक्ष प्रजाती न लावण्याचा निर्णय घेतला आहे.

परिणाम कसे कमी करता येतील यावर विचार हवा

      आपत्तींचा विचार करता शासनानेही हा निर्णय घेणे सार्वजनिक हिताचे आहे. नैसर्गिक संकटे ही माणसासाठी नवी नाहीत. पण अलिकडची पर्यावरणीय संकटे अधिक मानवनिर्मित आहेत. क्लायमेट चेंजचे परिणाम आपण प्रत्यक्षात अनुभवतो आहोत. या पुढे असे पूर-महापूर वारंवार येत राहणार आहेत. त्यामुळे त्याचे परिणाम कसे कमीतकमी करता येतील, आपत्ती कशा रोखता येतील याकडे आपण लक्ष द्यायला हवे. अशा काळात महाराष्ट्रातील विविध विभागांमध्ये एकमेकांत समन्वय नसल्याची अनेक उदाहरणे समोर येत असतात, हे बदलावे लागेल. कोकणसह महाराष्ट्र राज्याला दुष्काळ, महापूर आणि जंगलात लागणाऱ्या आगी व वादळे या महत्त्वाच्या आपत्तींना सामोरे जावे लागते. महापूर, चक्रीवादळ आणि भूस्खलन अशा तिहेरी अस्मानी संकटांच्या कोंडीत कोकण सापडले असताना ‘हवामान बदल’ या जागतिक स्तरावरील व्यापक कारणाकडे बोट दाखवून आपल्याला स्वस्थ बसता येणार नाही. नैसर्गिक आपत्ती हा टाळता न येण्यासारखा प्रकार असला तरी आजच्या आधुनिक शास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या युगात या आपत्तींना सामोरं जाताना पूर्वीची हतबलता का येत असावी? असा प्रश्‍न अनेकांना पडतो. म्हणून आपत्तीमुळे कमीत कमी वित्तहानी होईल आणि जीवितहानी होणार नाही या दृष्टीनं नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी आपली पाऊले पडायला हवीत.

वादळाचा सामना करण्यासाठी विशेष पूर्वतयारीची गरज

      ‘निसर्ग’ चक्रीवादळानं गुहागर, दापोली आणि मंडणगड सह रायगड जिल्ह्यात धुमाकूळ घातला. निसर्ग काय किंवा तौक्ते वा 2009चं फयान यात जीवितहानी झाली नाही, हे सत्य आहे. अर्थात या तिन्ही वादळांची आंध्रप्रदेश-ओडिशाच्या किनाऱ्यांवर धडकणाऱ्या चक्रीवादळांच्या तीव्रतेशी तुलना केली तर यातलं गणित लक्षात येईल. या वादळांचा सामना करण्यासाठी कोकणात विशेष पूर्वतयारी असायला हवी आहे. पावसाळ्यात पूर येणं हे कोकणच्या निसर्गजीवनाचं अविभाज्य अंग आहे. एखाद्या वर्षी धो धो पाऊस पडून नदी-नाले दुथडी भरून वाहिले नाहीत, त्यांच्या किनाऱ्यांवरच्या घर  बाजारात किंवा शेतांमध्ये पुराचं पाणी खेळून गेलं नाही तर कोकणात पावसाळा साजरा होत नाही. पण कधीकधी हा विध्वंस महागात पडतो. पर्यावरण संवर्धनासाठी आम्ही आपणहून गावागावातून संपूर्ण कुऱ्हाड बंदी, वणवे न लागणे, मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग साकारताना दुतर्फा नव्याने वृक्ष लागवड चळवळ, असे मुद्दे घेऊन कार्यरत व्हायला हवे आहे. चिपळूणात ‘एकच देऊ नारा, संपवू वणवा सारा’ हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून अखंड कोकण वणवामुक्त व्हावं म्हणून गेल्या दोनेक वर्षांपासून ‘वणवा मुक्त कोंकण’ कार्यरत झाली आहे. ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ संस्थेच्या माध्यमातून काम करणाऱ्या टीमला या काळात आलेले सर्वांगीण अनुभव पाहाता वणवा लागणारच नाही यासाठी समाज म्हणून आपण सर्वांनी जागरूक राहाणे आवश्‍यक असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. वणवा न लावता, न लावू देता सामाजिक स्तरावर वणवा जाळण्याऐवजी वणवा लावणारी प्रवृत्ती जळून जाण्याची आवश्‍यकता आहे. कायद्याने गुन्हा असलेली वणवा लावण्याची प्रवृत्ती नष्ट होण्यासाठी सध्याच्या जंगलातील वणव्यांच्या ऋतू हंगामात जनजागृतीची मोठ्या प्रमाणात आवश्‍यकता आहे.

‘पर्यटन’ उद्योग अधिकाधिक ‘हरित’ करण्याची गरज

      कोकणच्या लाल मातीत कार्यरत हाताला रोजगाराच्या विविधांगी संधी उपलब्ध करून देण्याची अमर्याद क्षमता असलेला, मागील तीन दशकात हळूहळू सर्वदूर विस्तारत असलेला ‘पर्यटन’ उद्योग अधिकाधिक ‘हरित’ असायला हवा आहे. अर्थात ‘पर्यटनातून येणारा पैसा औद्योगिकरणातून येतो!’ हे जरी खरं असलं तरी कोकणात ‘भूमिपुत्रांना आत्मनिर्भर बनविणारं, पर्यावरण जपणारं पर्यटन हवंय’, ही भूमिका असायला हवी आहे. पर्यटनाच्या नावाने चैन, चंगळवाद, एका विशिष्ठ मर्यादेबाहेरील मौजमस्तीस कोकणी माणसाने विरोध करायला हवा आहे. ‘प्रकृती दर्शन आणि निसर्ग निरीक्षण’ हेच कोकण पर्यटनाचे मुख्य अंग असायला हवे आहे. यापुढे जाऊन कोकणात ‘पर्यावरण पर्यटन’ संकल्पनेला अधिक बळ द्यायला हवे आहे. म्हणजे ‘नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी, पर्यावरणाचे संरक्षण, पर्यावरण आणि स्थानिक संस्कृती शिकण्याच्या उद्देशाने नैसर्गिक भागाकडे प्रवास करणारे लोक असा कोकण पर्यटनाचा अर्थ शिकविला जाण्याची गरज आहे. कोकणात पर्यावरण आणि पर्यटन एकत्र चालायला हवे आहे. संपूर्ण कोकणासाठी आम्ही कोकणी लोकांनी एकत्र यायला हवे आहे.

‘इको’ जीवनपध्दती अंगीकारावी

      सह्याद्रीच्या मुख्य धारेपासून स्वतंत्र असलेली कोकणभूमी म्हणजे निसर्गाचे वरदान लाभलेला प्रदेश. अशी नैसर्गिक संपन्नता क्वचितच कोणत्या प्रदेशाला मिळाली असेल. मात्र बदलत्या निसर्गचक्रामुळे कोकणातल्या लोकांना निर्धास्त जगणे अवघड होईल की काय? अशी स्थिती येऊन ठेपली आहे. यावर उपाययोजना शासनाने कराव्यात म्हणून कोकणवासियांनी तशा मागण्या नोंदवायला हव्या आहेत. स्वतंत्र भारतात 1950 पासून वृक्षारोपणाचे सोहोळे सुरु आहेत. 1976 च्या एका वृत्तात राज्यातील एका मंत्र्यांनी म्हटले होते, ‘मागील दोन पिढ्यांनी वृक्षांची तोड करण्यापलिकडे दुसरे कोणते कार्य केलेले नाही. ज्या पद्धतीने वृक्ष संवर्धन व्हावयास हवे तसे ते झाले नाही. वृक्षजोपासना व जंगलवाढ करणे हे एकट्या शासनाचे काम नाही. त्यासाठी समाजानेही आपला वाटा उचलला पाहिजे.’ सरकारी वृक्षारोपण चळवळीस समाजाची साथ मिळालेली नाही. हीच अनास्था आज कोकणच्या पर्यावरणाच्या मुळावर उठली आहे. आगामी काळात कोकण भूमीचा विचार करताना आम्हाला संकुचित विचारातून बाहेर येत सर्व प्रकारच्या छोट्या-मोठ्या पर्यावरणीय उपक्रमांना आमच्या सार्वजनिक जीवनात प्राधान्यक्रम द्यावा लागेल. कोकणच्या पर्यावरणाला धक्का लावणाऱ्या प्रत्येक मुद्याबाबत आम्हाला सामुहिक भूमिका ठरवावी लागेल. कोकणातील आमच्या आजूबाजूच्या पर्यावरणीय समस्या समजून घेऊन त्यावरील उपाययोजना सांगणारी, दैनंदिन भौतिक सुविधा कमी करणारी ‘इको’ जीवनपध्दती अंगीकारावी लागेल. कोकणच्या स्वर्गीय सौंदर्याला लागलेले आपत्तींचे ग्रहण थोपविण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.

-धीरज वाटेकर, चिपळूण.

मो. 9860360948,

Leave a Reply

Close Menu