काही प्रांतांची काही वैशिष्ट्ये असतात. त्याप्रमाणे ‘वेंगुर्ल्याचा बाजार’ ही इथली खासीयत आहे. अनेक प्रकारचा माल घाटावरुन इकडे यावा व गलबतातून रवाना व्हावा असे कैक वर्षे चालले होते. अर्थात त्यावेळी उतारपेठ म्हणून या बंदराचे फार महत्त्व होते.
वेंगुर्ल्यातील माणिकचौक हे व्यापाराचे मुख्य केंद्र. अहमदाबादच्या या नावाच्या चौकाची प्रतिकृती आहे. याच्या आसपासच्या बाजाराला ‘मुंबई बाजार‘ असेही ओळखले जाई. शहरातल्या अनेक जुन्या वखारी ही त्यावेळेस बांधलेल्या आहेत. वेंगुर्लेतील पेढ्या या आजही व्यापारी पेढ्या म्हणून ओळखल्या जातात. इंग्रजी राजवटीत पुढे टपालं झाली तेव्हा ही ‘तार ऑफिस‘ प्रथम वेंगुर्लेत झाल्यामुळे इतर तालुक्यांपेक्षा इथल्या व्यापाराचे आधुनिकीकरण लवकर झाले.
वेंगुर्ल्याचा बाजार एक ‘ऐतिहासिक‘ वारसा- वेंगुर्ला शहर हे व्यापाराचे मोठी पेठ म्हणून गाजत असतानाच त्या इतमामास शोभा आणणारी एक वास्तू येथे उभारली गेली. ती म्हणजे घड्याळी मनोऱ्याच्या मार्केटची बांधणी. त्यावेळी ब्रिटिश महसूल अधिकारी ऑर्थर क्रॉफर्ड यांनी या बांधकामाची लहान प्रतिकृती प्रथम वेंगुर्ला येथे उभारून नंतर मुंबई आणि कलकत्ता या ठिकाणी क्रॉफर्ड मार्केटचे भव्य रुप बांधले. या मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावर मनेोऱ्याची रचना आहे. यालाच जोडून नगरपरिषदेचे सभागृह व कार्यालय आहे. तळमजल्यावर दाणागोटा मार्केट म्हणजेच किराणामाल, कापड, कासार यांची दुकाने तर लागूनच मच्छी-मटण मार्केट आहे. हे सर्व एकाच परिसरात. क्रॉफर्ड मार्केट ही केवळ ‘बाजाराची‘ जागा नसून हा एक ‘ऐतिहासिक‘ वारसा आहे हे जाणून घेऊन नगरपरिषदेने अलिकडेच स्थापत्यशास्त्राचा या उत्कृष्ट नमुन्याच्या मूळ ढाच्यात बदल न करता त्याला नवी झळाळी दिली. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूचे जतनीकरण वेंगुर्ल्याच्या लौकिकात भर घालणारे ठरले आहे.
तर बाजरपेठेला उतरती कळा- त्या काळात बांधण्यात आलेले रस्ते हे पादचारी, बैलगाडी जाण्याच्या सोईने बांधले गेले असल्याने आताच्या काळात माणिक चौकात जाणारे रस्ते चिंचोळे ठरू लागले. परिणामी वाहतुक कोंडीची समस्या निर्माण झाली. क्रॉफर्ड मार्केट मुख्य रस्त्यालगत असल्याने माणिक चौकात अरुंद रस्त्याने जाणे टाळले जाऊ लागले. साहजिकच माणिकचौक या एकेकाळी गाजलेल्या बाजरपेठेला उतरती कळा लागली. तेथील बाजार ओस पडू लागला. तरी सध्या सुरु असलेल्या मुख्य रस्त्यावरील बाजारपेठेत गेली 15 ते 20 वर्षे पार्र्किंगची व्यवस्थाच नव्हती. तर खुल्या बाजारपेठेत व्यापाऱ्यांची वाढलेली मक्तेदारी, रस्त्याच्या दुतर्फा बसणारे विक्रेते त्यामुळे वाहतुक कोंडी नित्याचीच बनली होती. ट्रॅफिक पोलिसांनी गाडी पार्र्किंग केलेल्या व्यक्तिला दंड ठोठविण्यासाठी पावती फाडली तर ‘पार्र्किंग खय करतलंय‘ अशी विचारणा त्या व्यक्तिकडून होई आणि पोलिस निःशब्द होत असे.
हे दुष्टचक्र बदलण्यासाठी न.प.च्या मावळत्या कौन्सिलने मागील पाच वर्षात वेंगुर्ला बाजारपेठेमध्ये जीर्ण व नादुरुस्त्या झालेल्या इमारती पाडून सुंदर व आकर्षक नविन संकल्पनेच्या इमारती बांधण्याचे ठरविले. त्यानुसार शासनाकडून मिळालेल्या निधीचा योग्य वापर करुन या इमारती उभ्या झाल्या. त्यामध्ये सागररत्न मच्छिमार्केट इमारत, लोकमान्य टिळक व्यापारी संकुल इमारत, जुन्या क्रॉफर्ड मार्केटचे नुतनीकरण व यासोबत पवनपुत्र भाजी मंडई या नावाने भाजी मार्केटची सुसज्ज इमारत बांधली. या तिन्ही इमारतीच्या पाठीमागील अर्ध्या भागातील बेसमेंटमध्ये पार्र्किंगची व्यवस्था केली. 40 ते 45 चारचाकी व 200 दुचाकी राहू शकतील अशी पार्र्किंगची व्यवस्था केली आहे. तरी नगरपरिषद प्रशासनाकडून पार्र्किंगबाबत म्हणावे तसे नियोजन नसल्याने अजूनही वाहतुक कोंडीचा प्रश्न आहे तसाच आहे.
या उपाययोजना शक्य- सध्या वेंगुर्ला नगरपरिषदेवर प्रशासक आहेत. त्यामुळे दोनचाकी व चारचाकी वाहनांच्या जागी स्वतंत्रपणे आखणी केली पाहिजे. केवळ रिक्षा अनाऊसमेंट करुन हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी तेथे स्वतंत्र कर्मचारी नेमून लोकांना पार्र्किंगमध्ये गाड्या लावण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. पोलिस स्टेशनमध्ये रितसर पत्र देऊन किवा प्रशासनाने त्यांच्यासोबत रितसर संवाद साधून वाहतुक पोलिस नियुक्त करताना दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना करणे आवश्यक आहे. अपवाद म्हणून आजारी व्यक्ती, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक ज्यांना चालणे यांना अशक्य आहे अशांना सवलत देताना त्यांच्या मार्गदर्शक सूचना देणाऱ्या गोष्टी सातत्याने नागरिकांसमोर रहायला पाहिजेत. म्हणजे त्यांनाही दिलासा मिळेल. या सर्वात व्यापाऱ्यांनीही आपल्या दुकानासमोर गाडी पार्र्किंग करण्यासाठी सवलत न देता महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे. तसेच नागरिकांनीही स्वयंशिस्तीने आपल्या गाड्या नियोजित ठिकाणी पार्र्किंग करुन सहाय्य केले पाहिजे. मोठ्या शहरात चुकीच्या ठिकाणी गाडी पार्र्किंग केलेली दिसल्यास त्यावर कारवाई म्हणून ती गाडी संबंधित प्रशासन आपल्या ताब्यात घेते. अजून तरी अशी कठोर शिक्षा आपल्याकडे होत नाही. ती होईपर्यंत वाट पहाण्यापेक्षा आपणा सर्वांची ही जबाबदारी आहे म्हणून याकडे कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे. कारण, सुसज्ज नुसती बाजारपेठ उभी राहून केवळ वाहतुक कोंडीमुळे ग्राहकच यायला इच्छुक नसेल तर रोज बाजार असलेली बाजारपेठही ओस पडायला वेळ लागणार नाही. त्यामुळे वेळीच सावध होऊन आपल्या वेंगुर्ल्याच्या बाजाराची खाद्यभ्रमंती अखंडीत रहाण्यासाठी आपणच कार्यतत्पर राहिले पाहिजे. येणाऱ्या पर्यटकालाही वेंगुर्ल्याविषयी वाटणारी ओढ येथील सुसज्ज पार्र्किंग सुविधेमुळे वाढीला लागेल. मुख्य बाजारपेठेत असलेल्या कलादालनात पर्यटकांची रिघ वाढेल. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीही बाजारपेठेतून पूर्ववत सुरु केली आहे. मुख्य रस्त्यावरच दुचाकी, चारचाकी गाड्या उभ्या राहिल्या तर पादचाऱ्यांनाही चालणे मुश्किल होते. योग्य नियोजनाने वाहनतळावर पार्र्किंग व्यवस्था झाल्यास पादचाऱ्यांसोबतच एसटी तसेच अन्य वाहन चालकांना दिलासा मिळेल.
टोलवाटोलवी नको- मालाची वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांची सोय म्हणून मच्छिमार्केट, लोकमान्य टिळक वाणिज्य संकुल व पवनपुत्र भाजी मंडईच्या बांधकामाच्या वेळी त्यांच्या समोरीलच जागा राखीव ठेवण्यात आली आहे. मालाच्या चढ-उताराच्या दृष्टीने तसेच हमालीच्या सोयीच्या दृष्टीने बाजारपेठेतच मोक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे. ती जागा मालाच्या चढ-उतारासाठीच वापरणे अपेक्षित आहे. परंतु तशा प्रशासकीय सूचना किंवा तशा नियोजनासंदर्भात व्यापाऱ्यांशी बैठक याबाबत अनभिज्ञता असल्याने ही केोंडी सुटत नाही. तसेच वाहन तळावरील पार्र्किंग व्यवस्था ही सशुल्क आहे की मोफत याबाबत देखील अजून नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. कुठलाही सार्वजनिक निर्णय घेताना जबाबदारीच्या बाबतीत एकमेकांकडे बोटं दाखवली जातात किंवा हे आमच्या प्रशासनाचे काम नाही अशी टोलवाटोलवीही केली जाते. परंतु वाहतुक केोंडीवर ठोस भुमिका न घेतल्यास ही केोंडी वेंगुर्ला बाजाराच्या मुळावर यायला वेळ लागणार नाही.
बदलाच्या प्रतिक्षेत- वेंगुर्ल्याचा फुलबाजार, फुलांच्या शेजारीच फळांची आकर्षक मांडणी. तिथूनच थोडं पुढे गेलं की मुठलं, तिरफळ, किराईत, हळदीची-केळीची पान, जांभूळ, करवंद, खारातले आंबे-अंबाडे, आमसूल, गोडे आमसूल, आगळ, कोहळा, गावठी पोहे, उकडे तांदूळ, कडधान्य, हरत-हेच्या शेतबिया असा रोजचा गावठी बाजार, हिराची केरसुणी, मातीचीभांडी, विड्याची पाने भाजी मंडईमध्ये रानभाज्यांसोबत कंदमुळे आणि मिळणाऱ्या पालेभाज्या, किराणा मालाची, स्टेशनरीची, कासाराची, कपड्याची, कोल्ड्रींक्सची, मासे खवय्यांसाठीची तसेच सणावाराला उत्सवाचे स्वरुप आणणारा ‘वेंगुर्ल्याचा बाजार’ आपल्या केवळ एका ‘बदला’च्या प्रतिक्षेत आहे. आपण त्याला सहकार्य करणार ना? -सीमा मराठे, 9689902367
प्रतिक्रिया-
– बाजारपेठ परिसरात गाड्या पार्किंग करणाऱ्यांवर आम्ही कारवाई म्हणून सध्या गुलाबपुष्प देऊन त्यांना समजाविण्याचा प्रयत्न सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूने आपल्या गाड्या कुठे लावायच्या याबाबत व्यापाऱ्यांच्याच तक्रारी आहेत. त्यामुळे लवकरच व्यापाऱ्यांची बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात येणार आहे.
– डॉ.अमितकुमार सोंडगे, मुख्याधिकारी
– पार्किंगसाठी मज्जाव करताना ‘फक्त 2 मिनिटाचे काम आहे, पटकन येणार‘ अशी उत्तरे वाहनधारकांकडून येतात आणि काही बाबतीत ते खरेही असते. त्यामुळे बाजारपेठेत आपले काम किती आहे यावरुन पार्किंगचा आधार घ्यावा किंवा नको अशा द्वंद्वात वाहनचालक आहेत. त्यामुळे माणूसकीचा विचार केला तर वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागते. यासाठी प्रत्येकाने स्वयंसूचना देऊनच ही कोंडी फोडली पाहिजे.
– अतुल जाधव, पोलिस निरीक्षक, वेंगुर्ला