नेरुरची रुची साकारणार छोट्या ‘बयो’ची भुमिका

वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी एकांकिकेच्या माध्यमातून रंगभूमीवर पदार्पण केलेली नेरुर गावची सुकन्या कु.रुची संजय नेरुरकर हिची ‘सोनी मराठी’ या वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्न’ या मालिकेसाठी निवड झाली असून त्यातील ‘बयो’ या प्रमुख भुमिकेत ती आपल्याला दिसणार आहे.

      कलेच्या बाबतीत नेरुर गाव हा नेहमी अग्रेसर राहिला आहे. त्याच मातीतील कु. रुची आता आपल्या अभिनयाच्या जोरावर ‘बयो’ ही प्रमुख भुमिका साकारणार आहे. या मालिकेच्या संपूर्ण चित्रीकरण हे निसर्गरम्य आशा देवगड तालुक्यातील पडेल गाव आणि पंचक्रोशीत होणार असून मालिकेची निर्मिती संतोष काणेकर यांची आहे. तर प्रॉडक्शन हेड म्हणून सिंधुदुर्गातील ज्येष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शक मिलिंद दांडेकर यांचे आहे. तर अनेक चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री वीणा जामकर ही या मालिकेत ‘बयो‘च्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे.  सिंधुदुर्गातील अनेक कलाकार या मालिकेच्या माध्यमातून आपल्याला पाहता येणार आहेत.

   गेली 42 वर्षे सामाजिक नाटकांमध्ये कार्यरत असलेली नेरुर येथील ओम शिवकृपा कला क्रिडा मंडळाच्या माध्यमातून रुचिने रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले. निलेश गुरव दिग्दर्शित ‘इ स्कूल’ आणि ‘किलेस पॉपर्टीचो’ या एकांकिकामधून तिने भुमिका साकारली होती. कु. रुची हिला आपल्या वडिलांकडून कलेचा वारसा मिळाला आहे. रुचीच्या या वाटचालीत तिच्या शाळेचाही महत्त्वाचा वाटा आहे. तिला शाळेतील शिक्षकांकडून अभिनयाचे मार्गदर्शन मिळत आहे.

Leave a Reply

Close Menu