संत मुक्ताबाई

हरीदासाच्या घरी। मज उपजला जन्मांतरी॥

म्हणसी काही मागा। हेची देगा पांडुरंगा॥

      मुक्ताई सुंदर- मुक्ताईच्या 721 व्या पुण्यतिथीचे वर्ष सध्या सुरु आहे. शके 1901 हे मुक्ताईच्या जन्मशताब्दीचे वर्ष होते. शके 1201 मध्ये अश्‍विन शुद्ध प्रतिपदेस मध्यान्ह समयी आळंदी येथे विठ्ठलपंत व रुक्मिणी ह्या तपस्वी व वैराग्यसंपन्न मातापित्यांच्या पोटी मुक्ताबाईचा दिव्य जन्म झाला.

      मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी- श्री ज्ञानदेवांची धाकटी बहीण श्री मुक्ताबाई हा आदिशक्तीचा अर्थात देवीचा अत्यंत सात्विक असा अवतार होय. ‘या देवी सर्वभूतेषु शक्तीरुपेण संष्ठीता’ अशी सर्व प्राणीमात्रांमध्ये गुप्तपणे असणारी साध्वी शांती-दया-श्रद्धा सद्बुद्धी मुक्ताबाईच्या रुपाने मूर्तिमान झाली. पूर्वीच्या युगा-युगांत देवीने महिषासुर-चंडमुंड-शुंभनिशुंभ इत्यादी असुरांच्या मर्दनासाठी जे अवतार घेतले त्या सर्व अवतारांत देवीने असंख्य हातात गदा-बाण-खड्ग-ढाल-धनुष्य-स्त्रीशूल इ. विविध शस्त्रे धारण केली होती. मुक्ताबाईचा अवतार हा साधूंच्या वा संतांच्या स्वरुपातला अवतार आहे. दुष्टांचे हनन न होता त्यांची मुख्यतः दुष्ट बुद्धी नष्ट झाली पाहिजे असा संतांचा सतत प्रयत्न असतो. ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ अशीच उत्कट इच्छा श्रीज्ञानदेवांनी आपल्या पसायदानात प्रकट केली आहे. श्रीज्ञानदेवांच्या संतकार्यात सुंदर सहकार्य करण्यासाठी आदिशक्तीने, ‘पुढे चाले ज्ञानेश्‍वर, मागे मुक्ताई सुंदर’, अशा संत स्वरुपांत दिव्य अवतार घेतला. या त्रिभुवन पावनी मुक्ताईचे चिंतन करणे म्हणजे आपण पावन होणेच होय.

      सांभाळी सोपान मजलागी- केवळ गुरुची आज्ञा म्हणून विठ्ठलपंतांनी संन्यासाश्रम सोडून पुन्हा गृहस्थाश्रमात पदार्पण केलं. तेव्हा लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. त्यांना वाळीत टाकले. अशा बहिष्कृत अवस्थेत ज्ञानदेवादी भावंडे जन्माला आली. अर्थात अगदी लहानपणी ह्या बहीष्कृत अवस्थेत ज्ञानदेवादीक बंधूंबरोबर मुक्ताबाईसही दुःख सहन करावे लागले. आळंदी येथे किंवा ज्ञानदेवांच्या पूर्वजांचे गाव आपेगाव येथे जेव्हा निवृत्ती-ज्ञानदेव कोरान्न भिक्षेसाठी बाहेर पडत ‘तेव्हा सांभाळी सोपान मजलागी’ अशी कारुण्यमय अवस्था मुक्ताबार्इंनी बालपणाच्या पहिल्या पाच वर्षात अनुभवली.

      दर्पहरण लीला- मुक्ताबार्इंच्या चरित्राचा समावेश खरोखर श्री ज्ञानदेवांच्याच महान चरित्रात होतो. तिच्या सर्व लिला ‘दर्पहरण लीला’ आहेत. तिच्या साधुत्वाने भरलेल्या व्यक्तिमत्वांत स्पष्टवक्तेपणा-निर्भिडपणा हे गुण विशेषपणे चमकून दिसतात. नामदेव मोठे विठ्ठलाचे भक्त-संतशिरोपणी, पण त्यांना थोडी अहंकाराची बाधा प्रथम झाली होती. पुढे संतसभेत श्री गोरोबा कुंभारांनी आपल्या पापपुण्याचा उपयोग करुन सर्व संतांच्या संतत्वाची पारख केली. त्यावेळी थापटणे डोक्यावर बसताच नामदेव एकदम रागावले. त्या प्रसंगी मुक्ताबाई म्हणाली, ‘गोरोबा, घट कच्चा आहे.’ मुक्ताबाईने स्पष्टपणे नामदेवांना प्रश्‍न केला, ‘अखंड जयाला देवाचा शेजार। का रे अहंकार गेला नाही?’

      नंतर मुक्ताबार्इंच्या तेजस्वी प्रेरणेने विसोबा खेचर नामदेवांना महान गुरु भेटले. गुरुकृपेमुळे नामदेवांचे जीवन भव्य-दिव्य झाले. ज्ञान, प्रेम आणि भक्ती-आनंद यांची अनुभूती आली आणि ‘ज्ञानदीप लावू जगी’ असे महत्कार्य नामदेवांनी केले. पंजाबपर्यंत भागवत धर्मांचा ज्ञानदीप प्रज्वलीत केला. नामदेव मुक्ताईविषयी म्हणतात, ‘लहानशी मुक्ताई। जैसी सणकांडी। केले देशोधडी। महान संत॥’ कारण मुक्ताबाई सडेतोड टीका करीत असे. हा स्पष्टवक्तेपणाचा गुण नामदेवांनी अधोरेखित केला आहे.

      चांगदेव पासष्टी- त्याकाळी चांगदेव मोठे, माणसे जीवंत करणारे असे योगी होते. पण त्यांचे जीवन निरस होते, अहंकाराने, दर्पाने भरलेले होते. हरली चांगयाची भ्रांती, मुक्ताईने दूर केली. चांगदेवाने ज्ञानेश्‍वरांना नमस्कार लिहावा का आशीर्वाद हे न उमगल्याने कोरा कागद पाठविला. तेव्हा ‘हा तर अगदीच कोरा आहे’ असा अभिप्राय मुक्ताबाईने दिला. ज्ञानदेवांनी चांगदेवांना 65 ओवींचे एक बोधमय पत्र लिहिले. पण चांगदेवांना पत्राचा अर्थ कळत नव्हता. तेव्हा ज्ञानदेवांच्या आज्ञेनुसार मुक्ताबार्इंनी विश्रांतीवटाखाली त्या पासष्ट ओव्यांचा आंतरिक अर्थ चांगदेवास सांगितला आणि बोधसंपन्न केले. ‘चांगदेवपासष्टी’ हे त्या काव्याचे नाव आहे. चौदाशे वर्षे वयाच्या चांगयाची मुक्ताबाई गुरु बनली. भक्ति ज्ञान वैराग्याने भरलेला थोर अधिकार मुक्ताबाईचा होता. ती अखंड बोधस्थितीत वास करीत होती. चांगदेवाने त्याच्या अभंगात, ‘मुक्ताई जीवन चांगया दिले’ असा गुरुगौरव मुक्ताबाईचा केला आहे.

      काव्यरचना- मुक्ताबार्इंचे अभंग थोडे असले तरी त्यात आत्मानुभवाचा जोर तिच्या वाणीत, काव्यात भासतो. पंढरी महात्म्य, नाममाहात्म्य व संतसमागम या विषयावर तिची अभंगरचना आहे. सगुण आणि निर्गुण या कल्पनांच्याही पलिकडे जाण्याचे सामर्थ्य मुक्ताबाईच्या ठिकाणी आहे. म्हणून ‘निर्गुणाची सेज सगुणाजी बाज। तेथे केशिराज पहुडले’ अशी कल्पना त्या करतात. ज्ञानेश्‍वरांनी भिंत चालवली, पाठीवर मांडे भाजले या चमत्कारात मुक्ताबाई बरोबर होतीच. भावांच्या कार्यात ती समरस झाली होती. एकदा ज्ञानेश्‍वर रागावून, निराश होऊन ताटी लावून बसले असता त्यांना प्रेमाने, कळकळीने ती विनवणी करताना म्हणते, ‘रागे भरावे कवणासी। आपण बह्म सर्व देशी। ऐशी समदृष्टी करा। ताटी उघडा ज्ञानेश्‍वरा। योगी पावन मनाचा। साहे अपराध जनाचा। विश्‍व जाणिया वण्ही। संत सुखे व्हावे पाणी।’ हे ‘ताटीचे अभंग’ म्हणून प्रसिद्ध आहेत. यात मुक्ताईच्या भावनेची कोवळीक दिसते.

      मुक्ताबाईस लहानपणीच खडखडीत आत्मज्ञान लाभले होते. आपला आध्यात्मिक अनुभव सांगणारा तिचा एक अभंग सुप्रसिद्ध आहे. तो असा-

मुंगी उडाली आकाशी । तिने गिळीले सूर्यासी ।

थोर नवलव झाला । वांझे पुत्र प्रसवला ।

माशी वियाली घार झाली । देखोनी मुक्ताई हासली॥

      तसेच एक तत्त्व धरी बरि नाम गोड असा नामप्रेमाचा उपदेश सकल मानवी जीवांना त्या करतात. बिकटयाची किंवा प्रपंचाची निवृत्ती झाल्यावर ज्ञानप्राप्ती होण्यास उशीर लागत नाही व ज्ञानसोपान मार्गाने जाणाऱ्यास मुक्ती दूर नाही हे मुक्ताबार्इंच्या जीवनाचे सार आहे.

      विद्युल्लता- शके 1218 कार्तिक वद्य 13 ला श्रीज्ञानदेवांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. नंतर त्वरित एक महिन्याने सोपानाने सासवड येथे समाधी घेतली. माघ मासात चांगदेवांनी समाधी घेतली. मुक्ताबार्इंना अतिशय उदास वाटू लागले. संतांच्या समवेत यात्रा करीत मुक्ताबाई खानदेशात एदलाबादजवळील मेहुण गावी आल्या. सद्गुरु श्री निवृत्तीनाथांनी त्यांना ब्रह्मबोधाची जाणीव दिली.

      तेव्हा मुक्ताबाई म्हणाल्या, ‘सर्वत्र परमात्मस्वरुप भरले आहे. जायचे कोठे यायचे कोठे?’ आणि थोड्याच क्षणात आकाशात एकदम मेघगर्जना झाली. विजेचा प्रचंड कडकडाट झाला आणि मुक्ताबाई अदृष्य झाली. भगवद्स्वरुपी लीन झाल्या. तो दिवस वैशाख वद्य द्वादशी शके 1219 हा होता. मुक्ताबाईचे केवळ 18 वर्षे वय होते. साधुसंत दुःखित झाले. होती ऐसी नाही झाली मुक्ताबाई। संत ठायीठायी स्फुंदताती। एदवाबादेस मुक्ताबार्इंची समाधी आहे.

      मुक्ताबार्इंचे जीवन व वाङ्मय हे विद्युल्लतेप्रमाणे चमकून जाणारे तेजस्वी आहे. आदिशक्ती मुक्ताबार्इंचे चरणी हे पुष्प समर्पण.

-डॉ. सौ. सुमेधा प्रभाकर मराठे

वडाळा-मुंबई, मो. 9820232082/8433674827

Leave a Reply

Close Menu