स्वातंत्र्यसंग्रामांतील वेंगुर्लेवासीयांची कामगिरी

भारतात आणि मुख्यतः पुण्या-मुंबईकडे कोणतीही चळवळ सुरू झाली की तिचे पडसाद वेंगुर्ल्यात सर्वप्रथम पडावयाचे हे जवळ जवळ ठरल्यासारखेच झाले होते. 1857 च्या क्रांतियुद्धाच्या वेळी तात्या टोपेच्या सैन्यांत इथल्या पंडित घराण्यापैकी नाना पंडित यांनी बजावलेली कामगिरी वेेंगुर्लेवासीयांसाठी अभिमानास्पद आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला त्यावेळेपासून आजतागायत प्रतिवर्षी भाद्रपद महिन्यांत वेंगुर्ले शहराला उत्सवाचे स्वरुप येतेे.

   राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक व जिल्हा शाखा स्थापन झाल्या तेव्हा येथेही तालुका शाखा स्थापन झाली होती आणि सन 1920 नंतर महात्मा गांधींची देशव्यापी असहकारितेची चळवळ सुरू झाली तेव्हा वेंगुर्लेवासीयांनीही त्यात हिरिरीने भाग घेतला होता. त्या वेळच्या विधायक चळवळींत येथील राष्ट्रीय शाळेचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. श्री. आबासाहेब वालावलकर-ज्यांना पुढे नि आजही वेंगुर्ल्याचे गांधी म्हणून लोक संबोधतात ते या शाळेचे प्रमुख होते. लोकमान्य टिळक, नामदार गोखले, न्यायमूर्ति रानडे, कायदेपंडित मंडलिक, साहित्यसम्राट केळकर, महर्षि कर्वे, ज्योतिषाचार्य दीक्षित, डॉ. आंबेडकर इत्यादि जगन्मान्य लोकांचा पुरवठा कोकणानेच केला आहे.

      त्या वेळच्या काँग्रेसला मदत करणे म्हणजे सरकारी रोष व आपत्ती ओढवून घेणे असे समजत असलेल्या काळांत कै. काकासाहेब भांगले, गुंडोबा जोशी, बाबासाहेब शेणई, गुरुनाथ पार्सेकर, दाजीसाहेब आरोसकर, गणपतराव तोरणे, दत्तोबा पडवळ, शिरोड्याचे नाबर इत्यादि गृहस्थ चळवळीच्या आघाडीवर होते. विशेषतः कै. काकासाहेब भांगले हे मुरब्बी मुत्सद्दी आणि बाबासाहेब शेणई व दत्तोबा पडवळ हे उत्साही व कळकळीचे कार्यकर्ते यांनी राष्ट्रीय सभेचा झेंडा सदा उंच ठेवण्यांत महत्त्वाची कामगिरी बजावली होती.

      त्या काळी जनजागृतीसाठी बाहेरची मंडळीही वारंवार वेंगुर्ल्याला भेट देऊन जात असे. अशा मंडळींत सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार पटवर्धन बुवा यांचा उल्लेख प्रामुख्यानें करावयास हवा. त्यांनी अनेक वेळा वेंगुर्ले येथे येऊन आपल्या पहाडी आवाजानें नि निर्मळ चरित्र्यानें वेंगुलवासीयांच्या अंगी राष्ट्रीय वृत्ति बाणविण्यास मदत केली होती. त्यांच्याशिवाय दे. भ. गंगाधरराव देशपांडे, तात्यासाहेब केळकर, सीतारामपंत दामले, केशवराव जेधे, काकासाहेब गाडगीळ, शंकरराव देव, बेळवी, याळगी इत्यादि महाराष्ट्रांतील नामवंत पुढारी प्रसंगोपात्त वेंगुर्ले येथे येऊन राष्ट्रीय वृत्तीचे पाठ देऊन गेले होते. या प्रांतिक पुढाऱ्यांप्रमाणेच अखिल भारतीय कीर्तीच्या महात्मा गांधी, बाबू राजेंद्र प्रसाद इत्यादींच्या कोकणच्या दौऱ्यांत त्यांनी या भागाला आपलेपणाने भेट देऊन या बाजूच्या लोकांचा गौरव केला आहे.

      श्री. स. वि. कुळकर्णी या गृहस्थांनी येथेे खादी भांडार व स्वदेशी वस्तूंचं दुकान बरीच वर्षे चालविले होते. श्री. आबासाहेब वालावलकर यांनी हरिजनोद्धाराचे कार्य हाती घेतल्यावर येथील हरिजन (महार) वाड्याची सुधारणा, दर आठवड्यास त्या ठिकाणी भजन करणे, त्या लोकांना स्वच्छतेचे व आरोग्याचे पाठ देणे इत्यादि कार्यक्रम कित्येक दिवस चालविले होते. सन 1930-31 च्या मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी शिरोडा येथे झालेला अपूर्व लढा व त्यात शिरोडा व वेंगुर्ले या शहरांनी घेतलेले परिश्रम अविस्मरणीय आहेत.

      पुढे काँग्रेसच्या धोरणांत बदल होऊन तिने कायदेमंडळाच्या निवडणुका लढविण्याचे ठरविले, तेव्हाही या तालुक्याने धडाक्याने भाग घेऊन काँग्रेसचे बहुसंख्य उमेदवार निवडून दिले होते. सन 1937-39 मध्ये काँग्रेस मंत्रिमंडळ अधिकारारूढ होते त्यावेळी काँग्रेस संघटना बलिष्ठ झाली. परंतु दुसऱ्या महायुद्धातील ब्रिटिश धोरणाच्या निषेधार्थ काँग्रेस मंत्रिमंडळ सोडून वनवास पत्करला आणि वैयक्तिक सत्याग्रह पुकारण्यांत आला त्या वेळीही या शहराने उत्साहाने त्यात भाग घेतला होता.

      यानंतरचा ब्रिटिश सरकारशी झालेला लढा म्हणजे बेचाळिसचा संग्राम. हा उघड नि गुप्त दोन्ही प्रकारांनी चालू होता. त्या वेळी देशभर जी धरपकड झाली त्यात येथील कार्यकर्ते ठाकूर, कुळकर इत्यादींना स्थानबद्ध करण्यात आले होते. वालावलकर, सौदागर, शि. गो. रेडकर, सदूभाऊ भांगले, मधुकर देसाई, किसान कार्यकर्ते फास्कू फरसू वाडयेकर व चमणकर, इत्यादिंना अटक होऊन शिक्षाही झाल्या. अनेक तरुण विद्यार्थ्यांना संशयावरून कैदेत ठेवण्यांत आले. श्री बाळकृष्ण पडवळ, श्रीकृष्ण सौदागर, वैकुंठ पडवळ इत्यादींना अनेक दिवस स्थानबद्धतेत काढावे लागले. मिरवणुका नि लाठीहल्ले यातलाही वाटा वेंगुर्ल्याने यथाशक्ति उचलला होता आणि गुप्तपणे दळणवळण वाहतुकीत अडथळे निर्माण करून परकी सरकारी अधिकाऱ्यांना डोके चोळावयास लावण्याचे प्रकारही काहीवेळी झाले होते!

      यानंतर काँग्रेसचे सर्वपक्षीय स्वरूप कमी होऊन कम्यूनिस्ट, सोशालिस्ट इत्यादि पक्षांची मंडळी तींतून बाहेर पडली, तेव्हांही त्या त्या विशिष्ट पक्षाचे कार्य त्या वेळची तरुण मंडळी- विशेषतः त्या वेळचा विद्यार्थीवर्ग करीतच होता. हिंद सेवासंघ, वेंगुर्ला स्टूडंटस यूनियन इत्यादि नावांनी अनेक कार्यकर्ते ठिकठिकाणी उघड अगर गुप्त रूपाने कार्य करीत, सभा घेत, शिबिरे भरवीत, प्रभातफेऱ्या काढीत. एका वेळी यांच्या 22 शाखा होत्या आणि सभासदसंख्या 500 वर गेली होती! श्री. भाऊ खानोलकर, गुरुनाथ गाडेकर, कांता शेट्ये इत्यादि यावेळचे प्रमुख कार्यकर्ते होत.

      वेंगुर्ला येथील श्री देव रामेश्‍वर देवस्थानचे पूर्वीचे व्यवस्थापक कै. काका गुरव उर्फ गणेश महादेव गुरव. श्री देव रामेश्‍वर देवस्थानसोबतच गावातील बऱ्याच देवस्थानांचा जीर्णोद्धार करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी वेळोवेळी श्री देव रामेश्‍वराचा कौलप्रसाद घेऊन तसेच समस्त परब मानकरी, गावातील व्यापारी वर्ग, भक्तमंडळी यांच्या विचारविनिमयाने मंदिरातील परिवार देवतांची स्थापना करुन त्यांचे वार्षिक उत्सवही सुरु केले. हे सर्व करत असतानाच त्यांनी स्वातंत्र्य चळवळीतही सहभाग घेतला.

      श्री देव रामेश्‍वर मंदिरात आषाढ महिन्यात अखंड भजनी सप्ताह असतो. 1947 च्या स्वातंत्र्याच्या लढ्यात देशभर देशभक्तीचे वारे वाहू लागले होते. त्यावेळी रामेश्‍वर मंदिरातील अखंड भजनी सप्ताहाच्या निमित्ताने श्रींच्या गाभाऱ्यात देखावे सादर करण्याची प्रथा होती आणि आजही ती सुरु आहे. या देखाव्यांमध्ये (पूजेमध्ये) त्यावेळी सिंहारुढ देवी (भारतमाता) राक्षसाचा वध करते असा देखावा साकारला होता. त्यासाठी त्या राक्षसास इंग्रज सरकारी अधिकाऱ्याचा गणवेश चढविला होता. त्यावेळच्या या प्रबोधनकारी दृश्‍यांची इंग्रजांनी तातडीने दखल घेतली व हा देखावा साकारणारे कै.काका गुरव, कै. बाबल शेणई व अन्य सहकाऱ्यांना अटक झाली होती.

      स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी प्रसंगी 1997 साली भारतीय स्वातंत्र्य संग्रामात केलेल्या कामगिरीच्या गौरवार्थ महाराष्ट्र शासनाकडून सन्मानपत्र आणि मेडल देऊन गौरविण्यात आले होते.

      यानंतरचा काळ म्हणजे महायुद्ध संपून ब्रिटिश सरकारने आपण होऊन सत्तात्याग करून येथून आपले चंबूगबाळे उचलून निघून जाण्याचा काळ. देशभरातील विविध स्तरावरील चळवळी, उठाव, क्रांतीकारकांचे बलिदान या सर्र्वांचा परिणाम 20 फेब्रुवारी 1947 रोजी ब्रिटीश सरकारला आम्ही 15 महिन्यात सत्तादान करु अशी घोषणा करावी लागली आणि अपूर्व उत्साहाने देशाच्या नव्या बांधणीला आरंभ झाला. स्वातंत्र्य संग्रामातील संबंधीत बातम्या, घडामोडी सविस्तर वृत्त साप्ताहिक किरातमधून त्याकाळी त्या त्या वेळी प्रसिद्ध झाले होते.

संपादन – सीमा शशांक मराठे, 9689902367

(संदर्भ- वेंगुर्ले महाल व परिसर, लेखक- अनंत वासुदेव मराठे व वासुदेव वामन कामत वाघ, साप्ताहिक किरात जूने अंक)

Leave a Reply

Close Menu