कै. तु. बा. खडपकर सर

(रा. कृ. पाटकर हायस्कूरचे शिक्षक कै. तुकाराम बाबुराव खडपकर यांचा 1 सप्टेंबर हा स्मृतिदिन. त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा हा लेख.)

       1 सप्टेंबर 1989, माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक दुःख देणारा दिवस! कल्पवृक्ष कन्येसाठी, लावूनिया बाबा गेला ह्या कवी पी. सावळाराम यांच्या काव्यपंक्तीसम आपले समस्त जीवन अहोरात्र इतरांसाठी त्यागणारे आणि अविरत कर्तव्यदक्ष मायेचा झरा, माझे वडील तुकाराम बाबुराव खडपकर यांचे दुःखद, अनपेक्षित देहावसान झाले आणि मी पितृसुखाला पारखी झाले.

      याच दुर्भाग्यपूर्ण दिवशी माझ्या वडिलांचा पर्यवेक्षक पदोन्नती आणि त्यांच परममित्र कै. कार्डोज सर यांचा सेवानिवृत्ती असा संयुक्त कार्यक्रम रा. कृ. पाटकर हायस्कूल येथे आयोजिण्यात आला होता. कार्यक्रमापूर्वी वडीलांना अस्वस्थ वाटू लागले. आपले आवडते शिपाई कै. वसंत सातार्डेकर यांना थोडा चहा देण्याची विनंती केली. पण नियतीचा डाव वेगळाच होता. चहाची चव चाखण्यापूर्वीच त्यांची तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने प्राणज्योत मालवली आणि सारेच दुःखसागरात बुडाले. माझे नाना मला सोडून गेले.

      माझे वडील आणि कार्डोज सर यांची एवढी अतूट आणि निस्वार्थी साथ होती की प्रत्येकाला हेवा वाटावा. हातात सायकल असूनही दोघेही चालत जात आणि चालत येत. घरातून बाहेर पडल्यावर आणि शाळेतून घरी परतताना पहिला व दिवसातील शेवटचा थांबा कार्डोज सरांच्या घरी वैचारिक, शैक्षणिक आणि विद्यार्थी कल्याणाच्या कारणास्तव असायचा. घरुन नेलेला जेवणाचा डबा हा निव्वळ खडोपाडीच्या उपाशी विद्यार्थ्यांसाठीच असायचा. वडीलांची भूक कै. गणेश सातार्डेकर यांच्या कॅन्टीनमधील चहा आणि शेंगदाणा लाडवावर भागायची. अगदी 25 वर्षे हे नित्यनेमाने होत होते.

      शाळेत सन्मा. सर्वश्री. दाभोलकर सर (दादा), त्यांचे बंधू, श्री. परब (भाऊ), श्री. जांभोटकर (तात्या), श्री. आर.पी.जोशी, श्री. नाईक द्वयी, श्री. धांडे, श्री.साने, श्री.मराठे, श्री.चोपडे, श्री.कुबल, श्री.शशी केसरकर, श्री.करंगुटकर, श्री.प्रभू द्वयी स तसेच सन्मा. सौ. शिरोडकर, सौ. शेणई, सावंत, सौ. नाईक मॅडम वर्ग आणि इतर शिक्षक मिळून सुमारे 25 जण शिक्षक कक्षात असायचे. ज्याचे समर्थ आणि कुशल नेतृत्व करायचे मु. कै. गावस्कर सर आणि लिपिक कै. शिरोडकर सर यांनी आपल्या अध्यापनाने विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी बनवून हायस्कूलचे नाव जगभरात पोहोचविले.

      त्या काळी या हायस्कूलमध्ये हजारो विद्यार्थी अध्ययन करीत होते. माझ्या शाळेची शिस्त जरी कडक असली तरी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण हिताची होती. सहकाऱ्यांची मुले, शेजाऱ्यांची मुले वा स्वतःची मुले यांना शैक्षणिकदृष्ट्या वाऱ्यावर सोडणे वा शिक्षणात अन्य कोणतेही अनावश्‍यक सूट देणे हा भाग तर अजिबात नव्हता. नानांच्या मुलीने (मी) गृहपाठ वेळेत केला नाही हे ऐकल्यावर घरी नानांचा धम्मकलाडू मिळणार तोही दुप्पट हे निश्‍चित होते. हीच होती माझ्या वडीलांची अनुशासनता.

      तेव्हा आठवी ते अकरावी प्रत्येकी पाच वर्ग होते. या सर्व वर्गांना ते हिंदी विषयाचे अध्ययन करीत आणि तेही विषयात गोडी निर्माण करुनच! त्यांच्या त्यावेळच्या अध्यापनाची आजही आठवण काढली जाते. त्यासोबतच एनसीसी च्या आर्मी विभागाची संपूर्ण जबाबदारी ते कौशल्यपूर्ण रितीने अनेक वर्षे सांभाळत होते. राष्ट्रभाषा हिंदी प्रचार सभा, पुणे संचलित शालाबाह्य परीक्षांचे काम अत्यंत सचोटीने यशस्वीपणे केले. रा. भा. पंडीत परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना बी.ए. समकक्ष दर्जा मिळावा यासाठी ते प्रचंड झटले. त्याचा वाचनाची अतोनात आवड होती. विविध क्षेत्रातील पुस्तके संग्रहीत करण्याचा त्यांना नाद होता. त्याबरोबरच ते रोजनिशी लिहायचे.

      आमच्या हायस्कूलात रक्षाबंधन, स्वातंत्र्यदिन, शारदोत्सव, शिक्षक दिन, स्नेहसंमेलन इत्यादी अतिशय उत्साहात साजरे व्हायचे. तिळगुळ समारंभादिवशी सर्व वर्ग विद्यार्थीच रंगवत असत आणि दहावीच्या निरोप समारंभानंतर डोळ्यात अश्रू घेऊनच बाहेर पडत असत. माझे वडील या सर्व कार्यक्रम आयोजनात अग्रभागी असत.

      शिक्षक कक्षातील सर्वच शिक्षकांकडे नेहमीच सुसंवाद असायचा, वितंडवाद आणि वैचारिक मतभेद कधीच नसायचा. सर्वजण एकामेकांना सांभाळत आणि निखळ गप्पा चालायच्या. त्या फक्त विद्यार्थ्यांचे हित आणि शाळेच्या शैक्षणिक वृद्धिंगतेच्या!

      त्यांचे आणि कार्डोज सरांचे नाते काही वेगळेच होते. दोघांचे धर्म भिन्न असूनही विचार, मने आणि समर्पित वृत्ती एकच होती. दोघेही आठवड्यातून एकदातरी महाजनवाडीत आपले गुरु कै. दाभोलकर गुरुजी यांचेकडे जाऊन अध्यात्मिक विषयावर एकत्रित चर्चा करीत आणि गुरुचे आशीर्वाद घेत. हा त्यांचा क्रम कित्येक वर्षे अखंड चालू होता. माझे वडील निस्सिम दत्तभक्त होते आणि उपासकही होते. महाराष्ष्ट्र आणि बाहेरही अनेक तीर्थक्षेत्री त्यांचे जाणे-येणे होते.

      कार्डोज सर आमच्या घरी गणेशोत्सवासाठी आवर्जुन येत तर माझे वडील ख्रिसमसला सरांच्या घरी न चुकता जात. हिच गोष्ट जैनुद्दीन गोलंदाज काकांच्या बाबतीत! खरेच धार्मिक सहिष्णूतेचे एक उत्तम उदाहरण!

      आज वडील तनाने नाहीत पण मनाने निश्‍चितच आमच्या सोबत आहेत. त्यांचे वात्सल्य, संयमीपणा, शिकवण आणि परोपकार वृत्ती आम्हाला प्रेरणादायी आहेत.

      परमेश्‍वर त्यांच्या पवित्र आत्म्याला पुन्हा एकदा भूतलावर मनुष्य देहाते पाठवो हिच माझी प्रार्थना!!

-सौ. सुखदा सुधाकर ढोके पूर्वाश्रमीची भारती तुकाराम खडपकर

राजवाडा-वेंगुर्ला, 9421368281

Leave a Reply

Close Menu