देव भक्ती-भावाचा भुकेला!

          श्री गणेश चतुर्थी हा महाराष्ट्रातील हिंदूंचा एक अत्यंत आवडता व लोकप्रिय असा सण आहे. या दिवशी घरोघरी श्री गणेशाच्या पार्थिवप्रतिमेची प्राणप्रतिष्ठायुक्त पूजा व आराधना केली जाते. या सणाच्या निमित्ताने घरातल्या मंडळींचे दोन चार दिवस मोठ्या आनंदात जातात. मुंबईतील काही चाकरमानी मंडळी कोकणात गणेश चतुर्थीच्या निमित्ताने येतात. गावात आपले नातेवाईक व मित्रमंडळी यांची गळाभेट झाल्याने ही चाकरमानी मंडळी खुश होते.

      श्री गणेश मूर्तीच्या पूजाराधनेच्या मार्गदर्शनासाठी गावोगावच्या तज्ञ पुरोहितांची (भटजी लोकांची) फार पूर्वीपासून मदत होत आहे. पण आजकाल वाढत्या महागाईमुळे आणि समाजातील काही लोकांची हिंदू धर्मावरील श्रद्धा हळूहळू कमी होत असल्यामुळे पुरोहित वर्गाचा पोट व्यवसाय धोक्यात येत आहे. काही भटजी लोकांनी आपले पारंपारिक व्यवसाय बदलून नवीन व्यवसायाला सुरुवात केली. अशा प्रकारे गणेश चतुर्थीच्या उत्सवाची श्री गणेश मूर्तीची यथासांग पूजाराधना सांगणाऱ्या पुरोहितांचा समुदाय दिवसेंदिवस दुर्मीळ होत चालल्यामुळे भाविक लोकांची कुचंबणा होत आहे.

      श्री गणेश मूर्तीची पूजा पारंपारिक प्रथेप्रमाणे संस्कृत या देववाणीत दिलेली आहे. मूर्तीची पूजा करण्यासाठी यजमान लोक मूर्ती समोर बसून जेव्हा पुरोहित मंडळी यजमानांना संस्कृत भाषेच्या माध्यमातून धडाधडा पूजा पाठ सांगतात तेव्हा जर यजमानाला संस्कृत भाषा अवगत असेल तर त्याला पूजा पाठांमध्ये काय सांगितले आहे याची थोडीशी कल्पना येईल. पण यजमान जर अनभिज्ञ अगर अशिक्षित असेल तर त्याला पूजा पाठाचा अर्थ वगैरे गोष्टी न समजल्यामुळे तो पुरा गोंधळून जातो.

  महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी गणेश उत्सव होत असल्याने श्री गणेशाची मूर्ती पूजा करण्यास पुरोहित मंडळींची उपस्थिती फारच कमी पडते. पूजेसाठी पुरोहित वर्ग सर्व ठिकाणी पूजेच्या वेळी जाऊ शकत नाही. त्यामुळे घरच्या मंडळींची कुचंबणा होते तसेच श्री ची पूजा करणारा वर्ग फारच मोठ्या प्रमाणात असतो. हा समाज अशिक्षित असल्यामुळे भटजीनी सांगितलेला पूजा पाठ याची त्यांना यथार्थ कल्पना येत नसते. तरी पण सुशिक्षित वर्गातील लोकांपेक्षा ह्या लोकांची भगवंतावर पूर्ण श्रद्धा असते. त्यामुळे विधीयुक्त पूजा करण्यात त्यांना जरी अडचण भासली तरी भगवंताच्या श्रद्धेपायी हे लोक तथाकथित अडचण सहन करतात. मला माझ्या गावची एक गोष्ट आठवते. काही वर्षांपूर्वी माझ्या परिचयाचा बाळा सयरोजी या नावाचा वयस्कर शेतकरी रस्त्याच्या कडेला कपाळाला हात लावून खिन्न मुद्रेने खाली बसला होता. त्याला पाहताच मी बोललो, “बाळा काय झाला रे?“ बाळा बोलला “काय सांगू तूका? चार वाजत इले तरी भटाचो पत्तो नाय, पोटात कावळे आरडतत.“ बाळाची व्यथा मला समजली. बाळाला मी विचारले, “बाळा पूजेसाठी भट नाय आयलो तर तू जेवल्या खाल्ल्याशिवाय रवशिल?“ बाळा बोलला “तसा नाय रे, भटान गणेशार गंध फुल घातल्याशिवाय आमका समाधान वाटणा नाय.“ बाळाचे हे उद्गार ऐकून माझ्या डोक्यातील किडा वळवळला. मी बाळा सयरोजीचा  विचार करू लागलो. बाळाची श्री गणेशावर अपार भक्ती. तसेच श्री गणेशाची यथासांग पूजा, भटजीमार्फत का होईना, पारंपारिक पद्धतीने यथासांग झालीच पाहिजे ही भावना.

      पूजाराधनेच्या मार्गदर्शनासाठी गावोगावच्या तज्ञ पुरोहितांची मदत पूर्वी होत असे. पण अलीकडे असा पुरोहित वर्ग दुर्मिळ होत चालला आहे. त्यामुळे भाविक भक्तांची कुचंबणा होते. ती दूर करण्यासाठी मराठे कुटुंबातील एक विद्वान ब्राह्मण तत्कालीन किरात या साप्ताहिकाचे संस्थापक कै. अनंत वासुदेव मराठे यांनी ‘मंगलमूर्ती मोरया’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात लेखकाने श्री सिद्धिविनायक व मयुरेश्‍वर यांच्या पौराणिक कथा व इतर माहिती दिली आहे. तसेच श्री गणेशाचा पूजा पाठ म्हणून षोडशोपचार पूजा विधि संस्कृत या देववाणीत दिला आहे व संस्कृत भाषेचा मजकूर सर्वसामान्यांना कळेल ह्या हेतूने त्याचा सोप्या मराठी भाषेमध्ये भावार्थ दिला आहे. यामुळे भाविकांची होणारी कुचंबणा बरीचशी दूर झाली.

      माझा एक पुण्याचा जोशी नावाचा मित्राने मला सांगितले की आपण गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा करताना पूजा पाठाचे एखादे पुस्तक घेऊन श्री गणेशाची यथासांग पुजा शांतपणे करतो. त्यामुळे मला पूर्णपणे समाधान मिळते. जोशीबुवांचा अनुभव लक्षात घेऊन इतर गणेश भक्तांनी जर जोशीबुवांचे अनुकरण केले तर त्यांनाही मानसिक समाधान मिळेल.

-वासुदेव मंगेश राजाध्यक्ष

मालाड, मुंबई – 9969344200

Leave a Reply

Close Menu