गणपतीच्या माध्यमातून जपली जाते बांधिलकी

वेंगुर्ला येथील कनयाळकर कुटुंबाचा शाही पेहरावातील गणपती

      जुन्या पिढीतील घराण्याची व्यावसायीक ओळख गणपतीच्या माध्यमातून अजूनही कनयाळकर कुटुंबिय जपत आहेत. पिढ्यानपिढ्या शाही पेहराव केलेल्या गणपतीच्या मूर्तीचे पूजन कनयाळकर यांची येणारी प्रत्येक पिढी करीत आहेत.

      पूर्वीच्या काळी व्यापारी वर्गाला जसा समाजात मान होता. तसाच मान त्यांच्या घरी होणाऱ्या सण उत्सवांनाही होता. आपल्या व्यवसायाची किंवा उद्योगाची ओळख गणपती पूजनातून भाविकांसमोर आणली जायची. त्यानुसार समाजात त्यांचे वजन असायचे किंवा त्यांच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन हा श्रेष्ठत्वाचा असायाचा.  आपल्या व्यवसायानुसार गणपतीची मूर्ती बनविण्याची पद्धत अजूनही काही ठिकाणी पहायला मिळते. वेंगुर्ला-सुंदरभाटले येथील कनयाळकर कुटुंबिय अशाच गणपतीचे पूजन करीत आहेत. पूर्वीच्या काळी त्यांचा नारळाचा मोठा व्यवसाय होता. त्या व्यवसायाला साजेसा असा गणपती त्यांच्या पूर्वजांनी बनवून त्यांचे पूजन केले. विना मुकुटाच्या या गणपतीचा पेहराव धोतर व सदरा असा तर गणपतीच्या डाव्या हातामध्ये घड्याळ आणि सदऱ्याच्या खिशाला पेन पहायला मिळते. सिंहासनावर बसलेल्या अशा या गणपतीच्या डाव्या पायावर उजव्या पायाची मांडी घातलेला आहे. गणपतीच्या या पोझमध्ये कुठलाही बदल होत नाही. फक्त बदल होतो तो रंगसंगीतमध्ये. बाकी पेहराव सुद्धा हाच ठेवला जातो. 

      कनयाळकर कुटुंबियांचा नंतरच्या काळात व्यवसाय कमी झाला. तसेच त्यांची पुढची पिढी ही अन्य ठिकाणी कामाला लागली. परंतु, तो व्यवसाय नसला तरी शाही पेहरावातील गणपती मात्र, त्यांनी बदलला नाही. आपले घराणे पूर्वीच्या काळी व्यावसायीक असल्याचा पुरावा त्यांनी या गणपतीच्या माध्यमातून जतन करुन ठेवला आहे. अशा या गणपतीची कनयाळकर कुटुंबिय दरवर्षी 5 दिवस तन, मन, धन अर्पण करुन भक्तिभावाने सेवा करतात. हा गणपती बनविण्याचे काम पूर्वीच्या काळी चिपकर मूर्तीकार करीत असत. तर आता चेतन नार्वेकर यांच्या चित्रशाळेत ही मूर्ती बनविली जात आहे.

Leave a Reply

Close Menu