‘आत्महत्या‘ एक चितन

जागतिक आरोग्य संघटनेने १० सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून जाहीर केला आहे. विस्कटलेला संसार, परीक्षा कठीण गेल्याने आलेले नैराश्य, आर्थिक विवंचनेमुळे भविष्याची चिंता… या आणि अशा अनेक कारणांमुळे आत्महत्या करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याचा दररोज अनेक केसेस जिल्हा रुग्णालयासारख्या इतरही हॉस्पिटल मध्ये येत आहेत.  बरेचदा अतिशय वाईट पद्धतीने आपले जीवन संपवले जाते. मात्र नैराश्यातून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करणा-यांना हॉस्पिटलांमध्ये मदतीचा हात मिळतो. बरेचदा त्यांच्या आयुष्याची नव्याने सुरूवात होते.

         घोर नैराश्य आणि आत्महत्या यांचा खूप जवळचा संबंध आहे. ४० ते ६० टक्के लोक नैराश्याच्या तीव्र झटक्यानंतर आत्महत्या करतात. गेल्या २० वर्षात आत्महत्यांचे प्रमाण देशात ७.९ टक्क्यांवरून १०.३ टक्के वाढते. ७५ टक्के आत्महत्या ग्रस्तांचे वय ४५ पेक्षा कमी तसेच आजारपणातील नैराश्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ४१ टक्के आत्महत्यांची कारणे गुलदस्त्यात राहतात. पुरुषांमधील ३५ टक्के आत्महत्या ह्या मद्यपानाच्या आहारी जाऊन केल्या जातात.

         नैराश्य आणि आत्महत्या इतक्या का वाढतात त्याचं उत्तर आजच्या जीवनशैलीत आहे. आत्महत्या म्हणजे स्वतःचे जीवन संपवणे. आत्महत्येचा विचार किवा कल्पना या मनोवृत्तीला आत्महत्या करण्याची प्रवृत्ती म्हणतात.

        आज इथे मी सामान्य खरंतर अतिसामान्य माणसांनी आत्महत्या कशी समजून घ्यायची? याची काही उत्तरे मांडते आहे. आत्महत्याया वृत्तीपर्यंत माणूस अनेक रस्त्यांनी पोहचतो त्यातले काही रस्ते –

१. या जगाला आणि मनुष्याच्या अस्तित्वाला एकंदरीतच काही अर्थ नाही त्यामुळे आयुष्य स्वतःच्या हाताने संपवणे हा एकच खरा रस्ता. म्हणून मी मरतो.

२. माझ्या जगण्याने इतरांना आणि विशेषतः जवळच्या माणसांना त्रास आहे. हा त्रास संपविण्यासाठी माझा मृत्यू गरजेचा आहे. त्यांचं माझ्यावर प्रेम आहे पण मी मेल्याशिवाय त्यांची सुटका नाही. खूप दुःख करतील पण नंतर विलग होतील आणि आपापल्या आयुष्याला लागतील. मी मरणे हेच उत्तर.

३. खूप प्रयत्न झाले. आता थकलो/हरलो/  संपलो. मी जातो आता. तुम्ही सुखी रहा.

४. माझा प्रचंड संताप झाला आहे. मी हा टोकाचा राग स्वतः वर काढणार. खून की आत्महत्या हाच माझ्यापुढे पर्याय आहे. मी निवडली आत्महत्या. तुम्हाला आता जन्मभराची टोचणी राहील आणि तीच तुमची शिक्षा.

५. माझे आयुष्य मला सन्मानाने जगायचे आहे. कोणत्याही कारणाने मानहानी किंवा परावलंबित्व नको. ते आल्यास मी सन्मानाने माझे आयुष्य स्वतः संपवून टाकीन.

६. टोकाची निराशा (मानसिक आजार – निराशेचा) आणि त्यामुळे विचारबुद्धी कुंठित होणे. त्यातून आत्महत्या.

७. कमालीची वेदना, दुर्धर आजार.

८. माझे संपूर्ण अस्तित्व एका ध्येयासाठी आहे (प्रसिद्धी/बक्षीस/नातं/पद/ई). ते ध्येय मिळत नसेल तर आयुष्याला अर्थ नाही. मला असे निरर्थक आयुष्य नको. म्हणून आत्महत्या. आणि असे अनेक. किंवा त्यांची विविध मिश्रणे.

   पण या सगळ्याचा शेवटचा रस्ता म्हणजे – टोकाचा एकटेपणा आणि या एका रस्त्याशिवाय काहीच उरले नाही याची पूर्ण खात्री. कधी रागात क्षणार्धात पटलेली. कधी विचारपूर्वक खूप वेळाने पटलेली. अशा वेळेस सोबतीची गरज असते. खांद्यावर हात ठेवून जवळ धरून ठेवणारी व्यक्ती लागते. हाताला धरून या वादळातून पलिकडे नेणारी साथ लागते. अनेकदा त्या मदत करणा-या व्यक्तीला माहिती सुद्धां नसते की आपल्या शेजारी बसण्याने, एक चहाचा कप दिल्याने, एक स्मित हास्य दिल्याने, एक धन्यवाद म्हटल्याने आपण कोणाचातरी जीव वाचवला. बरेचदा तो एक क्षण टळला तर जीव वाचतो.

      माणसाने माणसासारखे वागणे, एकमेकांना धरून राहणे, जवळच्या माणसाला समजावून घेऊन ‘‘मीच बरोबर आहे‘‘ पेक्षा ‘‘मी तुझ्या बरोबरच आहे‘‘ हे कृतीतून दाखवणे महत्त्वाचे आहे.

       मानसिक अंतर समजावून कमी करणे गरजेचे आहे. बोला. हात धरा. एकटे सोडू नका.

रेश्मा खेमराज भाईप, मनोविश्लेषक

मानसिक आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग 

 

Leave a Reply

Close Menu