‘सकळ विद्यांचा आगरु।‘

              शासक कसा असावा याचे प्रतीक म्हणून गणरायाकडे आदराने पाहिले जाते. त्याचे आचरण, शरीररचना याचे दाखले सातत्याने दिले जातात. ब्रह्मणस्पतीसुक्तामध्येही याचा उल्लेख आढळतो. गणपतीचे गजमुख म्हणजेच सोंड हे महत्त्वाचे अंग मानले जाते. राष्ट्रप्रमुखाचे नाक कसे असावे हे ते सुचविते. कुठे काही कटकारस्थान चालू असेल तर त्याची जाणीव त्याला लागलीच झाली पाहिजे, अतिसुक्ष्मातील सुक्ष्म बदलाची हालचाल शासनकर्त्याच्या घ्राणेंद्रियाला व्हावी याचे प्रतिकात्मक रुप म्हणजे गजमुखाची सोंड.

       कृष्णपिंगाक्ष असलेल्या गणपतीचे डोळे अतिशय बारीक असतात. आपण एखादी गोष्ट बारकाईने पाहताना डोळे आपोआपच लहान होतात. राज्यकर्त्याच्या देखरेखीतून बारीकसा तपशील सुद्धा सुटता कामा नये हे यातून सुचविते. सुपाचे काम पाखडून चांगले तेव्हढे सुपात घेऊन कचरा सुपाबाहेर टाकण्याचे असते. हजारो बातम्या प्रमुखाच्या कानावर आदळत असतात. तेव्हा त्यातील चांगले तेव्हढे घेऊन त्याचा विनियोग विधायक कामांना करून घेता आला पाहिजे. एकांगी विचार न करता हलक्या कानाचेही राहू नये हे या बाप्पाचे सुपासारखे कान सुचविते.

       एका हातात पाशम्हणजे दुष्ट शक्तींना बांधून ठेवलेले. दुस-या हातात अंकुशम्हणजे अतिरेकी शक्तींना आवर. तिस-या हातात परशूम्हणजे परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर एक घाव दोन तुकडे आणि हे सर्व करीत असतांना चांगल्या लोकांना अभयदान करणारा वरदहस्त. अशा या चार हातांचे प्रतिक राष्ट्रप्रमुखाला दुप्पट वेगाने काम करावे आणि करताना वाटेत येणा-या अडथळ्यांना कसे थोपवावे, तसेच या अडथळ्यांना बाजूला सारताना प्रजेचे हित जपणे सर्वात महत्त्वाचे कसे आहे याची या प्रतिकातून प्रचिती दिली आहे. बाप्पाचे असलेले लंबोदरराष्ट्रप्रमुखाला सर्वांचे दोष, त्रुटी सांभाळून, गुप्त बातम्या पोटात ठेवून जनहितार्थ कार्य करण्याचे सुचविते.

       बाप्पाचे वाहन मुषकराज. खरंतर सर्वात लहान आणि जेवढे खातो त्याच्या तिप्पट नासाडी करतो अशी ज्याची ख्याती. अशा उंदरासारख्या छोट्या-छोट्या विध्वंसक प्रवृत्तींवर केवळ निरीक्षणातून प्रभूत्व गाजवून ताब्यात ठेवता आले पाहिजे. एकदंत असलेला गणपती तर संकट समयी स्वतःवर वार झेलून स्वतःला वाचवितो व दातातील अर्धाच भाग तुटू देतो. कुठल्याही प्रसंगी स्वतःबरोबरच प्रजेचे संरक्षण किती महत्त्वाचे आहे हे सुचविते. कारण, प्रजा तेथेच राजा.

       अथर्वशीर्षामध्ये सुद्धा शरीरशास्त्राचा बारकाईने अभ्यास केला आहे. सद्यस्थितीत गणपती बाप्पाकडे अशा डोळस नजरेने बघण्याची गरज निर्माण झाली आहे. विज्ञानामुळे मानवाने प्रगती साधली असली तरी, त्यातून निर्माण होणा-या संकटांची मालिका संपविण्याचे सामर्थ्य त्यांच्यात नाही. तेव्हा या प्रतिकात्मक गजाननाकडून आपल्याला याची तीव्रता कमी करण्याचे सामर्थ्य अंगीकारण्यास मदत होईल. शेवटी भारतीय समाजमन हे उत्सवप्रिय आहे. परिस्थितीनुरुप उत्सवाचे चित्र जरी वेगवेगळे किवा बदलत असले तरी मनातला भक्तीभाव हा तोच आहे.

      समर्थ रामदास स्वामींनी श्री गणेशाला सकळ विद्यांचा आगरु।असे म्हणून ऐसा जो परम समर्थ, पूर्ण करी मनोरथ।अशी महती वर्णिली आहे. त्याप्रमाणे श्री गजानन सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो अशी आपणही प्रार्थना करुया.

 

Leave a Reply

Close Menu