कलंक नव्हे वेडाचा; आजार हा मनाचा …!

वेड आणि आजार यातला फरक त्यांच्या मूळ संकल्पनेत आहे, त्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात आहे. वेड म्हंटलं की त्याच्याभोवती पाशवी शक्तींचं गारूड उभं राहतं. वेड बरं होत नाही. वेड ज्यांना लागतं ते त्यांचं नशीब किंवा पूर्वजन्मीच्या पापाचं फळ म्हणून त्यांनी भोगत रहायचं असतं. त्याचा सगळं दोष एकत्र स्वतः त्या व्यक्तीचा, कुटुंबाचा, पूर्वजांचा किंवा जागेचा – काळाचा असतो. ज्याच्या उपायांमध्ये स्वतः त्या व्यक्तीला – कुटुंबाला प्रत्यक्ष काम करता येण्यासारख्या गोष्टी अंतर्भूत नसतात. वेड लागलेल्या व्यक्तींना इतरांनी घाबरून राहणं, त्यांची थट्टा-टिंगल-टवाळी करणं हे गृहीत धरलेलं आहे. वेडाच्या मागे एक कलंकित वलय आहे. मानसिक आजाराने त्रस्त अनेकानेक व्यक्ती – कुटुंब त्या वलयामध्ये अडकून वर्षानुवर्षं शास्त्रीय उपचारांपासून लांब राहतात किंवा / आणि अशास्त्रीय उपाय करत राहतात. त्या त्या विशिष्ट आजाराच्या आणि व्यक्तीच्या लक्षणांच्या चढ-उतारानुसार या उपायांचा फायदा झाल्यासारखं वाटतं. जो अगदीच तकलादू आणि तात्पुरत्या स्वरूपाचा असतो.

      याच्याउलट आजार म्हटलं की त्यात कोणाला दोष देण्याऐवजी आजाराला कारणीभूत घटक शोधण्याचा प्रयत्न, शास्त्रीय उपचार, बरं होण्याची जास्त शक्यता आणि जास्त प्रमाण, वैयक्तिक-कौटुंबिक-सामाजिक पातळीवर करता येणारे ठोस उपाय आपसूकच येतात. यामुळे आजाराभोवती कलंकित वलय नाही. मनाचा आजार म्हणजे नक्की काय, हे आजार का उद्भवतात, त्यांची प्राथमिक लक्षणं कोणती, त्यावरचे उपाय काय काय आहेत, त्याला प्रतिबंध कसा करता येईल हे कळलं तर आपण ज्याला वेड म्हणतो त्या अवस्थेपर्यंत फार कमी लोक पोचतील. जे पोचतील त्यातले सुद्धा बरेच लोक त्यातून बाहेर पडून किंवा आजार नियंत्रणात ठेवून कार्यरत राहतील आणि अर्थपूर्ण आणि आनंदी आयुष्य जगू शकतील.

      मन हा इतर अवयवांसारखा वेगळं काढून दाखवता येणारा अवयव नाही. मेंदूतल्या काही क्रियांना एकत्रितपणे मन म्हणतात. चेतना-जाणीव, आकलन-स्मृती (स्मरणशक्ती), विचार-भावना, इच्छा-प्रेरणा, तर्क-कल्पना, व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये आणि अजागृतावस्था अशा विविध क्रिया चालणाऱ्या मेंदूच्या भागांना आणि प्रत्यक्ष त्या क्रियांच्या प्रक्रियेलाच मन असं म्हणतात. ह्या सगळ्या क्रिया मेंदूतल्या विशिष्ट रसायनांच्या माध्यमातून रासायनिक संदेशवाहक म्हणून काम करणाऱ्या neurotransmitters च्या साहाय्याने घडत असतात. ह्या क्रिया व्यवस्थितपणे चालू राहण्यासाठी विशिष्ट रसायनांचं ठराविक विशिष्ट प्रमाण असणं आवश्‍यक असतं. रसायनांचं प्रमाण कमी-जास्त झालं की संदेशवाहक यंत्रणा गोंधळून जाते. या यंत्रणेतल्या काही भागांच्या क्षमता कमी-जास्त होतात. काहींच्या वेगावर परिणाम होतो. काहींची इतर भागांशी असलेली जोडणी विचित्र प्रकारे होते किंवा तुटते. काही भाग एकाच ठिकाणी अडकल्यासारखे होतात. ह्या सगळ्या गोष्टींच्या परिणामी विचार-भावना-वर्तन या त्रिकोणाची सुसंगती बिघडते. हा बिघाड तात्पुरता असू शकतो किंवा जास्त काळासाठी सुद्धा असू शकतो. अगदीच कमी प्रमाणात म्हणजे लक्षात न येण्याएवढा किंचित असू शकतो किंवा खूप जास्त प्रमाणात सुद्धा असू शकतो. बरं, तो मधून-मधून होतो आणि इतर वेळी व्यवस्थित कार्य सुरू राहतं असंही होऊ शकतं. ज्या प्रमाणात, जेवढ्या वेळासाठी आणि जेवढ्या वारंवारितेने हे सगळं घडेल त्या त्या प्रमाणात त्या भागांची झालेली मोडतोड लक्षणांच्या स्वरूपात दिसत असते.

      बिनतारी संदेश वहन यंत्रणा बिघडल्यामुळे ज्या अडचणी निर्माण होतात, त्याच प्रकारच्या फक्त भावना-विचार यांच्याशी निगडित अडचणी (म्हणजेच दृश्‍य किंवा त्या व्यक्तीला जाणवणारी लक्षणं) मानसिक आजारांमध्ये निर्माण होतात. रसायनांचं प्रमाण बिघडण्यात आनुवंशिकता (म्हणजेच व्यक्तीची-व्यक्तिमत्वाची जीवशास्त्रीय जडणघडण) हा घटक जसा काम करतो तसंच आपल्या विचार-भावना यांचाही वाटा असतो. आपल्या मनाची म्हणजेच ह्या सगळ्या प्रक्रियांची जडणघडण आपल्या कौटुंबिक-सामाजिक परिस्थितीमधून होत जाते. आपण कुठल्या परिस्थितीत कसा विचार करणार, कुठल्या भावना कशा व्यक्त करणार, कुटुंब किंवा समाज म्हणून कोणत्या गोष्टींना किती महत्त्व देणार, कोणत्या गोष्टींना योग्य / अयोग्य, व्यवहार्य / अव्यवहार्य, प्रस्तुत / अप्रस्तुत ठरवणार या सगळ्यांच्या घुसळणीतून मनाची बांधणी होत असते. त्यामुळेच कौटुंबिक-सामाजिक परिस्थितीतील अनेक लहान-मोठे घटक मानसिक स्वास्थ्यात किंवा आजारांमध्ये मोलाची भूमिका बजावतात. आता एकदा हे लक्षात आलं की गोळ्यांचं काम आणि मानसोपचाराची भूमिका ह्या दोन्ही गोष्टी लक्षात यायला मदत होईल. ह्या बिघडलेल्या रसायनांचं प्रमाण पूर्ववत (म्हणजेच आवश्‍यक तेवढं) करणं हे काम मानसिक आजारांवरील गोळ्या करतात. बांधणी जेवढी सशक्त तेवढी ती प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून टिकून राहणार.

      मानसोपचारांमध्ये प्रामुख्याने तुमच्या मनाची बांधणी नक्की कशी आहे, ती कुठे तकलादू राहिलेली आहे, विशिष्ट परिस्थितीमुळे कुठे आणि कशी खिळखिळी झाली आहे, ती कशी पूर्ववत करता येईल त्यावर काम केलं जातं. म्हणजेच व्यक्तीच्या विचार, भावना आणि वर्तनावर काम केलं जातं. पर्यायाने ह्या त्रिकोणाला त्याची सुसूत्रता परत मिळवून दिली जाते. गोळ्यांमुळे रसायनांमधला बिघाड लवकर पूर्ववत होतो. मात्र ती पूर्ववत झालेली सुसंगती टिकवण्यासाठी दीर्घकाळ विचार-भावनांवर काम करावं लागत. दीर्घकाळ मानसोपचार प्रक्रियेतून जावं लागतं.

      मानसिक आजारांवरील उपचार एकांगी (फक्त गोळ्या किंवा फक्त मानसोपचार) असतील तर बरेचदा त्यांचा तात्पुरता परिणाम संपला की आजार उलटण्याची शक्यता असते. अगदी सुरूवातीच्या काळात, सौम्य लक्षणं असताना, अस्वास्थ्याच्या पातळीवर योग्य उपचार सुरू केले गेले तर बरेच मानसिक आजार पूर्णपणे बरे होऊ शकतात. प्रत्येक मानसिक आजाराला औषधांची गरज लागेलच असं नाही. केवळ मानसोपचारांच्या साहाय्याने काही सामान्य आजार प्राथमिक अवस्थेत असताना निश्‍चित आटोक्यात आणता येतात.

      मानसिक आजारांकडे आजार अशा शास्त्रीय चष्म्यातून बघितलं तर त्याभोवती असलेला वेडाचा कलंक दूर करण्यात आपण यशस्वी होऊ. आजार होऊ नये म्हणून घ्यायची दक्षता, आजार झाल्यावर करायचे उपचार आणि काळजी याबाबतीत लक्षणीय फरक होईल आणि मानसिक आजारातून आरोग्याकडे प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढेल. आजारी व्यक्तींना या प्रवासात मदत करणाऱ्यांचीही संख्या तेवढ्याच प्रमाणात वाढताना दिसेल.

– मीनाक्षी (मानसोपचार तज्ज्ञ)

अधिक माहितीसाठी संपर्क : सहज ट्रस्ट, फोन – 02363-299629/9420880529

Leave a Reply

Close Menu