माणुसकीचा जागर करण्याची गरज – रंगनाथ पठारे

बिल्कीस बानू खटल्यातील बलात्कार आणि खून करणाऱ्या गुन्हेगारांना न्यायालयाने दिलेली शिक्षा पूर्ण होण्याआधीच सोडल्यानंतर त्या गुन्हेगारांचे स्वागत हे आरती ओवाळून, सत्कार करुन, मिठाई वाटून करण्यात आले. माणसे एवढी संवेदनाशुन्य कशी होऊ शकतात? समाजातील या विकृती असलेल्या गुन्ह्याचे उदात्तीकरण कसे करु शकतात या गुन्ह्याचे कौतुक? समाज म्हणून आपण कुठल्या गुंगीत अजून रहाणार आहोत, असा सवाल करीत गेल्या आठ ते नऊ वर्षात भयानक स्वप्न दाखविणाऱ्या माणसांच्या पाठीमागे आपण सर्व लागलो आहोत. त्यामुळे आपण आपले सामाजिक सूत्र विसरत चाललो आहोत. युद्ध जिंकून आल्यासारखे आरोपींचे स्वागत पेढे वाटून होते तेव्हा त्याची जाणीव प्रकर्षाने होते. माणूस समुह म्हणून आपण एकांगी पडत चाललो आहोत आणि म्हणून पुन्हा एकदा माणुसकीचा जागर करण्याची गरज निर्माण झाली आहे. आणि त्यासाठी कृती कार्यक्रम आवश्‍यक आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी वेंगुर्ला येथे व्यक्त केले.

      बॅ. नाथ पै जन्मशताब्दी वर्षानिमित्त वेंगुर्ला नगरवाचनालय व बॅ.नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने वर्तमान राजकीय, सामाजिक आणि साहित्य-संस्कृती विषयी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्याशी मुक्त संवाद साधण्यात आला. हा कार्यक्रम 12 सप्टेेंबर रोजी वेंगुर्ला नगरवाचनालयात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात बॅ.नाथ पै यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आणि साने गुरुजींच्या ‘खरा तो एकचि धर्म‘ या गीताने करण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांचा वेंगुर्ला नगरवाचनालयाचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांच्या हस्ते, कथा-कादंबरीकार डॉ. महेश केळुसकर यांचा मंगल परुळेकर यांच्या हस्ते, लेखिका आणि पत्रकार संध्या नरे-पवार यांचा बॅ. नाथ पै सेवांगण मालवणचे कार्याध्यक्ष दीपक भोगटे यांच्या हस्ते, साहित्यिक आणि ‘शब्दालय‘ प्रकाशनच्या प्रकाशक सुमती लांडे यांचा सदानंद बांदेकर यांच्या हस्ते, ॲड. देवदत्त परुळेकर यांचा माया परब यांच्या तर सेवांगणचे कार्याध्यक्ष दीपक भोगटे यांचा राजेश शिरसाट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच बॅ. नाथ पै यांचे सहकारी जयप्रकाश चमणकर, सुधाकर तांडेल यांना या कार्यक्रमात तर पंढरीनाथ उर्फ आना महाले यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मानित करण्यात आले.

      या कार्यक्रमाला जयप्रकाश चमणकर, साहित्यिक प्रविण बांदेकर, डॉ.संजिव लिगवत, डॉ.राजेश्‍वर उबाळे, ॲड.संदिप निबाळकर, डॉ.शरयू आसोलकर, डॉ.श्रीकांत सावंत, हरिहर वाटवे, लक्ष्मीकांत खोबरेकर, अनुजा तेंडोलकर, सुधाकर तांडेल यांच्यासह जिल्ह्यातील ज्येष्ठ व नवोदित साहित्यिक, साहित्य प्रेमी, विद्यार्थी उपस्थित होते.

      रंगनाथ पठारे म्हणाले की, बॅ. नाथ पैंचा विश्‍वास लोकशाहीवर होता. चर्चेने प्रश्‍न सुटतात असे त्यांचे ठाम मत होते. सामाजिक, राजकीय कितीही उलथापालथ झाली तरी ही लोकशाहीच अशा संवेदनाशुन्य घटनांना ठिकाणावर आणत आली आहे. साहित्यिकांनी बॅ.नाथ पैंनी सांगितल्याप्रमाणे हस्तिदंती मनोऱ्यात न रहाता, स्वप्नाळू दुनियेत न रमता जे सत्य आहे ते प्रखरतेने मांडत राहिले पाहिजे आणि त्यादृष्टीने समाज मनाचा आरसा म्हणून काम करताना संवेदनशिलता कशी वाढीला लागेल यासाठीही काम केले पाहिजे, असे सांगितले. 

      यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, आज आपण संभ्रमीत अवस्थेत आहोत. राहुले गांधींच्या भारत जोडो यात्रेचा येथे उल्लेख झाला. मात्र मी या दांभिकपणाच्या विरोधात आहे. सत्ताधारी, विरोधी पक्षाच्या दांभिकपणाला पर्याय देणाऱ्या एकमुखी अशा तरुण विचारांचे एकत्र येणे व त्यातून नेतृत्व निर्माण होणे ही स्वाभाविक प्रक्रिया अजून व्हायची आहे. ती ज्या दिवशी होईल त्यावेळी नव्या परिवर्तनाला सुरुवात होईल.

      यावेळी संवादक डॉ.महेश केळुसकर, संध्या नरे-पवार, सुमती लांडे व ॲड.देवदत्त परुळेकर यांनी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांना विविध प्रश्‍न विचारीत मुलाखतीद्वारे आजच्या समाजातील ‘आस्थेचे प्रश्‍न‘ असलेल्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आदी विषयांवर विस्तृत चर्चा केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साप्ताहिक किरातच्या संपादक सीमा मराठे यांनी, प्रास्ताविक ॲड.देवदत्त परुळेकर यांनी तर आभार प्रा.महेश बोवलेकर यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu