सण आणि स्थानिक बाजारपेठ

भक्तीसोबत कलेला व्यासपिठ देणारा, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देणारा, व्यावसायिकांची पत वाढविणारा असा आणि आबालवृद्धांना आनंद देणारा गणेश चतुर्थीचा सण सुरु होऊन पहाटेपर्यंत भक्तिचा जागर करीत त्याची सांगता देखील झाली. साधारणतः अकरा दिवस चालणारा हा उत्सव यावर्षी मात्र २१ दिवसपर्यंत सुरु होता. त्यातच अंगारकी संकष्टी आल्याने काही घरगुती गणपती १७ दिवसपर्यंत राहिले. तर खवळे महागणपती, आचरा संस्थानचा गणपती, कुडाळ पोलिस स्टेशन, सावंतवाडीतील उभाबाजार, सालईवाडा आणि वैश्यवाडा आदी जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या गणपतींचे विसर्जन २१व्या दिवशी झाले.

      दरम्यान, चतुर्थीपूर्वी पावसाने दडी मारल्याने गणेशभक्तांना महत्त्वाच्या दिवसात बाजारपेठेत खरेदी करता आली.  त्यामुळे गणेश चतुर्थीपूर्वी आधी दोन दिवस व्यापारी वर्ग व्यस्त दिसून आला. तरीपण यावर्षी चाकरमान्यांची संख्या घटली असा सूर बाजारपेठेतून ऐकू येत होता.

      गणेश चतुर्थी धुमधडाक्यात साजरी करता यावी यासाठी प्रत्येकजण बरेच महिने त्याचे नियोजन करीत असतात. त्यासाठी विक्रेतेही नवनविन सजावटीचे साहित्य आणत असतात. कोरोनामुळे एका विशिष्ट ठिकाणी असलेला बाजार विभागला गेला. कोरोना काळात पोटाची खळगी भागविण्यासाठी नवनविन विक्रेते निर्माण झाले. जागा मिळेल तिकडे दुकान थाटले जाऊ लागले. ग्राहकांनाही घरापासून काही अंतरावर वस्तू मिळत असल्याने तेथेच खरेदी होऊ लागली. कोरोना संपला तरी मात्र, व्यवसाय करण्याची जागा बदलली नाही. काहींनी कायमस्वरुपीच दुकान मांडले. आता तर ग्रामीण भागातही भाजीसोबत कपड्यांचीही दुकाने नजरेस पडत आहेत. सणासुदीच्या कालावधीत ही दुकाने तशीच राहिल्याने मुख्य बाजारपेठेवर याचा थोडाफार परिणाम होत आहे आणि त्यातच सणांना विविध दुकानांची संख्या वाढत असल्याने दैनंदिन विक्रेत्यांकडे त्यांचे रोजचे ग्राहकच राहिले, त्यात नविन ग्राहकांची भर पडली नाही.

      कोरोनाने लोकांना काटकसरीने कसे जगावे हे शिकविल्याने गणेशभक्तांनी जेवढे हवे तेवढीच खरेदी केली. एखाद्या वस्तूचा साठा करुन ठेवण्याचे प्रमाण यावेळी कमी झाल्याचे दिसून आले. अलिकडे स्वतःही चवीच खायचं आणि दुस-यालाही चांगलं चवीचंच द्यायचं याकडे कल वाढलेला दिसतो. त्यामुळे खाण्याची वस्तू निरखून-पारखून घेतली जात आहे. आकर्षक वेष्टनात विविध कंपनीचे उपलब्ध असलेले गोड मोदक खरेदी करण्याचे प्रमाण बरेच घटले आहे. स्थानिक मिठाईच्या दुकानात किरकोळ स्वरुपात असलेले मोदकाचीच खरेदी होत असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. काजू मोदक, आंबा मोदक, खवा मोदक आदी स्थानिक दुकानामधील मोदकांची खरेदी जास्त झाल्याचे निदर्शनास आले.

      सणासुदीला कपड्यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर होते. त्यात आता ऑनलाईन शॉपिगचा फंडा अस्तित्वात आला आहे. परंतु, निरखुन पारखुन घ्यायची सवय असल्याने ब-याचजणांनी ऑफलाईन शॉपिगला पसंती दर्शविली. यावर्षी रेडिमेड कपड्यांची जास्त विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गणपती विराजमान करण्यापासून ते त्याच्या विसर्जनापर्यंत फटक्यांचे आवाज आपल्या कानावर पडतात. विसर्जनाला तर फटाके फोडण्याचे प्रमाण जास्तच असते. दरवर्षीच्या तुलनेपेक्षा यावर्षी फटाक्यांच्या विक्रीत घटजाणवली. याचे मुख्य कारण म्हणजे, फटक्यांचे वाढलेले दर. सुमारे ३० टक्यांनी फटाक्यांच्या दरात वाढ झाली. त्यामुळे जास्त किमतीचे फटाके खरेदी न करता आपल्याला परवडेल अशाच फटाक्यांची भाविकांनी खरेदी केली. लहान मुलांसाठी उपलब्ध असलेल्या फटाक्यांची खरेदी करण्यात आली.

      इतरांपेक्षा आपला गणपती, त्याच्या पूजनाची जागा किवा संपूर्ण घर गणेशोत्सवामध्ये आकर्षक दिसावी यासाठी प्रत्येकजण गृह सजावटीला प्राधान्य देत असतो. त्यासाठी विविध मखर, विद्युत रोषणाई आदी प्रकार दिसून येतात. यावर्षी मात्र, विद्युत उपकरणांची खरेदी जास्त प्रमाणात झाली नाही. ऑनलाईन शॉपिगचा सगळ्यात जास्त फटका इलेक्ट्रीकल विक्री करणा-या स्थानिक विक्रेत्यांना बसला. ब्लुटुथ, पेनड्राईव्ह, युएसबी, विद्युत बल्ब, रोषणाईच्या माळा अशा वस्तू या ऑनलाईनने मिळत असल्याने ब-याच जणांनी ऑनलाईन मागविण्याला प्राधान्य दिले.

       गेल्या काही वर्षामध्ये करंज्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. घरी घाट घालण्यापेक्षा रेडीमेड करंज्या घेण्याकडे ब-याच जणांचा कल आहे. त्यामुळे अशा करंज्या बनविणा-या महिला व बचतगटांना रजगार उपलब्ध झाला आहे. त्यातून त्यांना आर्थिक हातभारही मिळत आहे. या करंज्या दराला परवडणा-या असल्याने लोकांमधून याची मागणी होती. यंदा महिन्याच्या अखेरीला गणेश चतुर्थी आल्याने म्हणावा तसा ग्राहक खरेदी करताना दिसला नाही असेही मत व्यापारीवर्गाकडून व्यक्त झाले. एकूणच यावर्षीच्या गणेश उत्सवात मागील दोन वर्षापासून असलेले कोरोना काळातील निर्बंध पूर्णपणे हटविण्यात आल्याने गणेशभक्तांनी घरगुती आणि सार्वजनिक स्तरावर मोठ्या उत्साहात सण साजरा केला.

 

Leave a Reply

Close Menu