स्त्री सबलीकरणासाठी मेहनत सुरू असतानाच स्त्रीच्या तारक रुपाची स्त्री शक्ती म्हणून उपासना होणं हे तफावत जरी दाखवत असलं तरी कमालीचं आशावादी चित्र आहे. मुळातच नारी ही एक शक्ती आहे असे जर असेल तर त्या शक्तीचे सबलीकरण म्हणजे नेमकं काय हा प्रश्न मला राहून राहून पडायचा. परंतु मानसशास्त्राचा अभ्यास करताना अंतःप्रेरणा जागृती ही संकल्पना जेव्हा समोर आली तेव्हा शक्तीच्या सबलीकरणाचा नेमका अर्थ हाच असावा असा मी विचार केला. भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती आदरणीय श्रीमती द्रौपदी मुर्मु ह्या अनुसूचित जमातीमधून आलेल्या पहिल्या महिला राष्ट्रपती. हे खरे तर स्त्रीच्या त्या अंतःप्रेरणा जागृतीचे मूर्तिमंत उदाहरणच ठरले. कोणी एकेकाळी मातृसत्ताक असलेली भूमी कोणत्यातरी अनाकलनीय कारणामुळे पितृसत्ताक संस्थेकडे वळली आणि महिला गटाला दुय्यम नागरिकत्वाची जागा मिळाली. त्यानंतर शिक्षण, मानसन्मान, इतर सुख सोयी या सगळ्यापासूनच वंचित राहिलेल्या महिलावर्गाने स्थित्यंतरांच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये नारीशक्तीचे प्रदर्शन करत आपली जागा पुन्हा मिळवण्याचा यशस्वी प्रयत्न केला गेला. आत्ताच्या समाजात नजीकच्या इतिहासापेक्षा महिलांना नक्कीच दर्जाची आणि संधीची समानता देण्याचा सर्व स्तरातून प्रयत्न होताना देखील दिसतो आहे. परंतु मानसशास्त्रामध्ये सांगितल्या गेलेल्या सार्वत्रिक सुप्तावस्थेमध्ये (universal unconscious) अजूनही निश्चितच महिला या कमजोर, भावनिक अशीच काहीशी प्रतिमा उमटलेली दिसते. स्त्रीच्या असहायतेचा फायदा घेऊन होणाऱ्या अत्याचारांवर विश्लेषण करताना ‘दोष तुझ्या सौंदर्याचा’ अशा मानसिकतेतून स्त्रीच त्यामध्ये दोषी आहे असेही विचार पसरवले जातात. समोर जीवंत मूर्त स्वरूप देवी प्रकट झालेली असताना प्रतिकात्मक पूजा अर्चा करण्याचा ढोंगीपणा/दिखावूपणा आपण करतो. आणि नऊ महिने कळा सोसून हे जग दाखवणाऱ्या त्या माऊलीचा त्या नऊ दिवसांनंतर (नवरात्री) पून्हा ती एक अबला म्हणून दृष्टीकोन अंगीकारतो.
यामध्ये निश्चितच एक दुसरी बाजू देखील आहे ती म्हणजे महिलांनी जोपासण्याच्या स्वाभिमानाची. स्त्री पुरुष समानता पून्हा आणण्यासाठी महिलांना दिल्या गेलेल्या वेगवेगळ्या सोयी सुविधा आणि त्यामुळेच महिलांना मिळालेलं साहजिक स्वातंत्र्य या सगळ्यातून काही वेळेला दिशाभूल होत वाहवत जाणारा युवती वर्ग ही दखल घेण्याची बाब वाटते. सबलीकरणातून मिळालेल्या बळाचा सन्मार्गाने उपयोग होणं आणि महिला वर्गाने आत्मसन्मान जपत बदलणाऱ्या परिस्थितीला अनुरूप प्रतिसाद देणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. काही मोजक्या युवतींच्या अविचारातून घडणाऱ्या चुका सार्वत्रिक लागू करून त्याचे सामान्यीकरण करत निष्पाप आणि निरागस महिलेच्या वाट्याला येणाऱ्या अत्याचाराला तिचीच काहीतरी चूक असावी अशी विनातपसणी शंका उपस्थित करणे म्हणजे त्या तारक संजीवनीच्या प्रभावावरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखे होईल.
1975 च्या दरम्यान जास्तीत जास्त मुलींना शिक्षणाची संधी मिळू लागली. त्यामुळे राहणीमानाचा दर्जा सुधारु लागला. मुलींच्या शिक्षणाचा उपयोग तिच्या आर्थिक स्वावलंबनासाठी होऊ लागला. आणि त्याहीपेक्षा जास्त कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी होऊ लागला. तरीही तिच्यावरची बंधनं आणि कुटुंबाच्या तिच्याकडून असणाऱ्या अपेक्षा यात आजही फार काही बदल झालेला नाही. उलट पूर्वीच्या नोकरी न करणाऱ्या स्त्रिया फक्त घरच्या व्यवस्थापनाची जबाबदारी घेत होत्या. आता तर ती जबाबदारी तिचीच. शिवाय पैसेही कमवायचे आणि तेही घरासाठी खर्चायला दिले पाहिजेत. कारण आता तू आमची आणि तुझे पैसेही आमचे हक्काचे. हे सगळं करत असताना तिला घरच्या जबाबदारीत कोणी मदत करत असतील तर अपवादात्मक परिस्थिती वगळता सूर उपकारकर्त्याचा. त्यामुळे स्त्री स्वावलंबी असूनही तिच्या मनात कायम वस्तीला अपराधीपणाची भावना. बरं, या सगळ्या व्यापात छंद जपायचा ठरवलाच तर त्यावर किती कुजबूज आणि चर्चा. त्यामुळे साठच्या दशकातल्या नोकरी करणाऱ्या पहिल्या पिढीच्या स्त्रिया कुटुंबातच अक्षरशः विरघळून गेल्या. पण 75 नंतर काहीशी परिस्थिती बदलली. स्त्रिला जसा नवऱ्याच्या, मुलांच्या जिद्दीचा, चिकाटीचा, कर्तृत्वाचा अभिमान वाटतो तसा तिच्या विषयी इतरांनाही तो वाटायला हवा. तो इतरांना वाटताना त्याची सुरुवात स्वतःपासूनही व्हायला हवी.
सुरवर आणि ईश्वरांना देखील वरदान ठरलेली, सर्व व्याधींवर संजीवनी ठरत तारक म्हणून उभी असलेली ही स्त्री शक्ती जर खरोखर प्रभावशाली ठरवायची असेल तर वरकरणी ढोंगीपणा सोडून समर्पण भावनेने त्या स्त्री शक्तीचा आदर, तिच्यावरची श्रद्धा आणि तिच्या असहायतेमध्ये आधारस्तंभ होण्याचा मनोमन पण करूया आणि खऱ्या अर्थाने मूर्त नारी शक्तीची आराधना करूया. कारण देवत्व आजमावायचं असेल तर स्त्रीचा आणि स्त्रीत्वाचा आदर हा मनापासून असला पाहिजे…
यत्र नार्यस्तु पुजन्ते रमन्ते तत्र देवता
-पियुषा प्रभुतेंडोलकर,
7020242216