पर्यटन विकासासाठी समन्वय हवा

२७ सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिवस साजरा झाला. चर्चासत्रे, कार्यक्रम, सत्कार, भविष्यकालीन योजनांचे संकल्प, त्याचा कृतिकार्यक्रम जाहीर करून हा दिवस साजरा झाला. वेंगुर्ल्यातही जिल्हास्तरीय पर्यटन व्यावसायिकांचा मेळावा संपन्न झाला. पर्यटन म्हटले की, पर्यटकाला लागणा-या सोईसुविधांची नुसती यादी डोळ्यासमोर आणली तरी कित्येकांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगाराची संधी उपलब्ध होत असते हे आपल्याला दिसून येईल. निवास व्यवस्था, जेवण-नाश्त्यासाठी भाजीपाला, मासे, चिकन, मटण, अंडी, दूध, दूधाचे पदार्थ, किराणा माल, बेकरी उत्पादने, रुम सव्र्हस, स्वच्छता कर्मचारी आणि अशा अनेक घटकांवर पर्यटन अवलंबून असते.

      सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हाम्हणून घोषित होऊन तब्बल तीस वर्षे झाली आहेत. पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने स्थानिक पातळीवर गेली काही वर्षे पर्यटन महोत्सवाचे लोण पसरले आहे. काही ठिकाणी ऐतिहासिक वास्तू जतन करण्याच्या दृष्टीने किल्ले संवर्धन महोत्सव, पर्यावरणाला अनुसरुन कांदळवन संवर्धन उपक्रम, बचतगटांना प्रोत्साहन म्हणून त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री, पारंपरिक खेळांची ओळख नविन पिढीला होण्यासाठी खेळ आठवणीतले‘, निर्सगतः उत्पन्न झालेल्या रानातील भाज्यांची ओळख आणि त्याचे औषधी गुणधर्म समजण्यासाठी रानभाजी महोत्सव‘, रानभाज्यांची पाककला स्पर्धा अशाप्रकारचे उपक्रम घेऊन पर्यटन वाढीस लागण्यासाठी स्थानिक संस्था प्रयत्न करीत आहेत.

      केरळ, बेंगलोर या ठिकाणी तेथील राज्य शासन नारळ, फणस अशा फळांचे, त्यापासून बनविलेल्या पदार्थांचे महोत्सव भरवत असते. साहजिकच पर्यटक, अभ्यासक यांच्यासह विविध यंत्रसामुग्री बनविणा-या कारागिरांचीही पावले याठिकाणी वळताना दिसतात. सिंधुदुर्गातील वेंगुर्ला फळ संशोधन केंद्र, एमटीडीसी, कांदळवन प्रकल्प, कॉयर बोर्ड असे अनेक शासकीय उपक्रम वर्षभर चालतात. पर्यटनाला अनुकूल असे वातावरण असताना सर्व यंत्रणामधील समन्वयाचा अभाव आपल्याला योग्य दिशा देत नाही.

      सिंधुदुर्गात विमान सेवा तर सुरू झाली आहे.विमानसेवेतील त्रुटी दूर करणे, रात्रीच्या लँडिंगची व्यवस्था यामध्ये पाठपुरावा करून बदल घडवून आणण्यामध्ये सिंधुदुर्गचे राजकीय नेतृत्व कमी पडत आहे. त्याचबरोबर पर्यटन स्थळी जाण्यासाठी खड्डेविरहित रस्ते मिळणे हे तर नागरिक आणि पर्यटकांसाठी स्वप्नच आहे. पण नजिकच्या गोवा राज्यात पाऊल ठेवताच ही स्थिती बदलेली दिसून येते. गोव्यातील समुद्रकिना-यापर्यंत जाणारे रुंद आणि चांगले रस्ते पर्यटकांना सोयीचे ठरतात. रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण नजिकच्या काळात पूर्ण झाले आणि जिल्ह्यांतर्गत रस्त्याच्या स्थितीत सुधारणा झाल्यास नक्कीच सिंधुदुर्गात येणा-या पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल.

      पर्यटन जिल्हा म्हणून निवास न्याहारी योजना राबविणा-यांना काही विशेष सवलती, काही पर्यटन प्रकल्पांसाठी गतिमान धोरण आखणे यासारख्या बाबींची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने स्थानिकांच्या कल्पना, स्थानिकस्तरावर भरविले जाणारे पतंग महोत्सव, कासव जत्रा, पर्यटन महोत्सव, येथील सांस्कृतिक ओळख असणारे शिमगोत्सव यासारख्या इव्हेंटसना पर्यटन महामंडळाने शासनाचे पाठबळ व राष्ट्रीय पातळीवर व्यापक प्रसिद्धी दिल्यास सिंधुदुर्ग आणि कोकणची ओळख अधिक ठळकपणे जगाच्या नकाशावर येईल. याकरीता लाल फितीतला कारभार दूर करुन पर्यटन क्षेत्रातील व्यावसायीक तज्ज्ञांची मदत पर्यटन महामंडळाने घ्यायला हवी. किनारपट्टी लगतची गावे, सह्याद्रीचा परिसर अशा पर्यटन बहरण्याच्या क्षमता असलेल्या गावांमध्ये महाराष्ट्र पर्यटन मंडळाच्या निवास न्याहारी योजनेला अधिक प्रोत्साहन मिळायला हवे. तसेच किनारपट्टी भागात सीआरझेड कायद्याची जाचक तरतुदींबाबत स्थानिकांना विश्वासात घेऊन सर्वमान्य धोरण निश्चित करायला हवे.

      पर्यटकांना आकर्षित करणारे समुद्र किनारे, गडकिल्ले, मंदिरे, सह्याद्रीच्या डोंगररांगा याबरोबरच कोकणातील कृषी पर्यटनाचेही ब्रॅण्डींग आणि मार्केटींग चांगल्याप्रकारे झाल्यास वेगळ्या दर्जाचे पर्यटन गावात बहरु शकेल. दिशादर्शक, माहिती फलके यामुळे गावात आलेल्या पर्यटकालाही गावात राहण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. अन्यथा दरवर्षीप्रमाणे जागतिक पर्यटन दिन नेहमीच्याच सदस्यांसह साजरा केला जाईल. हे करायला हवं, ते करायला हवं अशा घोषणा होतील, चर्चासत्रेही होतील. परंतु, त्यासाठी कामात गतिमानता आणि शासनाच्या सर्व विभागामध्ये समन्वयाची नितांत आवश्यकता आहे.

                                                   

Leave a Reply

Close Menu