मेळाव्यात पर्यटनप्रेमींनी मांडल्या भौतिक सुविधांच्या समस्या

जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग व महाराष्ट्र चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चर यांच्यावतीने जिल्हास्तरीय पर्यटन व्यावसायिकांचा मेळावा २७ सप्टेंबर रोजी साई दरबार हॉलमध्ये आयोजित केला होता. यातील चर्चासत्राचे उद्घाटन ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर माजी आमदार प्रमोद जठार, राजन तेली, पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, कॅप्टन संदीप भुजबळ, एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक संजय ढेकणे, पर्यटन संस्थेचे निलेश चेंदवणकर, नकुल पार्सेकर, पर्यटन मंत्रालयाच्या माजी संचालक भावना शिंदे, आनंद कर्णिक, नायब तहसिलदार संदीप पाणमंद, आरती कार्लेकर, श्रीमती लाड आदी उपस्थित होते.

      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय करणा-या व्यावसायिकांना येणा-या समस्या व अडचणी याबाबत निलेश चेंदवणकर, कपिल पोकळे, महेश सामंत व अॅड.सुषमा प्रभू-खानोलकर यांनी महत्त्वपूर्ण असे मुद्दे यावेळी उपस्थित केले. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे जाणारे दिशादर्शक फलक मुख्य रस्त्यावर त्याचे अंतर दाखवून अद्याप लावले गेलेले नाहीत.

         पर्यटन व्यवसायातील जलक्रीडा, जमिनीवरील क्रीडा व हवाई क्रीडा याबाबतचे परवाने हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन खात्याचे कार्यालय सुरू करून त्यामार्फत देण्यात यावेत. हे परवाने देण्यापूर्वी जिल्ह्यातूनच त्या त्या ठिकाणची तपासणी व्हावी. तसेच पर्यटन स्थळांकडे जाणारे रस्ते तेथे पिण्याची पाण्याची सोयीसुविधा निर्माण कराव्यात. जिल्ह्यातील किनारपट्टी भागात निवास न्याहारी व अन्य पर्यटन व्यवसायांना जो अकृषक कर लादला जात आहे, तो बंद करण्यात यावा व त्यांना शासनाकडून परवाने द्यावेत. या स्वरूपात आपल्या समस्या मांडल्या यावर एमटीडीसीचे अधिकारी संजय ढेकणे,बंदर खात्याचे कॅप्टन संदीप भुजबळ, नायब तहसीलदार संदीप पाणमंद यांनी शासकीय चौकटीत राहून उत्तरे दिली.

   जिल्ह्यात पर्यटन व्यवसायिकांना पर्यटन व्यवसाय करण्यास येणा-या अडीअडचणी समस्या बाबतचे मुद्दे सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन महासंघाने तयार करून घ्यावेत. या समस्या सोडविण्यासाठी मंत्रालयात राज्याचे सी.एम.च्या अध्यक्षतेखाली व पर्यटन व्यवसायांना परवानगी देण्याकरता येणा-या विविध खात्यांच्या अधिका-यांची बैठक हे मंत्रालय स्तरावर होण्याची गरज आहे. त्यासाठी आपण ही बैठक मंत्रालयात लावण्यासाठी निश्चितच मदत करू असे सुधीर सावंत यांनी सांगितले.

      माजी आमदार राजन तेली व प्रमोद जठार यांनीही पर्यटनातील समस्यांबाबत खंत व्यक्त केली. तर जिल्ह्याचे पालकमंत्री रविद्र चव्हाण व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या जागतिक पर्यटन दिनाच्या कार्यक्रमाला व व्यावसायिकांना शुभेच्छा दिल्या.   सूत्रसंचालन प्रा.सचिन परुळकर यांनी तर आभार पर्यटन महासंघाचे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष महेश सामंत यांनी मानले. कार्यक्रमाच्या ठिकाणी पर्यटन स्थळांचे प्रदर्शन तसेच स्थानिक उत्पादनाचे स्टॉल लावण्यात आले होते.

 

 

Leave a Reply

Close Menu