आजार त्याला / तिला दमवतोच आहे

आपण काय मदत करू शकतो?

      आपण यापूर्वी मानसिक आजाराने त्रस्त व्यक्तीला कोणकोणती लक्षणं जाणवतात हे पाहिलंच आहे. आजारावरची औषधं घेत असताना सुरुवातीच्या काळात बऱ्याच रुग्णांना ग्लानी येणे, स्नायू आखडणे, बद्धकोष्ठता, डोकेदुखी, वजन वाढणे, मळमळ, तोंडाला कोरड पडणे इ. पैकी काही दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे औषधं घेण्याबद्दल एकंदरीत नाराजी असते किंवा चालढकल होताना दिसते. बऱ्याचदा हालचाल कमी झाल्यामुळे भूक मंदावते. उदासीनतेमुळे खाण्याची इच्छा नाहीशी होते. त्यामुळे ऊर्जा निर्माण होण्याचा वेग कमी होतो.

      त्यातच आजाराच्या मानसिक – भावनिक चढ-उतारांमुळे होणारी दमछाक खूप जास्त असते. त्यातच गोंधळ, विस्मृती, लक्ष केंद्रित करण्यात येणाऱ्या अडचणी यामुळे छोट्या छोट्या कामांसाठी सुद्धा नेहमीपेक्षा जास्त ऊर्जा खर्च होत असते. विचारांच्या प्रमाण आणि वेगामुळे ऊर्जा खर्च होण्याचं प्रमाण आणि वेग वाढतो. म्हणजेच कमी वेगाने आणि कमी प्रमाणात ऊर्जा निर्माण होणं आणि जास्त वेगात आणि जास्त प्रमाणात खर्च होणं असं व्यस्त गणित तयार होतं. मानसिक आजारांचा सामना करताना निर्माण होणाऱ्या नकारात्मक भावनांमुळे नकारात्मक ऊर्जा साठत जाते. ही नकारात्मक ऊर्जा शारीरिक आणि मानसिक थकवा आणते. अशावेळी आपण रुग्णाच्या सख्ख्या कुटुंबातील व्यक्ती असू तर रुग्णाला डॉक्टरकडे जाताना सोबत करणे, डॉक्टरांना सांगायच्या नोंदी ठेवणे, रुग्णाला नियमितपणाने औषधं देणे, रुग्णाची भूक आणि झोप शक्यतो वेळच्या वेळी होईल यासाठी आवश्‍यक त्या तडजोडी करणे अशी मदत महत्त्वाची ठरते.

      मानसिक आजारातून सावरणाऱ्या व्यक्तींना छोट्या छोट्या गोष्टींत मदतीची गरज भासू शकते. रुग्णाला त्याच्या रोजच्या अगदी बारिक-सारिक वैयक्तिक स्वच्छतेच्या गोष्टींची पूर्तता करण्याची आठवण करावी लागू शकते. घराबाहेरच्या छोट्या छोट्या कामांसाठी त्या त्या ठिकाणी जाण्यासाठी सोबत हवी असू शकते. वेगवेगळ्या कागदपत्रांची पूर्तता करताना नेमका अर्थ उलगडून सांगण्यासाठी आणि विशिष्ट माहिती लिहिण्यासाठी मदत लागू शकते. भावना – विचार व्यक्त करण्यासाठी समजून घेणारं, बोलायला उद्युक्त करणारं कोणीतरी हवं असतं. रुग्णाशी जाणीवपूर्वक सहज संवाद साधणे (आजार सोडून इतर विषयांवरील साध्या गप्पा मारणे) ही अगदीच किरकोळ वाटणारी मदत फारच उपयुक्त ठरते.

      रुग्णाची काळजी घेत असताना रुग्णाच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तींवर दुहेरी ताण येत असतो. एक म्हणजे आजारपणाच्या आधी रुग्ण करत असलेली कामं, पार पाडत असलेल्या जबाबदाऱ्या इतर व्यक्तींवर येतात. तसंच रुग्णाच्या लक्षणांच्या चढ-उतारांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम म्हणून रुग्णाचे कुटुंबियांना सुद्धा मानसिक-भावनिक चढ-उतारांचा सामना करावा लागतो. रुग्णाच्या तब्येतीला प्राधान्य दिल्यामुळे त्यांच्या तब्येतीच्या लहान-सहान तक्रारी उद्भवू शकतात. त्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ, पैसा आणि शक्ती कमी पडते. अशा परिस्थितीत समाजातील व्यक्ती म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाला काही ना काही मदत निश्‍चित करता येईल. आजारी व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींना कामासाठी बाहेर जाता यावं म्हणून आजारी व्यक्तीपाशी थोडा वेळ थांबता येईल. किंवा त्या कुटुंबाची बाहेरची काही कामं स्वतः करता येतील. त्या व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याच्या विचाराने त्यांना घरातून करता येणारे एखादे काम मिळवून देता येईल. रुग्णाची आस्थेने चौकशी करणं, कुटुंबियांच्या भावना – विचार – विशेषतः ताण व्यक्त करण्यासाठी, त्यांना दैनंदिन गप्पा मारण्यासाठी समजूतदारपणे आपला वेळ देणं, कौटुंबिक – सामाजिक सण – समारंभांमध्ये त्यांना उपस्थित राहता येईल अशा प्रकारच्या तडजोडी करणं अशी सामान्य मदत कुटुंबियांना धीर देणारी ठरते. आपल्या एका साध्याशा कृतीमुळे मानसिक आजाराने त्रस्त व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबियांना रोजच्या होणाऱ्या दमछाकीतून थोडीशी मोकळीक नक्की जाणवेल.

– मीनाक्षी (मानसोपचार तज्ज्ञ), संपर्क : सहज ट्रस्ट

फोन – 02363-299629/9420880529

Leave a Reply

Close Menu