बालपण जपताना

      14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात आला. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलांमधील निरागसता, निर्मळता जपण्याच्या शुभेच्छा एकमेकांना देणारे संदेश वाचायला मिळाले. बालपणी असणारी निरागसता, आपल्यातील औत्सुक्य, कुतूहल हे वयाने मोठं होत जाताना हळूहळू लुप्त होत जातं. तिथेच आपली कल्पनाशक्ती खुंटते. ‘तुमच्यातलं मुल जागं ठेवा’ अशी आठवण करून द्यायची वेळ येते. अनेक स्पर्धांमधून परीक्षकही आलेल्या स्पर्धकाला ‘तुमच्यातील मुल असंच जपून ठेवा हं’ असा नकळतपणे सल्लाही देताना दिसतात.

      आजकालच्या टीव्ही सिरीयलच्या माध्यमातून, रियालिटी शोमधून लहान मुलांचा सहज वावर दृष्टिक्षेपात येतो; तेव्हा आपण अचंबीत होतो. या मुलांची या माध्यमाशी जुळवून घेण्याची जी कला आहे ती खरंच वाखाणण्याजोगी आहे असं जाणवतं. आतापर्यंत टीव्ही सिरीयलच्या माध्यमातून आपल्यासमोर येणारी लहान मुलं ही मुंबई किंवा मोठ्या शहरांमध्ये वावरणारी अशी असायची. परंतु ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ या मालिकेतून नेरूर, वाडा, देवगड या आपल्या सिंधुदुर्ग परिसरातील अनेक लहान मुलांचा छोट्या पडद्यावर प्रवेश झालेला आहे. या मालिकेत साकारलेली बयोची मुख्य भूमिका रुची नेरुरकर हिने साकारलेली आहे. रुची ही कुडाळ तालुक्यातील नेरूर गावची आहे. तर देवगड येथील अनुष्का पोकळे- इरा, तळेबाजार देवगड येथील शौरिन देसाई- आरव, मुंबई येथील निकुंज शिवलकर- शैलु, पुरळ येथील चैतन्या- चिन्मया, विजयदुर्ग येथील गुड्डी- रिध्दी कदम, समिधा मराठे ही पुरळची आहे. ही सर्व मुलं फक्त मालिकांमधूनच काम करत नाहीयेत तर एकीकडे ती आपला अभ्यासही सांभाळत आहेत. एकाच वेळेला विविध पातळ्यांवर काम करताना त्या त्या भूमिकेला न्याय देण्याचे कामही ती करत आहेत आणि हे खूप प्रेरणादायी आहे. अर्थात यासाठी त्यांना पालकांचा पाठींबा तर आहेच शिवाय तितकेच सहकार्य शाळेकडूनही मिळत आहे.

      सोनी मराठीवर प्रदर्शित होणाऱ्या या मालिकेतील कथा ही सर्वसामान्य माणसाची कथा वाटते. कारण अलिकडे टीव्ही मालिकांमध्ये टिपिकल सासू, सून आणि विवाहबाह्य संबंध यांचा भडिमार टाळून वेगळ्या धाटणीची, वास्तववादी आणि कोकणातील प्रत्येकाला आपल्या मातीतली वाटावी अशी ह्या बयोची ही गोष्ट आहे. आपण प्रत्येकजण स्वप्नं उराशी बाळगून आपला जीवनप्रवास करत असतो. आपली स्वप्नं सत्यात उतरविण्यासाठी धडपडत असतो. स्वप्नं पूर्ण करण्यासाठी जरी आपली आर्थिक परिस्थिती नसली तरी प्रसंगी पोटाला चिमटा काढून त्या स्वप्नांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतच राहतो. त्यासाठी कितीही कष्ट घ्यावे लागले तरी त्याची पर्वा नसते आणि माणसाच्या ठिकाणी असलेली हिच जिद्द, चिकाटी ह्या गोष्टी त्याची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. पण बऱ्याच वेळा ही जिद्द अपुरी ठरली की, निराशा आपले मन झाकोळून टाकते. बालपणात अगदी छोट्या छोट्या गोष्टींत आपण निराश होतो. परंतु हे वय पुन्हा नव्या उमेदीनं उभंही राहायला नकळतपणे शिकवत असतं. अशावेळी हिम्मत न हरता सातत्याने प्रयत्न केले तर आपल्या ध्येयापर्यंत आपण नक्कीच पोहचू शकतो. अशाच खडतर वाटेवर असूनही स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करणारी, स्वप्न रंगविणारी ‘बयो‘ सोनी मराठीवरील ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्न‘ या मालिकेतून आपल्याला रोज पहावयास मिळत आहे.

      लहान मुलांच्या आयुष्यावरची ही सध्या चालेलेली गोष्ट पाहिली की आपलं बालपण डोळ्यांसमोर अलगद उभं राहतं. आपल्या बालपणी आम्हांला मोठेपणी कोण होणार विचारल्यावर आम्ही गोंधळलेले असायचो. मात्र आजकाल लहानपणापासूनच काय करायचं आहे हे नेमकेपणाने ठरवलेली मुलं पाहायला मिळतात. फक्त मनोरंजन क्षेत्रातच नाहीत तर विज्ञान, कला, तंत्रज्ञान, खेळ इत्यादी. यात विशेष म्हणजे पालकही त्यांना समजून घेऊन साथ देतात. त्यामुळे त्यांच्यातील बालपणही जपलं जातं आणि त्यांना करियरची दिशाही मिळालेली असते. अशी मुलं पाहिल्यावर खूप समाधान वाटतं आणि कौतुकही!

      ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर आपल्या आईच्या नावाने दरवर्षी एक पुरस्कार देतात. या पुरस्काराविषयी मुलाखतीतून सांगताना ते म्हणाले होते, की गरज ही शोधाची जननी असते. आपल्याकडे त्या शोधालाच फारसं महत्त्व दिलं जात नाही. परंतु अलिकडे अगदी आपल्या सिंधुदुर्ग आणि आसपासच्या जिल्ह्यातून देखील आपल्या वाचनात आलं असेल की, आपल्या दिव्यांग मुलीसाठी तिच्या वडिलांनी तिला खाऊ भरविता यावा म्हणून एका यंत्राची निर्मिती केली. ॲनिमिया मुळे मृतांचा आकडा वाढतो आहे, यावर एका तरुणाने ॲनिमिक कंडिशन ओळखता येणारं उपकरण बनविलं आहे. या टॅलेंटला जगमान्यता मिळून सर्वत्र पोहोचण्यासाठी कदाचित वेळ लागेल, लागतो. पण आपण सतत कार्यरत राहणं किती गरजेचं आहे हे यातून कळतं. आपलं ध्येय निश्‍चित असेल आणि ठरवलेल्या लक्ष्याप्रति आपण एकनिष्ठ असू तर आपण कशाप्रकारे आपले उद्दिष्ट पूर्ण करू शकतो. हे या अलीकडच्या दृकश्राव्य माध्यमातून आपल्या समोर येते आहे. जगभरातील अनेक वेगळ्या गोष्टी आपल्यासमोर निदर्शनास येत आहेत.

      कदाचित काहीजण टीव्ही माध्यमातील सिरियल्स, रिॲलिटी शोज याकडे केवळ मनोरंजन या दृष्टीनेही पाहत असतील, परंतु बारकाईने विचार केला तर- विशेषत लहान मुलांचं सहज वावरणं आणि अनेक बाबी एकाच वेळी हाताळणं हेही कौतुकास्पद आहे. आज या मुलांची अनेक स्वप्नं आहेत. ती पूर्ण करण्याची सचोटीही त्यांच्याकडे आहे.

      एकंदरीतच बालपण हरवू न देता प्रत्येकाने आपल्यातलं मुल जागं ठेवून मुलांना समजून घेऊन वागलं पाहिजे. मुलांची स्वप्नं समजून घेऊन करीयरची दिशा त्यांना दिली पाहिजे. त्यांच्यावर करियर लादता नये. आपली स्वप्नं पूर्ण झाली नाहीत म्हणून ती मुलांनी पूर्ण करावीत हा अट्टाहास नसावा.

      कोकणातही आता मुलांचा-पालकांचा दृष्टिकोन बदलला आहे. मागे राहणारं कोकण आता अनेक गोष्टीत पुढे दिसत आहे. कोकणाला निसर्गाचे वरदान आहे. ते जसं जपणं गरजेचं आहे तसंच मुलांची स्वप्नं पूर्ण होताना त्यांच बालपणही जपलं जाणं महत्त्वाचं आहे.         – सीमा मराठे, 9689902367

Leave a Reply

Close Menu