नूतन मुख्याधिका-­यांकडून शहरवासीयांच्या अपेक्षा

      सुमारे १२५ वर्षांपेक्षा जुनी असलेली वेंगुर्ला नगरपरिषद सन २०१६ १७ पासून स्वच्छता अभियानातील सातत्यपूर्ण दमदार कामगिरीमुळे राज्यात आणि देशात लक्षवेधी ठरली आहे. अर्थात शहरवासीयांचा सक्रिय सहभाग, तत्कालीन नगराध्यक्ष, नगरसेवक, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी व मुख्याधिकारी यांच्या टीमवर्कमुळे हे यश मिळाले आहे. स्वच्छतेतील दमदार कामगिरीमुळे वेंगुर्ला नगरपरिषदेला बक्षिस रक्कम तर मिळालीच तसेच विकास कामांकरिता भरघोस निधी सुद्धा मिळाला. माजी मुख्याधिकारी  रामदास कोकरे, माजी नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल, माजी मुख्याधिकारी वैभव साबळे, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप व त्यांचे सहकारी नगरसेवक यांच्या टीमने यामध्ये सातत्य राखले होते. वेंगुर्ला शहराच्या डम्पिंग ग्राऊंडला स्वच्छ भारत पर्यटन स्थळबनवण्यात या टीमला यश आले होते.

      शुक्रवार दि. ११ नोव्हेंबर रोजी नूतन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी पदभार स्वीकारला आहे. शहरवासीयांच्या त्यांच्याकडून ब­याच अपेक्षा आहेत. मुख्याधिकारी यांनी एखादी गोष्ट मनावर घेतली तर कसा बदल घडू शकतो हे रामदास कोकरे, वैभव साबळे या माजी मुख्याधिकारी यांच्या उदाहरणातून दिसून आले आहे. आज कागदावर जरी वेंगुर्ला नगरपरिषदेचा स्वच्छता अभियानात नंबर आला असला तरी प्रत्यक्षातील ग्राऊंडवरच्या स्थितीचा आढावा नवीन मुख्याधिकारी यांनी घेणे अत्यंत गरजेचे आहे. वेंगुर्ला डम्पिंग ग्राऊंड म्हणजेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची सध्याची स्थिती पाहता या जागेला महनीय व्यक्ती, राज्यभरातील नगरपरिषदांचे अभ्यास गट यांनी भेट दिली होती हे कोणाला सांगून खरे वाटणार नाही. अशी अत्यंत खराब स्थिती असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. मुख्याधिकारी कंकाळ यांनी डम्पिंग ग्राऊंडला तात्काळ भेट देऊन तेथील स्थिती पूर्ववत चांगली कशी होईल यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. 

           वेंगुर्ल्याचे क्रॉफर्ड मार्केट ही केवळ बाजाराची जागा नसून एक ऐतिहासिक वारसा असलेली जागा आहे. मागील कौन्सिलच्या कारकिर्दीत या वास्तूचे नूतनीकरण करण्यात आले. सुसज्ज असे सागररत्न मच्छी मार्केट साकारले. परंतु, या सुसज्ज बाजारपेठेला वाहतूक कोंडीचे लागलेले ग्रहण बाजारपेठेला उतरती कळा आणेल का असा प्रश्न येथील स्थानिक व्यापा्ययांना पडला आहे. मच्छी मार्केटच्या खालील भागात बेसमेंटमध्ये ४० ते ४५ चार चाकी व सुमारे २०० दुचाकी वाहने राहू शकतील अशी पार्किंगची व्यवस्था केली आहे. परंतु सुयोग्य नियोजना अभावी पार्किंग आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे. मालाची वाहतूक करणा्यया अवजड वाहनांची सोय म्हणून भाजी मार्केटच्या समोरील जागा राखीव ठेवण्यात आली आहे. त्यादृष्टीने देखील अद्याप प्रशासकीय सूचना अगर व्यापारी आणि प्रशासनाची समन्वयाची बैठक देखील झालेली नाही. बाजारातून कचरा गाडी नेताना त्यातील कचरा अनेकदा रस्त्यावर पडत जातो. मच्छी मार्केटमधील वेस्टेज नेताना तर शहरवासीयांना दुर्गंधीला सामोरे जावे लागते. यावर काळजीपूर्वक नियोजन करणे गरजेचे आहे. फायर हायड्रंटची सोय करूनही आजची अवस्था काही अघटित प्रकार घडला तर, ‘आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरीअशी असू शकते. कारण एकदाही त्याची तपासणी करण्यात आलेली नाही. त्याचा वापर कसा करायचा याबाबत अजूनही कोणाला प्रशिक्षण दिले गेलेले नाही.

     सोलर सिस्टीमच्या बाबतीतही तिच त­हा. नगरपरिषदेवर अतिरिक्त खर्चाचा भार येऊ नये याकरिता मागील नगरपरिषदेच्या टीमने सोलर सिस्टीम तरतूद उपलब्ध करून घेतली. परंतु ती कार्यान्वित करण्यासाठीचा पाठपुरावा प्रशासकीय स्तरावर अजून होऊ शकलेला नाही.

      शहराच्या सौंदर्यात भर टाकणा-या अनेक वास्तू गेल्या पाच वर्षात साकारल्या. त्यांचे जतनीकरण ही खूप मोठी जबाबदारी प्रशासनावर आहे. अगदी गार्डनमधील बागेतील लॉनवर पाणी मारण्यापासून ते नको असलेले वाढलेले रान काढण्यापर्यंत बारीक सारीक अनेक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. याबरोबरीने शहराच्या मध्यभागी बाजारपेठेत साकारलेले कलादालनहे येणा­-या पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षण ठरणारे आहे. ते प्रकाशझोतात येण्याच्या आणि पर्यटकांची पावले वेंगुर्ल्यात राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत.

          नगरपरिषदेवर मागील काही महिने प्रशासक असल्याने निश्चितच प्रशासनावर येणारा ताण, अडचणी, त्यांच्यासमोरील मर्यादा याची शहरवासीयांना जाणीव आहे. मागील पाच-सहा वर्षात वेंगुर्ला शहराने स्वच्छता अभियानातील बरीच मानांकने मिळवली. त्यातून सौंदर्यात भर घालणारी उद्याने, शहराचा लौकिक वाढविणा-­या वास्तूंची निर्मिती झाली.

     कौन्सिल बरखास्त झाल्यानंतरचा अलिकडच्या म्हणजे माजी मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांच्या कार्य काळात शहरवासीयांना विशेषतः मागील दहा महिन्यात प्रशासनात ढिलाई आल्यासारखी स्थिती जाणवत आहे. नियमित चालणा­या स्वच्छता अभियानातील त्रुटी, वास्तूंच्या देखभालीकडे दुर्लक्ष, नव्हेंबर उजाडून सुद्धा शहरातील चार ठिकाणी असलेल्या एलईडी स्क्रीनवर अद्याप १५ ऑगस्टच्या स्वराज्य महोत्सवाचे बॅनर झळकत आहेत. अशा अनेक मूलभूत गोष्टी ज्या मुख्याधिकारी यांच्या प्रशासकीय पाठपुराव्यातून सहज होण्यासारख्या आहेत त्यावर वेळेवर लक्ष दिले गेले तर शहराची होणारी नामुष्की टाळता येईल. नगरपरिषदेचे प्रशासकीय प्रमुख म्हणून पदभार स्वीकारलेल्या मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या कडून नागरिकांच्या असलेल्या या अपेक्षा पूर्ण होवोत या सदिच्छा!

Leave a Reply

Close Menu