वाचाळवीरांना आवरणार कोण?

             गेल्या काही दिवसात महत्त्वाची घटनात्मक पदे भूषविणा-­या व्यक्तींनी केलेली वक्तव्ये ही अत्यंत जाणीवपूर्वक केल्याचे दिसून येते. जेणेकरून त्यावर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटून वातावरण गढूळ राहील. लोक त्याच चर्चांमध्ये रममाण राहतील. मूलभूत प्रश्नांपासून जनता लांब राहील. मिडियावरील बातम्यांवर देखील याच्याच चर्चा येतील याची खबरदारी घेतली जात आहे का? याची आता शंका नसून खात्रीच होत आहे.

      महिलांनी तर काय पेहराव करावा? त्यांनी टिकलीच लावावी असे सांगणारे संभाजी भिडे गुरुजी, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचे कर्तृत्व, अभ्यासपूर्ण भाषणे याकडे दुर्लक्ष करून त्या घटस्फोटीत आहेत की विभक्त? यावर होणा-या सर्वपक्षीय नेते-कार्यकर्त्यांच्या सोशल मिडियावरील पोस्ट, खासदार सुप्रिया सुळेंना भिकारन्न् म्हणणारे मंत्री अब्दुल सत्तार अशी ही यादी न संपणारी आहे.     

      राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तर मागील काही महिने वादग्रस्त आणि संतापजनक विधाने करण्याचा सपाटाच लावला आहे. स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचणा­या सावित्रीबाई फुलेंविषयी बेताल वक्तव्य करून श्वास घेत नाहीत, तोच मुंबई ही गुजराती माणसांमुळेच आर्थिक राजधानी आहे असे बरळून झाले. त्यावर राज्यभरातून निषेध आणि संतापाचे सूर उमटल्यावर केंद्रातून त्यांना गप्प बसण्याच्या सूचना आल्या. त्यानुसार काही काळ त्यांनी मौनव्रत धारण केले. परंतु मागच्या आठवड्यात त्यांनी पुन्हा कहर केला, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून पुन्हा त्यांनी स्वतःकडे लक्ष वेधून घेतले. जोडीला भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली होती असे विधान करून राजकीय वातावरण तापवले आहे. दोघांच्या विधानाचा पुरेपूर समाचार विरोधी पक्षाने घेतला आहे. सोशल मीडियावर ही लोक व्यक्त होत आहेत.

         वादग्रस्त विधाने करून सापळ्यात अडकायचे की नाही, हे ज्याचे त्याने ठरवले पाहिजे. काय बोलावे, यापेक्षा काय बोलू नये, याचे भान हल्ली ठेवले जात नाही. अशा वातावरणात वाल्याचे वाल्मिकी झालेले लोक, तडजोडवाले हृदयसम्राट, कुणाला काही नकळत लोणी मटकवणारे बोके यांचा मिळून नवदेशभक्तांचा संप्रदाय यांची सद्दी झाल्याचे सध्याचे चित्र आहे. नसते विषय उकरून काढणे, म्हणजे मूळ प्रश्नांपासून लक्ष बाजूला वळवण्याची धर्मांधतावाद्यांना संधी देणेच होय. राज्यपाल कोश्यारी यांनी अशी वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. राज्यपाल हे राज्याच्या सर्वोच्च पदावर असणारी व्यक्ती आहे. त्यांनी राज्याची संस्कृती, लोकभावना याबाबत आदर बाळगणे अपेक्षित असते. परंतु कोश्यारी हे वारंवार महाराष्ट्राच्या आदरणीय व्यक्तींबद्दल सातत्याने अवमानास्पद वक्तव्य करीत असतात. वाईट याच गोष्टीचे आहे की, सत्ताधारी पक्षाचे लोक याचे निलाजरे समर्थन करीत आहेत.

    मानसशास्त्रात लक्ष वेधून घेणे (अटेंन्शन सिकिग बिहेवियर) अशी एक संकल्पना आहे. लहान मुले ज्याप्रमाणे इतरांचे आपल्याकडे लक्ष जावे म्हणून काही बोलत असतात, उड्या मारतात. जेणेकरून मोठ्या माणसांचे, जवळपासच्या लोकांचे आपल्याकडे लक्ष वेधले जावे, त्याला मान्यता मिळावी. परंतु घटनात्मक पद धारण करणारे राज्यपाल, राजकारणातील महत्त्वाची पदे भूषवणारे मंत्री यांच्या वादग्रस्त विधानांकडे केवळ लक्ष वेधून घेण्याचा आजार म्हणून दुर्लक्ष करून चालणार नाही. तर त्यांना ज्या कामासाठी जनतेने निवडून दिले आहे ती जनहिताची कामे करण्याची आठवण करून देणे आवश्यक आहे. इतिहासातील मढी उकरून काढून वर्तमानातील प्रश्न सुटणार नाहीत याची जाणीवही या जबाबदार नेते मंडळींनी ठेवायला हवी. ती तशी होत नसेल तर जनतेनेच या वाचाळवीरांना घरी मतपेटीतून घरी बसवावे. तेव्हाच या लक्षवेधी वाचाळवीरांच्या जिभेला लगाम बसेल.

 

 

Leave a Reply

Close Menu