वाचनाने जीवन समृद्ध – अरविंद पाटकर

पुस्तके खरेदी करुन, एकमेकांना भेट देऊन, साहित्यिकांच्या गप्पाटप्पांमधून त्या पुस्तकातील मर्म समजून घेणं यातून आपले जीवन समृद्ध होत असते. असे मत मनोविकासचे प्रकाशक अरविंद पाटकर यांनी व्यक्त केले. परुळेकर दत्तमंदिर वेेंगुर्ला येथे मुक्तांगण परिवार आयोजित मान्यवर साहित्यिकांबरोबर गप्पाटप्पा या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, ललित साहित्य एकूण कोकणात मिळणारी ठिकाणे दहाच असून पैकी सहा ही एकट्या मुंबई परिसरात आहेत. सिंधुदुर्गात ललित साहित्य मिळणारे एकही दुकान नाही याबाबत खंत व्यक्त केली. वाचन संस्कृती वृद्धींगत होणे  ही जबाबदारी आपणा सर्वांची आहे. शासन दरबारीही ललित साहित्य सर्वत्र मिळण्यासाठीची सुविधा निर्माण झाली पाहिजे असे मत व्यक्त केले.

      सामाजिक कार्यकर्ता लेखक म्हणून समोर येतो तेव्हा त्याच्याकडून मन रिझवणारे साहित्य, कथा, कादंबरीची अपेक्षा फोल ठरते. समाजातील जळजळीत सत्य त्याच्या लेखनातून येत असते. आणि ते सर्व त्याच्या अनुभवातून उतरत असते. अशाच महावीर जोंधळे, इंदूमती जोंधळे, दीपा देशमुख आणि अरुणा सबाने या  चार साहित्यिकांना पुण्याच्या मनोविकास प्रकाशनच्या श्री. अरविंद पाटकर यांनी वेंगुर्ल्यात आणले. आणि यांच्या भेटीचा योग श्री. देवदत्त परुळेकर आणि मंगल परुळेकर यांनी वेंगुर्लेवासीयांसाठी घडवून आणला. या साहित्यिकांनी केलेल्या भटकंतीचे किस्से पुस्तकरुपाने आज उपलब्ध आहेत. तरीही प्रत्यक्ष ती अनुभूती या साहित्यिकांकडून ऐकताना उपस्थितांनी त्यांच्यासोबत सफर केली. ते आठ दिवस, कॅनव्हास, ग्रंथ या आपल्या साहित्यावर अरुणा सबाने आणि दीपा देशमुख यांनी ते लेखन करताना केलेल्या भ्रमंतीचे चित्रण डोळ्यासमोर उभे केले. त्यामुळे न वाचलेले हे साहित्य वाचायची ओढ उपस्थितांमध्ये निर्माण झाली. महावीर जोंधळे यांनी कोकणातील साहित्यिक आपल्या आजूबाजूचे प्रश्‍न मांडण्यासाठी तसे धजावत नाहीत अशी खंत व्यक्त केली. आपल्या किरणपाणी या पुस्तकामध्ये अनेक कोकणवासीय साहित्यिकांना जोंधळे यांनी स्थान दिले आहे. इंदूमती जोंधळे यांनी पाच हजार विद्यार्थ्यांच्या मुख्याध्यापकपदी काम करताना आलेले अनुभव सांगत त्यातून आपण लेखक म्हणून समृद्ध होत गेल्याच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी चित्रकार सुनिल नांदोसकर, रमण किनळेकर, अनिल सौदागर, चित्रकार अरुण दाभोलकर, राजन पवार, पोकळे बाई, डॉ. संजीव लिंगवत, मुक्तांगणचे पालक व महिला मंचच्या सदस्या उपस्थित होत्या. देवदत्त परुळेकर यांनी प्रास्ताविक, मंगल परुळेकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Close Menu