वेंगुर्ल्यात वीज ग्राहक मेळाव्यात वीज अधिकारी धारेवर

            महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण शाखा वेंगुर्ला, जिल्हा व्यापारी महासंघ, वेंगुर्ला तालुका व्यापारी व व्यावसायिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी, औद्योगिक, व्यावसायिक व घरगुती ग्राहक मेळावा साई मंगल कार्यालय वेंगुर्ला येथे जिल्हा व्यापारी संघाचे उपाध्यक्ष संजय भोगटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी संतप्त वीज ग्राहकांनी समस्यांचा पाढा वाचत वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

      वीज ग्राहक मेळाव्यास जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये, वेंगुर्ला तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष विभाकर खानोलकर, सचिव राजन गावडे, ग्राहक मंच वेंगुर्लाचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, महावितरणचे कार्यकारी अभियंता विनोद विपर, कार्यकारी अभियंता लोकरे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिशाळ, उप विभागीय अभियंता खटावकर, सामाजिक कार्यकर्ते नंदन वेंगुर्लेकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये यांनी अशा प्रकारच्या वीज ग्राहक मेळाव्यातून वीज वितरण कंपनीला चांगल्या मार्गावर आणू असे सांगितले. जिल्हा उपाध्यक्ष संजय भोगटे यांनी जिल्ह्यात व्यापारी महासंघातर्फे प्रथमच असे वीज ग्राहक मेळावे आयोजित करण्यात आले असल्याचे सांगितले. हे मेळावे फक्त व्यापाऱ्यांसाठी नसून सर्वांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. येथे मांडण्यात आलेल्या प्रश्‍नांची सोडवणूक येत्या 15 दिवसात करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

      डॉ. संजीव लिंगवत म्हणाले की, ग्राहक हा सर्वात महत्त्वाचा असतो. मात्र तो संवेदनशिल व जागृत असणे आवश्‍यक आहे. वीज वितरणासंदर्भातील विविध प्रश्‍नांसंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करण्यासाठी संवेदनशिल ग्राहकांची एक समिती नेमण्यात यावी, असे यावेळी लिंगवत यांनी सांगितले.

      आज ग्रामीण भागात वीज वितरणच्या अनेक वाहिन्या लोकांच्या बागायतीमधून नेलेल्या आहेत. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन अनेकवेळा लोकांच्या बागायतीचे नुकसान होते. पालघर भागात गेली चार-पाच वर्षे शॉर्टसर्किटमुळे बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे वीजवाहिन्या स्ट्रीटलाईटला जोडाव्यात. थकीत वीज बिल वसुलीसाठी जशी कार्यतत्परता दाखविली जाते तशीच ती वीज गेल्यावरही दाखविण्यात यावी, पण ती दाखविली जात नाही. येथील वीज वितरणच्या कार्यालयात 262017 तक्रार निवारणासाठी असलेल्या नंबरवर जी व्यक्ती आहे ती नेहमीच उडवाउडवीची उत्तरे देते. या व तांत्रिक लाईनसंदर्भात, वाढीव वीज बिलासंदर्भात, विजेच्या कमी जास्त व्होल्टेज संदर्भात, वायरमन मिळत नसल्याबाबत, बंद मिटर, सर्व्हिस वायर, वीज वाहिनी संदर्भात अशोक गवंडे, जयप्रकाश चमणकर, विवेक साळगावकर, सतीश केळकर, डॉ. सचिन भांडे, शशिकांत गावडे, अभिनव मांजरेकर, सदाशिव आळवे, अभि वेंगुर्लेकर, दीपक कोचरेकर, शिवराम आरोलकर, कैवल्य पवार, स्वानंद पोतनीस, दत्ताराम तावडे, पंकज शिरसाट, भूषण नाबर, राजेंद्र खानोलकर, महेंद्र ठाकुर, नागेश गावकर, विधाता सावंत आदी 55 ग्राहकांनी आपल्या समस्या मांडल्या.

      मेळाव्यात आलेल्या प्रत्येक तक्रारीचे येत्या 15 दिवसात निराकरण केले जाईल अशी ग्वाही यावेळी कार्यकारी अभियंता विपर यांनी दिली. मेळाव्याचे उद्घाटन विभा खानोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत राजन गावडे यांनी, प्रास्ताविक नंदन वेंगुर्लेकर यांनी केले. तर आभार खटावकर यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu