श्रद्धा, अंधश्रद्धेची धूसर रेष

 नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर देशाच्या ७४व्या प्रजासत्ताकदिनी महाराष्ट्राच्या चित्ररथाने अवघ्या विश्वाचे लक्ष वेधले आहे. ज्या देशात शुद्ध अध्यात्म पेरले गेले आहे, त्या देशात कितीही, देवाचे अस्तित्व नाकारणारे जन्माला आले तरी प्रत्येक घटनेतून अध्यात्म आणि श्रद्धेच्या कळसात सुरक्षित असलेले देव युगानुयुगे अस्तित्व दाखवून देतात. अस्तित्व आणि अंधश्रद्धा यांचा दुरान्वेही संबध नाही. पुढे देवाचे अस्तित्व, अंद्धश्रध्दा आणि चमत्कार यांचेही तसे काही नाते नाही. नाते सांगणे आणि असणे यात जो फरक असतो तोच प्रकार इथे गाजतो आहे. मुळात ख­या अध्यात्म्याला चमत्काराची नव्हे तर सकारात्मकता, विश्वास, प्रेमाची नितांत गरज असते.

       गेल्या काही दिवसात बागेश्वर धाम आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये जो काही वाद विकोपाला गेला आहे किवा उकरून काढला, तो निरर्थक आहे. श्रद्धा हा व्यक्तिगत विषय आहे. त्याला सामाजिक स्तरावर मिरवले जात असल्याने वादाच्या ठिणग्या पडताहेत आणि भविष्यातही तेच घडत राहणार आहे.

    बागेश्वर पीठाधीश उर्फ धीरेंद्र महाराज हे शंभर नव्हे एक हजार टक्के पाखंडी आहेत. ते अनेक बाबतीत वादग्रस्त आहेत. ते म्हणतात की, शिर्डीचे साईबाबा हे देव नाहीत, साधू नाहीत आणि संतही नाहीत. त्यांनी असाही दावा केला आहे की, जगातील सर्वात महागडे महाराज तेच आहेत. आता ही त्यांची दोन्ही परस्पर विधाने किती चुकीची आहेत ते पाहा. धीरेंद्र महाराज ज्या हनुमंतांचे नाव घेतात, पूजा करतात, आराधना करतात ते कोण आहेत, हे त्यांना ठाऊक नाही. देशाला अशा पाखंडी महाराजांनी ग्रहण लावल्याने शुद्ध अध्यात्मावर संशयाची सुई फिरू लागली आहे. जेव्हा सीतेचे अपहरण झाले तेव्हा साक्षात भगवंत प्रभू श्री रामचंद्रजी रस्त्यात जटायुला विचारतात, ‘तुम्ही सीतेला पाहिलत का?‘ यातून साधा बोध होतो, देवाने कधीही चमत्कारावर विश्वास ठेवला नाही तर त्यांनीही प्रयत्नवाद जोपासला. त्यांना ठाऊक होते, सीतेचे अपहरण रावणाने केले आहे, ते विधीलिखित होते. पण भगवंतालाही बंधनकारक होते. त्यांनीही चमत्कार केले नाहीत. शंकराचार्यांनी या बागेश्वर बाबांना ठणकावून विचारले की, ‘आपण चमत्कार करत असाल तर जोशी मठातील भूस्खलन थांबवून दाखवा.दुर्दैव हे की हिंदू धर्मातील चमत्कारांना नमस्कार करणारे अंधभक्त सोशल मीडियावर बागेश्वर बाबाची बाजू उचलून धरताना दिसतात. बागेश्वर बाबांना खडसावणा­या शंकराचार्यांनी आता गप्प बसावे असा सल्ला देतात. अंधश्रद्धा निर्मूलन समिती केवळ हिदू धर्मातील संतांना छळत आहे. त्यांनी मुस्लिम अगर ख्रिश्चन धर्मातील पाखंडी लोकांविरुद्ध काय केले ते दाखवावे असे उरफाटे सवाल विचारण्यातच हे अंधभक्त धन्यता मानत आहेत.

    आसाराम, रामरहिम असे असंख्य बाबांनी चुकीच्या पद्धतीने अध्यात्माचा वापर केला. पकडले ते चोर. न पकडले गेलेले शेकडो भुजंग अद्याप अध्यात्म, समाजकारण, राजकारणात वावरत आहेत. नियती कुणालाही सोडत नाही. साक्षात भगवंत श्रीकृष्ण ज्यांनी शिशुपालाला जीवदान दिले. त्या शिशुपालाच्या आईला दिलेल्या वचनाप्रमाणे शंभर अपराध मोजत होते. ज्या क्षणी ते पुर्ण झाले त्या क्षणाला सुदर्शनचक्राने त्याचा शिरच्छेद केला.

    भगवंत श्री कृष्णाने अंतिम क्षणी जेव्हा सुदर्शन सोडले, त्याचे काही अवशेष ज्या ज्या ठिकाणी पडले ती शक्तिस्थाने म्हणून निर्माण झाली. त्यातूनच महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठे तयार झाली असा महिमा आहे. त्या शक्तीस्थानांचा महिमा आणि जागरण करत दिल्लीच्या कर्तव्यपथावर रथचक्र काढण्यात आला होता. हा खरंच देशात सध्या उठलेल्या वावटळीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

    शत्रुवर निर्विवाद यश मिळवण्यासाठी महाकाली, बगलामुखी, मातंगी, ऊग्रतारा, छिन्नमस्ताना, भुवनेश्वरी, षोडशीमहेश्वरी, त्रिपुरभैरवी, धुम्रावती आणि कमलालया आदी देवींना प्रसन्न केले जाते. यामध्ये राजकिय नेते त्यांच्या अस्तित्वासाठी बगलामुखी आणि महाकालीचा वापर करतात. जसे आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, गुवाहाटीची ताकद आम्ही दाखवून दिली आहे. तोच हा प्रकार आहे. हे सगळे प्रकार पूर्वी असुर, राक्षस अवलंबित होते. आता मानवात दडलेले राक्षस त्याचा वापर करून समाजाला दिशाहीन ठरवू पाहत आहेत, काही राजकिय नेते मंदिर उभारतात, तिकडे चेरेही ठेवतात, असुरी शक्तिसाठी, विरोधकांना काबूत ठेवण्यासाठी. ते मग म्हसोबा, विरोबा, चेतोबा अशा नावानेही असतात. असे हे अध्यात्म्यात घुसलेले राजकारण आहे. त्याचाच फायदा काही भोंदूबाबा, महाराज आणि पाखंडी घेत आहेत इतकंच. बाकी सगळे योगायोग आहेत. इथेच करायचे आहे आणि इथेच भरायचे आहे. कर्मश्रेष्ठता हा जीवनाचा पाया आणि कळस आहे. सामान्यजनांनी या भोंदू बाबांच्या नादी न लागता भगवद्गीतेत सांगितलेला कर्मफलाचा सिद्धांत दैनंदिन जीवनात आचरल्यास आपले जीवन नक्कीच समाधानकारक ठरेल.

 

Leave a Reply

Close Menu