प्रफुल्ल रेवंडकरची संगीत अलंकारापर्यंत मजल

  कुडाळ तालुक्यातील मुणगी हे गाव तसे कुणाच्या खिजगणतीत नसलेले गाव. पण त्या गावच्या एका व्यक्तीने अशा प्रकारची यशाची उंच भरारी घेतली आणि क्षणात या छोट्याशा खेडेवजा गावाचे नाव संपूर्ण देशात झळकले. या गावातील प्रफुल्ल विलास रेवंडकर या मुलाने संगीत क्षेत्रातील मानाची समजली जाणारी अलंकारगायनातील अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची पदवी मिळवून आपल्या आजपर्यंतच्या यशात मानाचा तुरा खोवला.

      प्रफुल्ल रेवंडकर हा मुणगी गावात आज दोन ते तीन पिढ्या असलेल्या रेवंडकर कुटुंबियांपैकी कै.दशरथ विनायक रेवंडकर यांचा नातू. त्यांना बाळा, विलास, कमल आणि आनंद असे चार पुत्र. कुटुंब शेती, बागायतीवर आपला उदरनिर्वाह करणारे, टोकाचे कष्टाळू. कमल रेवंडकर हे फक्त कै.नंदन सामंत (कुडाळ) यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांचे आर्थिक व्यवहार पहाण्याचे काम करतात. बाकी बाहेरील मिळकत अशी काहीच नाही. शेती-बागायतीतून मिळणा­या तुटपुंज्या उत्पन्नावर एकत्र परिवाराचा खर्च चालवून संगीत सारख्या व्यासगावर खर्च करणे रेवंडकर कुटुंबियांना तसे दुरापास्त. पण प्रफुल्लच्या जिद्दी आणि कोणतेही काम जिद्दीने करण्याच्या उपजत स्वभावामुळे संगीत क्षेत्रातील हे शिवधनुष्य त्याने हसतमुखाने स्विकारले आणि लीलया पेलले.

      शालेय शिक्षण मर्यादेपर्यंत पूर्ण केल्यावर गोव्याच्या कै.दिनकर पणशीकर यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने संगीत विशारदपर्यंत शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षण चालू असताना त्याचे गुरू पणशीकर स्वर्गवासी झाले. नंतर नित्यसाधना करीत रहाणे आणि कुडाळ शहरातील संगीत तज्ज्ञ राजन माडये आणि शाम तेंडोलकर यांच्या सततच्या मार्गदर्शनात राहणे असे करीत करीत त्याने संगीत अलंकार परीक्षेची तयारी सुरू ठेवली. या प्रवासात त्याला केळुसचचे संगीत विशारद अरुण केळुसकर यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि साथ लाभली. या सगळ्या प्रवासात प्रफुल्ल आपल्या यशाचे श्रेय वरील त्रैमूर्तींना देतो. संगीत क्षेत्राची मानाची पदवी मिळवून प्रफुल्लमधील एका टोकाची नम्रता आणि आजपर्यंत त्याचे जमिनीवर असलेले पाय त्याच्या यशाला शोभा देतात.                                                                                                                                                                      – आत्माराम दिगंबर बागलकर,आडेली.

Leave a Reply

Close Menu