घुसमट

दडपले विषय कितीसे दोघांमधले

पेटवून काडी जराशी भांडून जा ना

  वाढलेली भूक आणिक वादही वाढले

तुकडा पोटाकरता अताशा रांधून जा ना

प्रश्‍न अनुत्तरित का कशाला कितीसे

तळपती तलवार डोक्यावर टांगून जा ना

 वाट पाहीन दाराशी येशीलही नेमाने

  हुरहूर मनाची कानात सांगून जा ना

गुंता साऱ्या आठवणींचा छळतो जोमाने

घट्ट रंगीत वीण प्रीतीची बांधून जा ना

 चौकटीच्या उंबऱ्यात नैतिकता अडखळते

     तत्वे साऱ्या जगाची लांघून जा ना

      एकंदरीत महिला दिन आणि बाई विषय घेऊन असलेल्या या समस्या आहेत. अजूनही कित्येक ठिकाणी जन्माला आलेलं बाळ मुलगी असेल तर नकळत तेथील माणूस नावाच्या प्राण्याच्या कपाळावर एक तरी आठी दिसतेच दिसते. याउलट मुलगा झाल्यावर, आपोआप ओठाची लांबी वाढून, हास्य लकेर उमटते. ही निरीक्षणे खूप बारकाईने निरीक्षण नोंदवल्यास नक्की उमजत जाते. असे का?

      स्त्री पुरुष समानता, समान हक्क, प्रॉपर्टीमध्ये समान हक्क असे कितीही नवीन कायदे आले असले तरी जुनाट मेंदूने टिपलेले अनुकरण नकळत नवीन पिढीत उतरत असते. हे चित्र सार्वत्रिक नसले तरी काही ठिकाणी ही परिस्थिती आहे हे नाकारता येत नाही.

      आधुनिक स्त्री बऱ्याच अर्थानं सक्षम झाली आहे. बरेचदा समानता न वाटता समोरच्या पुरुष वर्गावर अरेरावी वाटावी असं चित्र पण काही ठिकाणी पहायला मिळत असतं. याशिवाय तिसरे ऑदर असणारे त्यांच्या समस्या किंवा घुसमट हा विषयही महत्त्वाचा आहे.

      करियर महत्त्वाचे, स्वतः च्या पायावर आधी उभं राहू. कशाला हवा नवरा? मग काही काळासाठी मानसिक किंवा शारीरिक गरजा भागवत असलेला मित्र बरा. असे सटीक विचार ती करते.

      कुटुंब आलं की जबाबदारी आली. सासू सासरे यांची देखभाल त्यांचे काही नियम पाळणे आले. यापेक्षा तू नि मी असे मर्यादित राहू… पटले तर लग्न करू.. दोन वर्षे एकत्र राहून बघू. त्या काळात शक्यतो सर्व गुडी गुडी सुरू असते. म्हणजे माझा शोना, बाबू तर बेबी, जानू असे शब्द पेरणी वारंवार होत असते. सर्व काही आलबेल असल्याची जाणीव तिला होते पण हा निव्वळ देखावा असू शकतो.

      ज्याच्याकडे पैसा अधिक त्याला पार्टनर अधिक. परकीय चित्र पाहून काही असे अंधानुकरण करत जातात. आनंदाने जगण्याची सगळी चिन्हच धूसर होतात.

      जोवर पैसा, अंगात रग आहे तोवर आसपास माणसं राहतील नाहीतर, एकटं राहून ताण, तणाव वाढून पदरी निराशा हे सूत्र ठरलेलं आहेच. तरीही आपल्याकडे म्हण आहे, ‘दुरून डोंगर साजरे…’ दुसऱ्याचे काहीही छान वाटते. मग तो मोबाईल, कार, किंवा पत्नी असेल.

      एक स्त्री जेव्हा मॅनेजमेंटमध्ये असते किंवा उत्तम सर्जन असते तेव्हा तेथील बारीकसारीक तपशील ती निगुतीने हाताळत असते. स्त्रीला निसर्गतः सौंदर्य दृष्टी आणि सारासार विचार बहाल केलेला आहे. त्यामुळे अट्टल दारुडी स्त्री शोधणे खूप जिकिरीचे काम आहे.

      ती कुठेही सट्टा लावत बसणार नाही. श्रम व्यवस्थेवर तिचा पूर्ण विश्‍वास असतो. ती कुठेही पिऊन पडणार नाही. तिचा विवेक झोपेतही जागृत असतो. निसर्गत: तिला नजरेतून हरेक भाव ओळखायची दिव्य ताकद मिळाली आहे.

      कोण माणूस कोणाकडे कशा प्रकारे पाहतो हे तीच उत्तम जाणते. रंग, ज्ञान, सौंदर्य याची दृष्टी तिला कणभर अधिक आहे. ती मरून, चॉकलेटी, तपकिरी रंग पटकन ओळखू शकते. तिथं कदाचित पुरुष वर्ग त्याला लाल रंग म्हणत बसेल.

      सजीवांच्या व्याख्येत चपखल बसणारी तिच आहे की जी आपल्यासारखा दुसरा जीव निर्माण करू शकते. अर्थात, त्याला पुरुषाची साथ आवश्‍यक आहेच. पण नव निर्मिती मधील मोठा वाटा तिचाच आहे. हे कोणीही मान्य करेलच. ते त्रिकालाबाधित सत्य आहेच. हा लॉ ऑफ एनव्हारमेंट आहे. Who will be storng or fit can sustain more. बळी तो कानपिळी तत्व इथेही लागू पडते. यात ती कुठेही कमजोर नाही.

      महिला दिन म्हणून विशेष सवलत हवी असे एका बाजूने म्हणणारे दुसऱ्या बाजूने समानतेचे नारे देतात.

      निसर्ग साखळीतील प्रत्येक घटक आवश्‍यक आहेच आणि तितकाच महत्त्वाचा आहे. एखाद्या घटकाची कमतरता पुढील कितीतरी गोष्टी घडणं थांबवत असतो. ती साखळी जतन करायची तर हर घटक तितकाच समान आहे असं प्रांजळपणे नमूद करावेसे वाटते.

      एखादं कुटुंब घट्ट धरून ठेवणे, त्यामधील प्रत्येक सभासदाला त्याच्या बारीक सारीक जबाबदाऱ्या देणं, त्यांच्याकडून योग्यरीतीने योग्य जीवनशैली जगत असताना आनंद निर्माण करणे हे एखाद्या स्त्रीला सहज शक्य आहे.

      मुळात माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे तर त्याला आयुष्यात कोणत्याही टप्प्यात एकाकी राहण आवडत नसत. चार वर्षांचं मुल पण नवीन आणलेलं खेळण स्वतः खेळायला सुरू करण्या बरोबरच  खेळण्यातील सवंगडी शोधत मैत्र वर्ग शोधत असतं.

      उतारवयात संवाद आवश्‍यक वाटत असतो. हे सर्व मेतकूट अगदी निगुतीने जमण्यासाठी कुटुंब नावाच्या घरकुलात त्या देवीच असणं तितकंच आवश्‍यक आणि पवित्र आहे. ती घरकुलात हसत खेळत असेल तरच तिथं समाधान नांदत राहील.

      अगदी घरोघरी भातुकली रूपातून आपल्या भारतात आपले संस्कार रुजवण्याच काम किती सहजपणे केलेलं आहे हे लक्षात येतं.

भातुकली

शेंगदाणे गुळाला लावून लाडू केले भराभरा

चुरमुरे पातळ लाटून पोळ्या झाल्या

पटापटा

छोट्याशाच कपातून चहा समजून पाणी दिलं

मोठाले डोळे करून ‘फुंकून पी’ म्हणून

दटावलं

पाहुणे आले बसा बसा सारं आधी ठरलेलं

गुलाबी ओढणी कुणाला? त्यासाठी आधीच वाजलेलं

ओढणीची साडी सावरत बाई आल्या तुरुतुरु

एकसाथ अभ्यास सुरू रडू नका मुळूमुळू

ऑफिसला कोणी जातं, येताना भाजी घेऊन येतं, फिरतं

चार पान झाडाची की आणखी कुठे कधी अडतं

गाडीसुद्धा दिसत नाही पण हात असतात हँडलवर…

शिट्ट्या ऐकू न येता, गॅस बंद होतो

बटणावर

किती पिढ्या खेळल्या तरी सलेंडर यांचा संपत नाही

कळशा पातेली कितीही भरली, पाणी काही पुरत नाही

घट्ट उगाच मिटून डोळे, कधी दिवसाच यांची रात्र होते

गजर बिजर न वाजता आपोआप जाग येते

यांच्या डोळ्यादेखतच डोळे मिटणारी ही मोठी होते

कुठल्यातरी बाहुल्याशी लगीन ठरून घाई उठते…

दिवसभर बाहुलीच मग जोशातच लग्न लागतं

वरातीत नाच करून पोटभर खाऊन होतं

लहानपणची नांदी भातुकली मोठेपणी, राजा राणी

खरे ऑफिस, खरी भाजी, डोळ्यांच्या घरातही खरोखरे, जमते पाणी !

      अर्थात केवळ अर्थाजन किंवा पाककला ही आता एकाची मक्तेदारी राहिली नाही. सर्वांनी ऑलराऊंडर होत खेळीमेळीत सगळं शिकत राहीलं पाहिजे. पुढे जाऊन केवळ कुटुंब हा विचार न करता विश्‍व हे कसं माझं घर होईल. जागृत नारीशक्ती संघटीत होऊन हा पुढचा विचार आधिक परिणामकारकपणे करू शकते.

      घरोघरी ताई, आई, आजी, काकू, वहिनी या अखंड सकरात्मक ऊर्जा शक्तीला प्रांजळ नमन…!

– अंजली विवेक मुतालिक

मोबा. 9420306408

Leave a Reply

Close Menu