पण लक्षात कोण घेतो?

सन १९७५ नंतर महाराष्ट्रात महिला दिन साजरा होऊ लागला. महिलांना आपल्या इच्छा गरजा जाहीरपणे बोलण्याची संधी त्या निमित्ताने मिळायला लागली. त्या बोलण्यातून कृतीकडे जाण्याची वाटही अनेकींना मिळाली. सुरुवातीला शहरातील काही ठराविक संस्था, मंडळ, गट महिला दिन साजरा करू लागले. आता तर सर्व राजकीय पक्ष, शासकीय कार्यालय, महिला दिन साजरे करतात. हे नक्कीच स्वागतार्ह आहे. पण एक दिवस साजरा होणा­या उत्सवानंतर काय? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.

      नोकरी करण्याची संधी तर मिळाली. पण नोकरीतून मिळणा-­या पगारावर ख­या अर्थाने तिचा हक्क असतो का? तिच्या मर्जीने कधीतरी ती खर्च करू शकते का? अशा प्रश्नांबाबत जरा आजूबाजूला बघितलं तर आपले डोळे खाडकन उघडतील. पूर्वीच्या नोकरी न करणा­या स्त्रिया फक्त घरच्या व्यवस्थापनाची जबाबदारी घेत होत्या. तर आता ती जबाबदारी तिचीच, शिवाय पैसेही कमवायचे आणि तेही घरासाठी खर्चाला दिलेच पाहिजेत. कारण आता तू आमची आणि तुझे पैसेही आमचेच, हक्काचे. हे सगळे करताना तिला घरच्या जबाबदारीत कोणी मदत करत असतील तर त्यांचा सूर मात्र काही ठिकाणी उपकारकर्त्याचा त्यामुळे ती स्वावलंबी असूनही तिच्या मनात एक अपराधीपणाची भावना कायमच वस्तीला असते. बरं या सगळ्या व्यापात तिला तिच्यासाठी वेळ नसतोच. कारण तिने स्वतःचा एखादा छंद जपायचा ठरवला तर त्यावर किती कुजबूज आणि चर्चा ती देखील घरातल्यांचीच. हे असले छंदबिद आता कशाला हवेत?‘ नव­याचं, सासू-सास­यांचं, मुलांचं बघायचं त्यात आनंद मानायचा अशीच अपेक्षा असते. त्यातही तिने काही वेगळा प्रयत्न केला तर तिला आगाऊ‘, ‘आपलं तेच खरं करतेअसं लेबल लावून टाकायचं. यामुळेच साधारण १९६०च्या दशकातल्या नोकरी करणा­या पहिल्या पिढीच्या स्त्रिया या तर सासरच्या कुटुंबात अक्षरशः विरघळून गेल्या. १९७५ नंतर हळूहळू स्त्रियांना स्वतःच्या अस्तित्वाचा भान येऊ लागलं. तेच जपण्याचा थोडासा तरी प्रयत्न त्या करू लागल्या. मुंबई-पुण्यासारख्या शहरात ब­याच ठिकाणी विभक्त कुटुंब दिसू लागली. त्यात नोकरी करणा­या स्त्रियांचे प्रमाण जास्त होतं. कारण तरच घरचे खर्च भागणं शक्य होत असे. तरीही बाईला स्वतःसाठी वेळ देण्याचं स्वातंत्र्य फारसं नव्हतंच. तिला गाणं, नाटक, लेखन, खेळ यातलं काही करायचं असेल तर पहिला शेरा किवा टोमणा आता हे करून कुठे झेंडे लावायचेत?‘ म्हणजे प्रोत्साहन तर दूरच पहिलं खच्चीकरण करायचं.

      यात खरंतर नव­याची भूमिका, त्याचा सहभाग खूप महत्त्वाचा असतो. त्याला स्वतःला ही गोष्ट मनापासून पटायला हवी आणि त्याने तिला प्रोत्साहन द्यायला हवं. तिच्या सरावाच्या वेळेत असणा­या कामांची जबाबदारी त्यांनी मनापासून स्वतःवर घ्यायला हवी. शक्य असेल तर तिला सरावाच्या ठिकाणी जायला -यायला मदत करायला हवी. त्यासाठी आवश्यक असणारी जागा, वेळ घरी आल्यावर ही द्यायला हवा. तर कुटुंबातील इतर सदस्यांनाही त्याचं महत्त्व पटू लागतं. त्यामुळे वेगळं काही करू पाहणा­या त्या स्त्रीमध्येही जिद्द, आत्मविश्वास निर्माण होतो. पंगा या कंकणारणावताच्या सिनेमात याचं छान चित्रण केलं आहे. बाईला जसा नव­याच्या मुलांच्या जिद्दीचा, चिकाटीचा, कर्तृत्वाचा अभिमान वाटतो, कौतुक वाटतं तसं तिच्याविषयी इतरांनाही वाटायला हवं तर ख­या अर्थाने समानता येईल  आणि महिलांचाही सन्मान होईल.

      पण हे सर्व करताना विश्रांतीची आपल्या सर्वांनाच गरज असते. आपण आयुष्यात काही ध्येय ठरवलं असेल ते गाठण्यासाठी आपण नियोजनपूर्वक नितांत परिश्रम घेतो. रात्रीचा दिवस एक करतो हे योग्यच आहे. परंतु रोजच्या जगण्यात दिनक्रम ठरवत असताना स्त्री-पुरुष दोघांनाही पुरेशी झोप आणि विश्रांती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुद्धा तेवढीच आवश्यक आहे. स्त्रियांच्या बाबतीत तिची यंत्रणा वेगळ्या पद्धतीनं काम करत असते. पुरुषांकडे पाहून तुलना करत स्वतःला आळशी समजणं म्हणजे स्वतःला त्रास देणं आहे. त्यांच्या वेळापत्रकात मासिकधर्म नाही, बाळंतपण नाहीत, मुलांची आई होणं नाही, तरीही विश्रांती घेताना मात्र स्त्रीच्या मनात अपराधीभाव असेल तर गंभीरपणे विचार करण्याची वेळ आलेली आहे. स्त्री हक्कांसाठी लढता लढता विश्रांतीचा हक्कच दुर्लक्षित राहिलाय. कदाचित सुपरवुमन होण्याच्या नादात तिचं स्वतःचंच दुर्लक्ष झालंय. हे विसरुन इतरांना कॉपी करताना स्वतःच्या गरजा, मर्यादा, वेगळेपण ती विसरतेय.

      काळ बदलला आहे हे मान्य करायला हवा. एकत्र कुटुंब पद्धती नाही. एक किवा दोन मुलांमुळे विभक्त कुटुंब पद्धती शहरात आणि निमशहरी भागातही वाढत आहे. अशा स्थितीत स्त्रीने दुहेरी जबाबदा­या पार पाडत असताना मदत घेण्यासाठी संकोच करू नये. सासर, माहेर, सख्खी, चुलत नाती या बरोबरीनेच विस्तारित कुटुंबातील नाती जोडून त्यांची मदत घ्यावी. कारण नव्या चांगल्या जगाची सुरुवात स्वतःपासूनच होते. पण लक्षात कोण घेतो..?

 

 

Leave a Reply

Close Menu