कुणकेरीचा हुडोत्सव उत्साहात संपन्न

सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी गावच्या प्रसिद्ध व वैशिष्ट्यपूर्ण हुडोत्सवाला रविवारी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. महाराष्ट्रात पंढरपूर आणि कुणकेरी या दोनच ठिकाणी होणाऱ्या या हुडोत्सवातील अनेक लोककला व लोकनृत्यांच्या पर्वणीसह हुड्यावर चढणाऱ्या संचारित अवसारांचा थरार अनुभवण्यासाठी महाराष्ट्रासह गोवा व कर्नाटक भागातील हजारो भाविक उपस्थित होते. भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे यावर्षी अर्धा तास उशिराने हुडोत्सवाची सांगता झाली.

      शनिवारी दुपारी गाव रोंबाट सुटल्यानंतर सायंकाळी हुड्याजवळ सामूदायिक नारळ फोडण्यात आला. त्यानंतर घुमटवादनासह हुडा आणि होळीवर धूळ मारण्यात आली. रात्री गाव रोंबाटाला सुरुवात झाल्यानंतर हुडा आणि होळीवर पेटत्या शेणी फेकण्यात आल्या. त्यानंतर ढोलताशांसह ‘भाभीचे रोंबाट’ आणून कवळे व पेटत्या मशाली घेऊन हुडा आणि होळीभोवती फिरण्याचा चित्तथरारक कार्यक्रम झाला.

      रविवारी सकाळपासून भावई देवीच्या निवासस्थानी ओटी भरणे, नवस अशा तीन गावांचे रोंबाट हुड्याजवळ फेडणे आदी कार्यक्रमासाठी महिलांसह भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी तीनच्या सुमारास मांडावरून लक्षवेधी खेळ झाला. याचवेळी पळसदळा येथे आंबेगाव श्री देव क्षेत्रपाल निशाण भेट, त्यानंतर कोलगाव सीमेवर कलेश्‍वर निशाण भेट होऊन सर्वजण सवाद्य मिरवणुकीसह भावई मंदिरकडे निघाले. या हुडोत्सवातील घोडेमोडणी, वाघाची शिकार अशा अनेक धार्मिक प्रथा परंपरेच्या कलाकृतींनी भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

      सायं. 7 वाजता 110 फुटी गगनचुंबी हुड्यावर चढणाऱ्या संचारित अवसारांचा थरार पाहण्यासाठी हजारोंच्या नजरा वळल्या. भक्ती आणि शक्तीचा हा अनोखा सोहळा उपस्थित हजारो भाविकांनी अनुभवला. त्यानंतर हुड्यावर टोकावर पोहोचलेल्या अवसारांवर दगड मारण्याच्या पारंपरिक कार्यक्रमाने उत्सवाची सांगता झाली. या हुडोत्सवाच्या नियोजनासाठी स्थानिक देवस्थान कमिटी, गावपंच आणि कुणकेरी ग्रामस्थांनी उत्कृष्ट नियोजन केले होते.

Leave a Reply

Close Menu