कौशल्ये आत्मसात करून आत्मनिर्भर व्हा : प्रज्ञा परब

निरनिराळी कौशल्ये आत्मसात करून महिलांनी आत्मनिर्भर होण्याची आवश्‍यकता आहे. तांत्रिक आणि यांत्रिक पद्धतीने शेती करून आपले कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम केले पाहिजे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या, प्रथितयश उद्योजक प्रज्ञा परब यांनी केले. दिलासा जनविकास प्रतिष्ठान या ग्रामीण विकास क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेतर्फे आयोजित महिला मेळाव्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

      हा मेळावा न्यूयॉर्कस्थित एशिया इनिसिएटिव्हस या संस्थेच्या सहकार्याने झाला. या संस्थेच्यावतीने आणि दिलासाच्या सहभागाने सिंधुदुर्गात श्री पद्धतीद्वारे महिलांचे सक्षमीकरण प्रकल्प सुरू असून यात 1100 महिला सहभागी आहेत. या पध्दतीमुळे त्यांच्या भात उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. या सर्व लाभार्थी महिलांचा मेळावा दोडामार्ग येथे नुकताच झाला. या मेळाव्यात जिल्हा कृषी मार्गदर्शक तथा पोलिसपाटील संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर सावंत यांनीही मार्गदर्शन केले. श्री भात लागवडीची पद्धत शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून जास्तीत जास्त शेती क्षेत्रावर तिचा अवलंब केला पाहिजे. केवळ घरापुरती शेती न करता पडीक जमीन भात लागवडीखाली आणून आपला आर्थिक विकास केला पाहिजे, असे ते म्हणाले. ‘दिलासा’च्या संस्थापक अध्यक्ष डॉ. अनघा पाटील यांनी प्रास्ताविक, कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्रेमानंद देसाई यांनी केला.

Leave a Reply

Close Menu