सावध ऐका पुढल्या हाका…!

अमुक ठिकाणी गारपीटमुळे नुकसान, कुठे अतिवृष्टी, किना­यावर कासव, मासे मृतावस्थेत, सकाळच्या वेळी गारवा, सकाळच्या ९ वाजलेनंतर वाढणारी तीव्र उष्णता, मधूनच होणारे ढगाळ वातावरण या सर्वांमुळे अनपेक्षित बदल निसर्ग आणि मानव यातील नात्यात चिंता वाढवणारे ठरले आहे. याचा परिणाम प्रचंड वाढणारा थकवा, लवकर न बरा होणारा सर्दी-खोकला अशा नव्याने निर्माण झालेल्या आजारात रूपांतरित होत आहे. एखादी जखम साधी असेल तर ती वरवरच्या मलमपट्टीने बरी होते पण जुनाट रोग मुळापासून बरा करावा लागतो. वातावरणातील बदल हा मुळातच तापमानाच्या बाबतीत संवेदनशील चालला आहे. वातावरणातील अनपेक्षित बद्दल एकाएकी तर घडत नाही मानवी हस्तक्षेप वाढतो तेव्हाच त्या सगळ्या कृतींचा परिपाक हा वातावरणीय बदलत दिसून येतो हा आतापर्यंतचा अनुभव आहे.

      १९८७मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण व विकासाबाबतच्या वैश्विक आयोगाने आपले समान भविष्य‘ (ब्रून्टलंड अहवाल) या नावाने एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार शाश्वत विकास म्हणजे आपल्या वर्तमानातील गरजा पूर्ण करताना आपल्या पुढील पिढ्यांच्या त्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेला बाधा न येऊ देता साध्य केलेला विकास होय.विकासाच्या व्याख्या या व्यक्तिसापेक्ष असतात. पण एकूणच वातावरणातील बदलामुळे सद्यस्थितीत समाजावर होणारा परिणाम माणसाला नेमक्या कुठल्या विकासाच्या दिशेने नेतो आहे याबाबत चिंता व्यक्त होत आहे. प्रदुषित देशांच्या यादीत भारत आठव्या स्थानी राहिला आहे. गेल्यावर्ष पावसाळा आणि उन्हाळा हे दोनच ऋतु असल्याप्रमाणे वातावरण होते. यावर्षीही मार्च महिन्यातच तीव्र उन्हाचे चटके बसू लागले आहेत. सध्याचे आणि यापुढील दिवस हे कोकणी मेवा चाखण्याचे आहेत. फळांचा राजा असलेल्या आंब्यावर तसेच काजूवर येथील बहुतांशी अर्थव्यवस्था अवलंबून आहे. परंतु, अशा पिकांचा हंगाम अर्धा झाला तरी ब­-याच ठिकाणी मोहोर करपलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. तर मोहोर फुललेल्या झाडांवरुन फळगळती होण्याचेही प्रमाण आहे. गेल्यावर्षीपासून या बदलत्या हवामानामुळे फळमाशीचा उपद्रव वाढत आहे. बाहेरुन फळ चांगले दिसले तरी या फळमाशीच्या प्रादुभार्वामुळे आतून ते फळ किडयुक्त असते. वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळेदेखील शेती-बागायती धोक्यात आली आहे.

      एप्रिल-मे महिना हा कुल जाण्यासाठी आपल्याला वेळीच हातपाय हलवणे हे गरजेचे आहे. रस्ते विकासासाठी दुतर्फा असलेली अनेक ठिकाणच्या झाडांची कत्तल झाली आहे. पूर्वी झाडे ही त्या त्या जागेची ओळखीच्या खुणा सांगायची. आता रस्त्याने चालताना सावली नावाला दिसत नाही. प्रदूषित शहरांमध्ये मुंबई, दिल्ली, गुडगाव अशा काही ठराविक शहरांची नावे घेतली जायची. आता गावागावांत असलेले स्वास्थ्य अचानक बदललेल्या हवामानामुळे बिघडू लागले आहे. वातावरणातील बदलामुळे कोकणी मेव्यातील चव, आकार, रंग बदलत आहे.

      हा निर्माण झालेला प्रदूषणाचा विळखा रोखण्यासाठी माणसाने आपलीच जीवनशैली बदलणे काळाची गरज आहे. प्रदूषणाचा विचार करताना हवा, पाणी व मातीच्या प्रदूषणाचा आणि मुंबई, दिल्ली, बेजिंगचा वेगवेगळा विचार केला जातो ही विचारधारा चुकीची आहे. कारण, पृथ्वी तुकड्यांत काम करत नाही. ती समग्रतेने काम करणारी एकसंघ सेंद्रीय कार्यपद्धती आहे. ही गोष्ट विज्ञानाची बैठक निर्माण करणा­यांनी आणि त्यानंतर दोनशे वर्षांनी तंत्रज्ञानाला विज्ञान मानण्याची चूक करणा-­यांनी लक्षात घेतली नाही. आता दर पाच वर्षांत पृथ्वीच्या सरासरी तापमानात १ अंश सेल्सिअसने वाढ ही माणूस आणि जीवसृष्टी यामधील मृत्यूची दरी कमी करीत आहे.

      पृथ्वी माणसाबरोबरच व्हेल, हत्ती व पाणघोड्यांसारख्या महाकाय प्राण्यांचेही पालन पोषण करू शकते, त्यांना सांभाळू शकते. प्राणवायू, पाणी व अन्न हे पृथ्वीने सृजन केलेल्या सजिवांसाठी आहे. परंतु मानवाने निर्माण केलेल्या मोटार, विमान जहाजे, टीव्ही, फ्रीज, कॉम्प्युटर इ. निर्जिव यंत्रांसाठी व वीज, सिमेंट, पोलाद, प्लास्टिक, फायबर अशा हजारो कृत्रिम उत्पादनांसाठी नाही, जी पृथ्वीवर अपरिवर्तनीय बदल व अक्षम्य हानी करतात. आपण वाढवून ठेवलेल्या गरजा, अपेक्षा या निसर्गाकडून समतोल साधण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिला आहे. परंतु, या निसर्गाचाही सावधानतेचा इशारा वेळीच ओळखून आपली जीवनशैली बदलण्याची वेळ आली आहे.

 

Leave a Reply

Close Menu