तात्याची खानावळ

बऱ्याच कालावधीपासून वाचकांचा आग्रह होता, ‘घोगळ्यांनू तात्याच्या खानावळीवर एकदा लीवा.’ माझ्याही मनात होते पण योग येत नव्हता. शेवटी वेंगुर्ल्याच्या खाद्यभ्रमंतीमधून हा योग आलाच. ‘तुमच्या खानावळीवर लेख लिहीण्यासाठी तुम्हाला भेटायला घोगळे येणार आहेत’, हा निरोप ऐकून तात्या थोडे संकोचले. ‘माझ्याकडे काय आसा लिवण्यासारा…’ त्यांना कल्पनाच नव्हती. त्यांनी सुरू केलेल्या खानावळीची किर्ती चाकरमान्यांमध्ये पसरली असून ते या खानावळीबद्दल वाचण्यास उत्सुक आहेत. निरोप दिल्यानंतर काही आठवडे अस्मादिकांनाही तात्यांची भेट घेण्यासाठी सवड मिळत नव्हती. ज्या दिवशी सवड मिळाली त्या दिवशी खानावळीत अर्धातास वाट पाहिल्यावर शेवटी तात्यांची भेट झाली.

      वेंगुर्ला मार्केट समोरुन दाभोली नाक्याच्या दिशेने जाताना उजव्या हाताला मच्छी मार्केटच्या अगदी समोर एक गल्ली आहे. तुमचा लक्ष नाही गेला तर इथे एक गल्ली आहे आणि या गल्लीत वस्ती, दुकाने, खानावळ आहे हे तुमच्या लक्षातही येणार नाही. या गल्लीच्या (सांगळे गल्ली) तोंडावर एक छोटासा बोर्ड आहे – ‘समर्थ भोजनालय’, हीच तात्याची खानावळ. तात्या चुडनाईकांच्या या खानावळीला समर्थ भोजनालयापेक्षा तात्याची खानावळ म्हणूनच जास्त ओळखले जाते. गल्लीत शिरल्यावर दोन पावले चालले की तात्याची खानावळ दिसते. अगदी साधे घर, त्या घरातच तीन-चार टेबले मांडून खानावळ चालवली जाते. खानावळीच्या दारात सावलीसाठी छोटासा मंडप आणि त्यावर ठळक समर्थ भोजनालयाचा बोर्ड. टिपीकल कोकणातल्या शहरी भागातील घर, आत एका काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूने लिहीलेला जेवणाच्या दराचा बोर्ड. त्यावरील या महागाईच्या काळातसुध्दा शाकाहारी थाळी 80 रुपये, मच्छी थाळी 120 रुपये, चिकन थाळी 150 रुपये असे अल्प दर लक्ष वेधून घेतात.

      सुरुवातीला संकोचून बोलणारे तात्या, खानावळीची सुरुवात कशी झाली हे सांगताना रंगून गेले. तात्या चुडनाईक खानावळीच्या धंद्यात येण्यापूर्वी उदरनिर्वाहासाठी वेंगुर्ले बाजारात गुट्टी सोडा -लिंबू सरबताचा व्यवसाय करायचे. बाजारात गुट्टी सोडा, सरबताचा त्यांचा छोटासा स्टॉल. मच्छी विक्रेत्या, भाजी विक्रेते, व्यापारी, बाजारात खरेदीसाठी येणारे हे तात्यांचे ग्राहक. हातात सरबतांनी भरलेल्या ग्लासांचा कॅरेट घेऊन तात्या लगबगीने बाजारात फिरताना दिसायचा. त्याकाळी पाच रुपये सरबत, पन्नास पैश्‍यांना गुट्टी सोडा असा दर असायचा. बाजारात जसजसा ब्रँडेड कंपन्याच्या शीतपेयांनी बस्तान बसवायला सुरुवात केली तसतशी गुट्टी सोड्याची क्रेज कमी कमी होत गेली. आता तर गुट्टी सोडा इतिहासात जमा झाल्यासारखाच आहे. ‘गुट्टी सोडो बनयना तसा रिस्कीच होता, पण पूर्वी त्येची क्रेझ भारी होती’. तात्यांच्या डोळ्यात गुट्टी सोड्याबद्दलच्या आठवणी ओसंडून वाहत होत्या.

      गुट्टी सोडा-लिंबू सरबताच्या धंद्याला उतरती कळा लागल्यावर उदरनिर्वाहासाठी काहीतरी मार्ग शोधणे आवश्‍यक होते. आता ज्याठिकाणी खानावळ चालू आहे त्याच घरात तात्या त्यांच्या कुटुंबासह भाड्याने रहायचे. त्यांचे मुंबईला असलेले घरमालक त्यांच्या मदतीला धावून आले, त्यांनी तात्यांना हे घर विकत दिले. तात्यांनी घराची दुरुस्ती केली आणि तिथेच खानावळ सुरू केली. खानावळ चालवायचा त्यांना काही अनुभव नव्हता, त्यांची पत्नी सौ.मेघा चुडनाईक यांनी स्वयंपाकाची मुख्य जबाबदारी उचलली. सांगळे गल्लीच्या तोंडावर ‘समर्थ भोजनालय’ असा छोटासा बोर्ड लावला, घरात डाळ-भात, भाजी आमटी असे काही पदार्थ बनवले आणि सुरू झाली खानावळ.

      सन 1999 मध्ये सुरू झालेली ही खानावळ हळूहळू लोकप्रिय होत गेली. ग्राहकांना बसायला जागा अपुरी असल्याने सिझनच्या काळात वेटींग वाढू लागले. या खानावळीत सुरुवाती पासून आतापर्यंत जेवण चुलीवरच बनविले जाते. अलिकडे चपात्या मात्र गॅसवर बनतात. पंधरा रुपये शाकाहारी आणि वीस रुपये माश्‍याचे जेवण या अल्प दराने सुरू झालेल्या खानावळीने आज तेवीस चौवीस वर्षानंतरही महागाईच्या दरात तुलनेने मोठी दरवाढ केलेली नाही. ‘आजच्या काळात तुमका ऐंशी रुपये, एकशेवीस रुपये थाळी हे दर तुमका कसे परवडतत’, यावर वाढती स्पर्धा आणि ग्राहकांचे समाधान या दोन गोष्टीमुळे आम्ही दर फारसे वाढवलेले नाहीत असे तात्या सांगतात.

      शाकाहारी थाळीमध्ये वरण-भात, भाजी, आमटी, दोन चपत्या, लोणचे-पापड, कोशींबीर, सोलकढी हे पदार्थ पोटभर मिळतात. चपात्या वगळता अन्य पदार्थांना एक्स्ट्रा चार्ज लावले जात नाही. भाताला मर्यादा नाहीच. हाच प्रकार मांसाहारी जेवणात सुध्दा, फक्त एक्स्ट्रा फिशफ्राय घेतला तर त्याचे ज्यादा पैशे आकारले जातात. पुर्वीपासूनच ग्राहकांना अनलिमिटेड जेवण देण्याचा तात्याचा शिरस्ता.

      तात्याची खानावळ वेंगुर्ले मच्छी मार्केटच्या अगदी समोर. त्यामुळे तात्या खानावळीसाठी मासे याच बाजारातून खरेदी करतात. रोजच्या रोज ताज्या माश्‍यांची खरेदी, स्वस्त आहेत म्हणून ज्यादा खरेदी करुन ठेवणे आणि दुसऱ्या दिवसासाठी वापर करणे, असला प्रकार इथे नाही. मासळी महाग आहे म्हणून फिश थाळीचे दर वाढले असेही कधी नाही, फक्त सुरमई थाळीचे दर थोड्याफार प्रमाणात बदलत असतात. घरगुती मसाले, चुलीवरच्या जेवणाची चव, मालवणी पध्दत यामुळे या जेवणाला ग्राहकांची पसंती वाढत गेली. चाकरमानी, पर्यटक वेंगुर्ल्याला भेट देण्यासाठी आले की तात्याच्या खानावळीत अवश्‍य जेवायला येतात. जेवून जाणारा माणूस न विचारता ‘जेवण मस्त होते हां’, अशी तारीफ करुन जातोच. शिवाय इतरांना इथे जेवायला जायची शिफारस करतो.

      सांगळे गल्लीत जास्तीत जास्त टू व्हिलर येऊ शकते, मार्केटमध्ये तर फोर व्हिलर पार्क करणे अशक्यच, तरीही दूरवर कुठेतरी आपली गाडी पार्क करून चाकरमानी जेवणासाठी या खानावळीत येतात. आपली पत्नी मेघा, मुली दर्शना व योगीता यांच्या सहकार्याने तात्या खानावळ चालवतात. त्यांच्या या प्रयत्नांमुळे खवय्यांना उत्तम मालवणी जेवणाचा आस्वाद तोही कमी दरात मिळतो. बेरोजगारीवर चुडनाईक कुटुंबाने केलेली ही मात कौतुकास्पदच.

(सदर लेख कोणत्याही हॉटेल व्यवसायाची जाहीरात करत नसून वेंगुर्ल्याची खाद्यभ्रमंती करुन खवय्ये आणि वेंगुर्ल्यात मिळणारे खाद्यपदार्थ व ती मिळणारी हॉटेल्स, भोजनालये इ. यांच्यात दुवा साधण्यासाठी हा आमचा प्रपंच आहे. खाली दिलेला लेखकांचा संपर्क क्रमांक हा केवळ या लेखावर आपल्याला व्यक्त व्हायचे असेल तर त्यासाठी माध्यम म्हणून उपलब्ध करुन दिलेला आहे.)

– संजय गोविंद घोगळे, 8655178247

Leave a Reply

Close Menu