वाढती विवाह मर्यादा-एक सामाजिक समस्या!

   विवाह हे एक सामाजिक बंधन आहे. समाज व्यवस्था व कुटुंब व्यवस्था टिकविण्यासाठी विवाहाचे महत्त्व अधोरेखित केले गेले आहे. तसेच विवाह ही एक कायदेशीर पद्धती आहे. विवाहामुळे केवळ एका स्त्री पुरुषाचाच संबंध जोडला जात नसून, त्याचे कुटुंब, नातलग, व त्याचा समाज प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे जोडला जातो. विवाहाला एक सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली असून विवाह जमविणे व तो टिकविणे ही सद्य स्थितीत तारेवरची कसरत बनत चालली आहे. विवाह जमविताना ज्या अनंत अडचणींना सामना करावा लागतो व त्यातून ही प्रक्रिया पार पडली जाते. परंतु सद्यस्थितीत मात्र योग्य वयात विवाह न जमणे अगर कायम स्वरूपी अविवाहित रहाणे ही एक सामाजिक समस्या दिवसेंदिवस जटील बनत चालली आहे.

     विवाह जुळविण्यापासून तो यथासांग पार पडण्यापर्यंतच्या कालावधीत ज्या घटना सामाजिक व कौटुंबिक स्तरावर घडल्या जातात त्या जर सकारात्मकतेने दोन्ही बाजूकडून घडविल्या गेल्या तर विवाह विनासयास पार पडतो अन्यथा एखादी घटना जरी नकारात्मकतेने घडली गेली असेल तर त्याचे दुरगामी परिणाम वैवाहिक जीवनात दिसून येतात.

   भारतीय संस्कृतीमध्ये विवाह संस्थेला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे प्राचीन काळापासून ते आजच्या डिजिटल युगापर्यंत विवाह संस्था आपले अस्तित्व अबाधित राखून आहेत. परंतु कालपरत्वे ह्यामध्ये सामाजिक बदल घडून प्रम विवाह, आंतरजातीय विवाह होऊ लागले. शैक्षणिक गुणवत्तेमुळे समाजात प्रगल्भता निर्माण होऊन अशा विवाहांना समाज मान्यता प्राप्त झाली. असे जरी असले तरी सुद्धा अजूनही देशात काही ठिकाणी सामाजिक विषमता पूर्ण लोप पावली नसून आंतरजातीय विवाहातून अगर प्रेमातून अनेक अन्याय, अत्याचार घडताना दिसून येतात हे सत्य नजरेआड करून चालणार नाही. दुर्दैवाने अशा घटनांना धार्मिकतेचा रंग देऊन राजकीय स्वार्थाची पोळी भाजण्याचे दुर्दैवी प्रकार घडताना दिसून येताना दिसतात.

          सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात तरुणाईवर पाश्चात्य संस्कृतीचा पगडा फार मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे व त्यातूनच लिव्ह अँड रिलेशनशिपचे वारे वाहू लागले. जो पर्यंत आपणास आपला जोडीदार योग्य, वाटतो, त्याच्या सहवासा -तील ते जादूभरे रंगीन दिवस आनंदाचे वाटतात तोपर्यंतच लग्न न करता एकत्र राहण्याची आजची तरुणाईची मानसिकता व जेंव्हा एकमेकांबद्दलची शारीरिक व मानसिक ओढ उतरणीला लागते तेंव्हा एखाद्या सुवासिक फुलाचा दरवळ जेंव्हा कमी होतो व ते कचरा कुंडीत फेकून दिले जाते त्याप्रमाणे ह्या उथळ वैवाहिक संबंधांची परिणीती होते व प्रेमी युगुल कधी स्वेछेने तर कधी नाइलाज म्हणून एकमेकांपासून अलग होतं पुन्हा एखादा प्रेमाचा झरा शोधण्याचा प्रयत्न करतात.

     आजकाल तर समलिंगी वैवाहिक संबंधाना कायदेशीर मान्यता देण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात समलिंगी जोडप्यांनी दाखल केली आहे, परंतु केंद्र शासनाने अशा विवाह विरोधात नकारात्मक भूमिका घेतल्याने याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार स्पेशल मॅरेज अॅक्ट १९५४ च्या कायद्याने समलिंगी जोडप्यांना कायदेशीर व सामाजिक अधिकार नाकारले जात आहेत. भारतीय प्रत्येक नागरिकाला घटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे त्यानुसार त्याने आपले वैवाहिक जीवन कशाप्रकारे व्यतीत करावे हा त्या जोडप्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. ज्या विवाहामधून त्यांना वैयक्तिक आनंद मिळत असेल तर त्याबाबत नकारात्मक भूमिका घेणे सध्या योग्य वाटतं नाही.

       मुलामुलींची उच्च शिक्षण, संगणक, मोबाईलच्या युगात करिअरचा विचार करून उत्पन्नाचा, शिक्षणाचा विचार करून विवाह ठरविले जात आहेत. या सर्व झटापटीत अनेक मुलामुलींच्या वयात वाढ होतं आहे, अनेकांचे रूपांतर प्रौढत्त्वाकडे झुकून त्यांचे विवाहाचे वय व शारीरिक अवस्था निघून जात आहे. प्रसंगी अनेकांची तर आपला विवाह होईल अशी आशाच मावळली आहे. समाजातील या गंभीर समस्येस नेमके जबाबदार कोण? हा खरा प्रश्न आहे. अलिकडे अनेक विवाह संस्था, वधु वर सूचक केंद्रे यासाठी प्रयत्न करताना दिसतात. तरी सुद्धा ही समस्या न सुटता प्रतिदिनी उग्र रूप धारण करीत आहे.

    वैद्यकीय दृष्ट्या मुलामुलींच्या वयाला संतती प्राप्तीसाठी ठराविक काल मर्यादा असते. परंतु जसे वय वाढत जाते तशी संतती प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची होत जाते. या समस्येकडे गांभीर्याने कोणी लक्ष देताना दिसत नाही. समाजात मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण व्यस्त आहे तरी सुद्धा निर्व्यसनी, होतकरू, हुशार मुलांची कमतरता जाणवू लागते हे नाकारून चालणार नाही. ब­याचदा मुलीच्या पालकांचा प्रचंड अहंकार कारणीभूत ठरतो, मुलाचा पगार, त्याचे शिक्षण, संपत्ती त्याचं दिसणं याबाबत तुलनात्मक दृष्ट्या परिक्षण केलं जातं किवा शेती करणा­या मुलांना तर मुलींकडून लग्नासाठी सपशेल नकारच दिला जातो, त्यामुळेच गतवर्षी राज्यातील एका जिल्ह्यात शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली न मिळतं असल्याबाबत मोर्चा काढावा लागला. वास्तविक विवाह संबंधामुळे एक परिवार तयार होणार असतो, एकमेकांना समजून घेणारा, मान आणि मन राखणारा, सुख दुःखात साथ देणारा म्हणून जोडीदाराकडे पाहणे गरजेचे आहे. मुलींप्रमाणे मुलांच्या सुद्धा फार अटी असतात मुलगी उच्च शिक्षित, नोकरी करणारी, शहरात राहणारी, दिसायला सुंदर इ. काही मुलींचा एकत्र कुटुंब पद्धतीस नकार असतो. त्यांना कुटुंबात दोन किवा तीन माणसे अपेक्षित असतात. लग्न जुळविताना मुलाचा पगार कमी म्हणून नकार दिला जातो. अशावेळी मुलगी जर नोकरी करणारी असेल तर संसार हा दोघांचा असतो याकडे सपशेल कानाडोळा केला जातो. मुलीला नोकरी नसेल तरीही घरची जबाबदारी घेण्याची तयारी असल्यास मुलांनीही तिच्या नोकरीचा अट्टहास धरु नये. थोडक्यात, नाहक किवा अतिरंजित अपेक्षांमुळे आपले वय वाढत जाते आहे याची जाणिव होणे गरजेचे आहे. आतातर बेरोजगारीने थैमान घातले असून सरकारी नोकरीची अपेक्षाच करणे चुकीचे आहे. खाजगी नोकरीत सुद्धा कायम स्वरूपाची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत एखादा चांगला व्यवसाय निवडून त्यातून चांगली अर्थप्राप्ती होणे मुश्किल नाही. पण त्यासाठी कष्ट करण्याची सवय व चिकाटी असणे महत्त्वाचे आहे ह्या बाबींचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.

   प्रत्येक मुलामुलींना आपला जोडीदार कसा असावा हे ठरविण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे, त्यांच्यावर पालकांनी अगर समाजाने कोणताही दबाव न आणता त्यांचे विवाहास संमती देणे गरजेचे आहे. ज्या विवाहामुळे दोन मने, दोन कुटुंब व पर्यायाने दोन समाज भावनिक व मानसिक दृष्ट्या आनंदाने एकत्र येतील. हुंडा घेण्याची प्रथा जरी कायद्याने बंद असली तरी सुद्धा अप्रत्यक्ष -पणे विवाहसाठी वाढत जाणा­या खर्चाचे प्रमाण पाहिले की, तो हुंड्याचाच एक अप्रत्यक्ष भाग दिसतो. काही जणांकडून आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन दाखविण्याचा निरर्थक हट्टाहास असतो तर काही मुलींच्या पालकांना कर्ज काढून मुलींचे विवाह करावे लागतात. प्रसंगी कर्जबाजारीपणापायी जीव गमवावा लागतो. ही सामाजिक विषमता जोपर्यंत नष्ट होतं नाही तोपर्यंत होऊ घातले जाणारे विवाह कायम स्वरूपी टिकावं धरणे अवघड आहे व विवाहातून खरा आनंद मिळणे कठीण होऊन जाईल यासाठी विवाह हा केवळ विधी नसून तो एक दोन जीवांच्या आयुष्याच्या बंधनातील अतूट असा धागा आहे हे विसरून चालणार नाही.

संजय तांबे,फोडाघाट  (९४२०२६१८८८)

Leave a Reply

Close Menu